महात्मा गांधीजींना शरीराने संपवले, ते विचारांनी आजही जिवंत!

115

🔸गांधी हत्या आणि आज या विषयावरील परिसंवादात मान्यवरांचा सुर

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.30जानेवारी):-30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे मानवी शरीर संपविले परंतु आजही त्यांचे विचार मात्र संपवता आले नाहीत असे परखड मत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी नवविचारमंचच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर याठिकाणी अतिशय महत्वाच्या गांधी हत्या आणि आज या विषयावर आयोजित जाहीर परिसंवादात मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, महात्मा गांधीजी यांचे देश विकासातील योगदान मोठे आहे. त्यांची हत्या का व कोणी केली? हे नव्याने समजून घेतले पाहिजे. गांधी हत्या इतिहासातील नियोजित कट होता.
कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने म्हणाले, महात्मा गांधी यांची ज्यांनी हत्या केली ती हिंसक परंपरा आजही चालू आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे एकत्र येणे हे हुकूमशाहीला निमंत्रण देण्यासारखे आहे. गांधीजींना शरीराने संपवले पण ते विचारांने अजरामर व्यक्तिमत्व आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर खोबरे म्हणाले, आज गांधी तत्वज्ञान नव्याने समजून घेतले पाहिजे. त्यांच्या विचारांची जागरण होणे गरजेचे आहे.युवा व्याख्याते अक्षय जहागीरदार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या हत्येसंबंधी चुकीचा इतिहास सांगितला जात आहे हे समाजासाठी घातक आहे. आपण एकत्र येऊन सांस्कृतिक चळवळ उभी केली पाहिजे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. टी. के. सरगर म्हणाले, गांधी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
यावेळी अनिल घाटगे, ॲड. करुणा विमल, डॉ. अमोल महापुरे, संजय कळके, सुरेश केसरकर, भरत लाटकर, हसन देसाई, एम. डी. पाटील, महादेव चक्के, मोहन मिणचेकर, डॉ. निकिता चांडक, डॉ. सुजता नामे, अश्विजित तरटे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. स्मिता गिरी यांनी केले. आभार डॉ. नामदेव मोरे यांनी मानले.