ऊसतोड कामगाराची ‘लेक’ ठरली नौदलाची ‘अग्नीवीर’

174

🔹तांड्यावरच्या सुमन चव्हाणची प्रेरणादायी कहाणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1नोव्हेंबर):-घरात दारिद्रय असले तरीही तुमच्या स्वप्नातील ताकद एखाद्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा देते. अशीच एक स्वयंप्रेरित युवती सध्या परभणी जिल्ह्याच्या क्रीडा विश्वात उज्ज्वल करत आहे. सुमन दादाराव चव्हाण असं या खेळाडू युवतीचं नाव असून तिची नुकतीच भारतीय नौदलात ‘अग्नीवर’ म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे संघर्षाच्या अंधारातून उगवली सुखाची नवीन पहाट उगवली आहे.

गंगाखेडच्या शिवाजीनगर तांड्यावरची सुमन मेहनती खेळाडू आहे. व्यायम, सातत्य आणि मेहनतीच्या कष्टावर तिने यशाचे शिखर गाठले आहे. वडील दादाराव आणि आई गंगुबाई गावोगावी भटकंती करून हंगामात ऊसतोड करतात. हंगाम संपल्यानंतर वडील हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक पूंजीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. अशा जीवनचरितार्थाचा असलेली सुमन लहानपणी मातीच्या कच्च्या रस्त्यांवर अनवाणी पावलांनी धावायची. शिक्षणासाठी मग तिनं ‘आनंदवन’ गाठलं. शिक्षण सुरू असतानाच तिला ‘कबड्डी’ खेळात संधी मिळाली.

तिथं राजेश राठोड आणि विलास राठोड यांनी तिच्यातली खेळाडू ओळखली अन् सुरू झाली प्रॅक्टीस. मागील सात वर्षात विविध स्पर्धांमधून सुमनने चमकदार कामगिरी बजावली. त्यामुळे ऊसतोड कामगाराची हि ‘लेक’ नौदलाची ‘अग्नीवीर’ ठरली. परिणामी, तांड्यावरच्या सुमन दादाराव चव्हाणची प्रेरणादायी कहाणी वाखाण्याजोगी आहे.

संघर्ष कुणालाच चुकला नाही तसेच त्याशिवाय आयुष्यात मजा नाही. तरीही सुमनने यशाला गवसणी घालणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण, समाजात बऱ्याचवेळा मुलींना मोठे होताना पारंपरिक रूढी परंपरेचा सामना करावा लागतो. मात्र, संकटांशी दोन हात करत दादाराव चव्हाण यांनी संसार सावरला. सुमनवर विश्वास टाकला. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलांना शिकवले. एखादी गोष्ट जिद्दीने करायची ठरवली तर ती केव्हाही साध्य करता येते, हेच सुमनने दाखवून दिले आहे.

परिस्थितीशी दोन हात करण्याचं बाळकडू आई-वडीलांकडून घेतलेली सुमन प्रामाणिक आणि मितभाषी आहे. खेळाच्या आवडीने तिला देशसेवेची संधी मिळाली आहे.‌ रूबाबदार पांढऱ्या कपड्यात ती उद्या सैनिक म्हणून कर्तव्य बजावेल, तेव्हा तांड्यावरच्या शेकडो लेकींना बळ निश्चित मिळेल. कारण, ‘लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कौशिश करनेवालों की कभी हार नहीं होती’.

दरम्यान, संघर्षमय वाटेवरून सुखाची पहाट शोधलेल्या सुमनच्या पाठीवर शाल टाकून व पेढे भरवून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर यांच्या शुभहस्ते कौतुकाची थाप टाकण्यात आली. यावेळी विलास राठोड, राजेश राठोड, क्रीडाप्रेमी मुख्याध्यापक माणिक नागरगोजे, प्रभाकर सातपुते, कवी विठ्ठल सातपुते, ॲड.अनिल सावंत, माजी नगरसेवक फिरोजभाई पटेल, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, ॲड.राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप राठोड, बाबा पोले, सचिन राठोड, शाम ठाकूर उपस्थित होते.

खेळाने आयुष्यात ‘आनंदवन’ फुलवले आयुष्याचा हा प्रवास सोपा नव्हता. कबड्डी खेळताना किंवा सराव करताना हे काय करते, अशी विचारणा लोक करायचे. असं खेळण्याने कोणाचं भले झाले आहे का? असा टोमणा मारायचे. पण, गुरूवर्य राजेश राठोड, विलास राठोड, माणिक नागरगोजे आणि आई-वडील यांनी वेळोवेळी हिंमत दिली. प्रोत्साहन दिले. त्यामुळे खेळाने आयुष्यात ‘आनंदवन’ फुलवले, असे खेळाडू सुमन चव्हाण हिने सांगितले.

‘आनंदवन’ हि खेळाडू घडविणारी कार्यशाळा
शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आनंदवन क्रीडा मंडळाची स्थापना झाली असून त्या मार्फत दोन शाळा यशस्वीपणे चालविल्या जातात. आजपर्यंत शेकडो मुला-मुलींनी खेळाडू म्हणून घडविण्यात ‘आनंदवन’ यशस्वी झाले आहे. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ‘आनंदवन’ मधील खेळाडू चमकले आहेत. म्हणून ‘आनंदवन’ हि खेळाडू घडविणारी कार्यशाळा आहे, असे गौरवोद्गार क्रीडाप्रेमी मुख्याध्यापक माणिक नागरगोजे यांनी काढले.