

🔸अँन्टीजेन चाचणी मोफत असून निकाल येण्याचा कालावधी फक्त 15 ते 30 मिनिट
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.29जुलै):-जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या काळामध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठी अँन्टीजेन चाचणी सुरू केलेली आहे. आरोग्य सर्वेक्षणात काम करणारे आशा वर्कर, सफाई कर्मचारी, दुकानांचे मालक, दुकानांमध्ये काम करणारे कामगार, ऑटो रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिलांनी स्वयंस्फूर्तीने अँन्टीजेन चाचणी करावी, असे आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजूरवार यांनी केले आहे. अँन्टीजेन चाचणी पूर्णता मोफत असणार आहे.
कोरोनाच्या काळामध्ये जीवाची परवा न करता आशा वर्कर काम करीत आहेत. त्याच बरोबर, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशाची वाहतूक करणारे ऑटो रिक्षा चालक आहेत. या ऑटो रिक्षा चालक अनेक प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी सोडवण्याचे काम करीत असतात. परंतु कोणताही प्रवाशी बाधित असू शकते. दुकान मालक-दुकानात काम करणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा दररोज अनेक नागरिकांसोबत संपर्क येत असतो. त्यामुळे कोरोना बाधित होण्याचे नाकारता येत नाही. अशा काम करणाऱ्या नागरिकांनी अँन्टीजेन तपासणी करून निदान करून घेणे गरजेचे आहे.
शहरात येथे असणार अँन्टीजेन चाचणी केंद्र :-
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेद्वारे अँटीजेन चाचणी केंद्र जटपुरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरु केलेले आहे. चाचणी करण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध आहे.
तपासणीचा निकाल तात्काळ :-
अँन्टीजेन चाचणी केंद्रांमध्ये दररोज 125 ते 200 चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोना चाचण्याचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी केवळ 15 ते 30 मिनिटाचा असतो. त्यामुळे निदान व उपचार करण्याची प्रक्रिया सोयीस्कर झाली आहे.