शेकडो मेंढ्या घेऊन धनगर समाज स्वतःच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरला…

    318

    ✒️नवनाथ आडे(बीड, जिल्हा प्रतिनिधी)

    बीड(दि. सप्टेंबर);- सकल धनगर समाज यांच्या वतीने शिंगारवाडी फाटा ता गेवराई जि बीड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाज हा एसटी आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. या समाजाची मागणी आहे की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे, या आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन मोठाले मोर्चे, रस्ता रोको केले तरी या सरकारला या धनगर समाजाची दया आली नाही. प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की, धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करून घेऊ. असे न होता या समाजाला एसटीचे दाखले देण्यात यावेत. यासाठी शिंगारवाडी येथे सकल धनगर समाज गेवराई च्या वतीने मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनामध्ये पंचक्रोशीतील हजाराच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी व आपल्या आरक्षणासाठी एकत्र आलेला दिसला.राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर राज्यभर आंदोलन मोर्चे रस्ता रोको करण्यात येईल असे या ठिकाणी सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी संबोधित करताना सांगितले.या आंदोलनामध्ये शेकडो मेंढ्या घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध व या सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. “येळकोट येळकोट, जय मल्हार” या जयघोषाने शिंगारवाडी पंचक्रोशी दणदणली होती.