ओबीसींच्या राजकीय अपेक्षा व समाजाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करा!

211

ओबीसी समाजातील गोरगरीब जनतेच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न न करता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी गोरगरीब ओबीसी समाज बांधवांना गृहीत धरून समाजकारण व राजकारण करू नये. सर्वांनाच समानतेची वागणुक देण्यासाठी सत्याच्या वाटेवर सामाजिक व राजकीय वाटचाल केली पाहिजे. आणि समाजकार्य म्हणजे समाजाची दिशाभुल होणार नाही याची काळजी घेत राजकारण करणे म्हणता येईल. समाजकारण करतांना वैयक्तिक पातळीवर द्वेषभावना ठेऊन राजकारण होणार नाही याची काळजी घ्यावी.सुतार समाजातील तरुणांना राजकीय क्षेत्रात कार्यरत बघतांना निश्चितच आनंद होतो, पण मुलभूत समस्या कोणत्या याच त्यांना समजत नसतील तर निश्चितच विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी मात्र ओबीसी सुतार समाज नेत्यांना घ्यावी लागेल.

सुतार समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करा आणि तरुणांना त्यांचे करिअर उत्तमोत्तम प्रकारे घडविणे हेच खरे आव्हान उभे राहिले आहे. आजचा युवक उद्याचे समाजाचे भविष्य आहे युवक वर्गाला योग्य मार्गदर्शन करणारा योग्य मार्गदर्शक असणे गरजेचे आहे. सुतार समाजात सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी उद्दोग व्यवसाय उभारणी गरजेचे असते जेणेकरून युवक वर्ग आर्थिक उत्पन्न निर्माण करून आपल्या पायावर भक्कमपणे उभा राहील. त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी कोण घेणार? पुढाऱ्यांनी फक्त युवकांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करून घेऊन युवकांना वाऱ्यावर सोडुन देऊ नये आणि स्वतःची सामाजिक आणि राजकीय पोळी भाजुन घेऊ नये. त्यासाठी युवकांनी सुद्धा जागरुक असायला पाहिजे जेणेकरून स्वयंघोषित पुढारी सुशिक्षित युवकांचा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापर करण्याची हिंमत करणार नाही. त्यासाठी पुढाऱ्यांकडे युवकांसाठी काही ठोस कृती कार्यक्रम योजना ओबीसी सुतार समाजातील स्वयंघोषित समाज नेत्यांच्या म्हणजेच समाजात पुढारपण करणाऱ्या लोकांच्या डोक्यात आहेत काय?

समाजात वावरताना सर्वसमावेशक समन्यायी भुमिकेत वावरावे लागते हे एक मोठं आव्हान असते याची काळजी ओबीसी नेते घेतांना दिसत नाही. ओबीसी समाजाला राजकीय फायदेशीर ठरेल असे राजकारण करा, सुतार समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील यात अजिबात शंकाच नाही. राजकारण करताना सामाजिक क्षेत्रात हेवेदावे, मत्सर, वैयक्तिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्या. समाजकारण आणी राजकारण या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत परंतु, त्याचसोबत वैचारिक बैठक सामाजिक नाळ सुद्धा तितकीच महत्त्वाची असते याकडे समाज नेत्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही.

समाजात आपल्यावर कोणताही कलंक लागणार नाही याची काळजी घ्या, मात्र खोट्याचा अवडंबर असलेल्या कोणत्याही व्यक्ती पासुन सावधगिरी बाळगा. राजकीय व सामाजिक कार्यात सहभागी होतांना वाटेवर काटे पसरलेले असतात त्यातुन संयम ठेऊन वाट शोधणे गरजेचे असते. तरूणां कडुन समाजाच्या काही सामाजिक विकासात्मक अपेक्षा असतात त्याकडे लक्ष द्यावे. समाजातील एक तरुण कार्यकर्ता राजकीय पटलावर चमकतो याचा आनंद निश्चितच आहे. अनेक गोष्टी असतात त्याची काळजी घेणे गरजेचे असते. सामाजिक व राजकीय तत्वाचे पालन करा आणि समाजाचे नाव राजकीय आणि सामाजिक पटलावर मोठं करा. आपल्या जातीचा नेता लोकप्रतिनिधी म्हणून त्याला मोठे करतो पण तो पक्ष संघटनेच्या विचारधारेला नेतृत्वाला विचारल्या शिवाय काहीच करू शकत नसतो. कारण तेव्हा तो जातीचा नसतो तर पक्षाच्या विचारधारेचा असतो.

जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे पडत चालले आहेत, कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच फार मोठी समस्या आहे.म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे, मी मोठा आणि तू छोटा बस, हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसतो. माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते.परंतु जेथे अहंकार आहे, तेथे प्रेमही नाही,आणि ज्ञानही नाही, रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही, तोपर्यंत काहीही फायदा नाही. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही. ओबीसी बावन्न टक्क्यांनी आहेत तरी त्यांना जन्मा पासून मृत्यू पर्यंत स्वताच्या मर्जीने काही करता येत नाही.त्याला तीन टक्केवाल्या जातीच्या हिशेबाने म्हणजेच वर्ण व्यवस्थेनुसार वागावे लागते आणि तशीच वागणूक दिली जाते, ती कोणाच्या लक्षात येत नाही.

मतदारसंघातील ओबीसीच्या संख्या बळावर राजकीय पक्षात वर्चस्व असणारे नेतृत्व असायला पाहिजे होते पण वैचारिक भूमिका नसल्यामुळे राजकीय पटलावर ओबीसी समाज दखल पात्र नाही. म्हणूनच यशस्वी होण्यासाठी राजकीय अपेक्षा व समाजाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी संघटनात्मक बांधणी करून संघर्ष करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, राज्य व केंद्र सरकारच्या समाजकल्याणकारी विकासांच्या योजनांची सुद्धा अभ्यासपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी या निसर्गाच्या नियमाने ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी सुतार समाजाची राज्यभरात लोकसंख्या साधारणतः 50 लाखाच्या जवळपास असल्याचे माझ्या वाचनात आले आहे आणि ओबीसी सुतार समाजात अनेक राज्यस्तरीय नामकरणाचा शब्दप्रयोग करणाऱ्या संघटनांचे जाळे माझ्या माहिती प्रमाणे राज्यभरात विस्तारलेले आहे. याच संघटनांच्या माध्यमातून ओबीसी सुतार समाजात विविध विकासात्मक आणि विविध विषयांवर समाज जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते कारण सामाजिक सर्वांगीण विकास आणि विविध विषयांवर समाज जागृती कार्यक्रम आयोजित करणे हाच कोणत्याही सामाजिक संघटनेचा समाजात कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश असतो यालाच ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात हरताळ फासला जाऊ नये हिच माफक अपेक्षा आहे यातच समाजाचे समाजहित दडलेलं आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी संविधानात विशिष्ट कलम निर्माण करून दिलेले आहे त्याचा उपयोग समाज नेत्यांनी समाजहितासाठी करणे गरजेचे असते. ओबीसी सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक असुनही त्या संदर्भात मात्र समाजात ओबीसी,संविधान,जनगणना आणि आरक्षण इत्यादी विषयावर मात्र ओबीसी सुतार समाजात समाज जागृती निर्माण करण्यासाठी ओबीसी सुतार समाजातील स्वयंघोषित समाज नेते, पुढारी प्रयत्न करतांना दिसत नाहीत त्यामुळे समाजात ओबीसी, संविधान,जनगणना आणि आरक्षण या बाबतीत समाज अनभिज्ञच आहे. म्हणूनच इतिहास वाचा. इतिहास सोडा फक्त संविधान वाचा म्हणजे कोणाला काय न्याय, हक्क अधिकार दिले याचा आपला अभ्यास होईल.

ओबीसी सुतार समाजात या संदर्भात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे याची सामाजिक वैचारिक आणि नैतिक जबाबदारी पुढारी,समाज नेत्यांचीच असते.म्हणूनच ओबीसी समाजाने स्वाभिमानी बनून देणारे बनावे.त्यासाठी ओबीसींच्या राजकीय अपेक्षा व समाजाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठीच प्रामाणिक पणे आणि निरपेक्ष भावनेने समाज इमानदारीने प्रयत्न करा तरच आपण खऱ्या अर्थाने ओबीसी सुतार समाजात समाज नेतेपदासाठी आणि अभिनंदनास पात्र ठराल आणि सामाजिक तसेच राजकीय पटलावर यशस्वी व्हाल.!

✒️प्रमोद सूर्यवंशी(चिखली- मातृतीर्थ बुलडाणा)मो:-8605569521