जग दोन गटात विभागले!

82

इस्राईल आणि पालिस्टाईन यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्षाला तीन आठवड्यापासून अधिक काळ उलटला आहे. या तीन आठवड्यात दोन्ही बाजूंची मोठी वित्ता व जीवित हानी झालीआहे. आजवर जवळपास सात हजारांहून अधिक नागरिक या युद्धात मारले गेले आहेत. तीन आठवड्यापूर्वी पालिस्टाइन मधील हमास या संघटनेकडून इस्राईलवर न भूतो असा हल्ला केला. इस्राईल मध्ये घुसून हमासने केलेला हल्ला अचंबित करणारा होता कारण हमास सारख्या संघटनेकडून इस्राईलवर असा हल्ला होईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती कारण इस्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद ही जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर संघटना आहे. तिला या हल्ल्याची माहिती कशी मिळाली नाही हाच प्रश्न जगातील सर्व राष्ट्रांना पडला होता. अर्थात त्यानंतर इस्राईल ने पालिस्टाईनला जोरदार प्रत्युत्तर दिले.

हमास ही दहशतवादी संघटना आहे त्यामुळे सुरवातीला जगाची सहानुभूती इस्राईलच्या बाजूने होती मात्र जसजशी युद्धाची धग वाढत गेली तसतशी पालिस्टाईन विषयी ही सहानुभूती वाढली कारण इस्राईलने ज्या पद्धतीने पालिस्टाईन ची कोंडी केली ती अनेकांना पसंत पडली नाही. विशेषतः ज्यावेळी पालिस्टाईनच्या एका रुग्णालयावर इस्राईलने हल्ला केला त्यात ५०० रुग्ण दगावले तेंव्हा पासून पालिस्टाईनला ही सहानुभूती मिळाली. मुस्लिम आणि अरब राष्ट्रांसोबत चीन, रशिया, उत्तर कोरिया यांनीही इस्राईल विरोधी भूमिका घेतली. इतकेच काय तर सुरवातीला इस्राईलला जाहीर पाठिंबा देणाऱ्या भारतानेही पालिस्टाईन आमचा मित्र असल्याचे सांगितले. या युद्धामुळे जग दोन गटात विभागले गेल्याने आणि काही केल्या युद्ध थांबत नसल्याने युनोच्या आमसभेने युद्धबंदी ठराव आणला. हा ठराव १२० विरुद्ध १४ असा मंजूर करण्यात आला.

युद्धबंदी करण्यास १२० देशांनी पाठिंबा दिला असला तरी ४५ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले. भारतासह जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, युक्रेन, ब्रिटन यासारख्या प्रमुख देशांनी तटस्थ राहणे पसंत केले. युद्ध बंदी ठरावात हमास या दहशतवादी संघटनेचा उल्लेख न केल्याने या देशांनी तटस्थ राहणे पसंत केले. हमास ही दहशतवादी संघटना आहे तिने इस्राईल वर हल्ला केला त्यामुळेच हे युद्ध सुरू झाले हमासला त्याची शिक्षा मिळायलाच हवी असे या तटस्थ राहणाऱ्यां पैकी अनेक देशांचे म्हणणे आहे. जर हमास संघटनेचा उल्लेख या ठरावात केला असता तर कदाचित भारताने युद्ध बंदीच्या बाजूने मतदान केले असते कारण भारत नेहमीच युद्धाच्या विरुद्ध राहिला आहे. आपल्या देशात सरकारच्या या भूमिकेवर चर्चा होत आहे. विरोधी पक्षांनी आणि प्रसार माध्यमांनी सरकारवर टीका केली आहे मात्र केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे.

भारताप्रमाणेच हे ४५ देश देखील ठाम आहेत त्यामुळे जग सरळ सरळ दोन गटात विभागले गेले आहे. या ४५ देशात युरोप आणि अमेरिका खंडातील अनेक देश आहेत. आशिया खंडातील देखील काही देश आहेत तर हमासच्या बाजूने चीन, रशिया, उत्तर कोरिया यासारख्या युद्ध खोर देशासह सर्व मुस्लिम व अरब राष्ट्रे आहेत यावरून जग दोन गटात विभागले गेले आहे हे स्पष्ट होत आहे.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५५६२९५