शब्दगंधचा कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार कॉ.नारायण गायकवाड यांना जाहिर

67

 

अहमदनगर : “शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार पारनेर तालुक्यातील पानोली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.नारायण गायकवाड यांना जाहिर करण्यात येत आहे,” अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शनिवार दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी जेष्ठ पत्रकार,विचारवंत विजय चोरमारे यांच्या हस्ते कोहिनुर मंगल कार्यालयात दु.११.३० वा.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ऍड.कॉ.सुभाष लांडे पाटील यांच्या अध्यक्षते खाली होणाऱ्या कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, भारतीय महिला फेडरेशन च्या राज्य अध्यक्षा कॉ.स्मिता पानसरे, जिल्हा सचिव एडवोकेट बन्सी सातपुते उपस्थित राहणार आहेत.
कष्टकरी,श्रमिक,शेतकरी, शेतमजूर,असंघटित कामगार यांच्यासाठी अविश्रांतपणे काम करणारे कॉ.नारायण गायकवाड उमेदीच्या काळापासुन कार्यरत आहेत,त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष पारनेर तालुका सचिव म्हणून ४० वर्षे काम पाहिले असून जिल्हा कौन्सिल सदस्य,राज्य कौन्सिल सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.त्यांनी पानोली गावचे सरपंच म्हणून १९६२ ते १९८७ सलग २५ वर्षे काम केले,१९६२ ते १९७२ दोन टर्म पारनेर पंचायत समिती सदस्य,पारनेर तालुका सहकारी साखर कारखाना संचालक,तालुका दक्षता समिती सदस्य,तालुका जेल व्हिजीटर कमिटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांना २ दिवस जेल झाली होती.कॉ.चंद्रगुप्त चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भुमी मुक्ती आंदोलनात खटोड फार्म, राहूरी येथे सहभाग घेतला होता.यासाठी एक महिना कॉ.चौधरींसह विसापूर येथे त्यांना तुरुंगवास‌ झाला.दुध दर वाढीसाठी नगर-पुणे रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर ३ दिवस विसापूर जेल मध्ये गेले.लोकल सेस दर वाढ विरोधात आंदोलनासाठी कोर्ट उठे पर्यंत शिक्षा झाली.शेतीच्या वीजेसाठी वाडेगव्हान फाटा येथील आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी आंदोलकावर गोळीबार झाला,त्यात ३ शेतकरी शहीद झाले.पारनेर येथे कॉलेज व्हावे यासाठीहि आंदोलन केले. त्यांनी स्थानिक विषयांवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनात सहभाग घेतला.
आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत दुष्काळी गाव हा शिक्का पुसण्याचे काम पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम आखुन,दुष्काळात हाताला रोजगार देऊन गावात चार पाझर तलाव ५५ नाला बंडींग, सीसीटी, गॅबिएन बंधारे चेक डॅम ची कामे केली.टाटा रिलीफ कमिटी सी.एस.आर.डी.सोबत गावात कामे केली. १९७२ ला गावात बालवाडी सुरू केली,१९९९ ला वंदे मातरम शिक्षण व कृषी विकास प्रतिष्ठान,पानोली संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालय,पानोली ची स्थापना केली. २००४ ला माजी आमदार कॉ.बाबासाहेब ठुबे सह.पतसंस्थेची स्थापना केली. कॉ.भास्करराव औटी,कॉ.बाबासाहेब ठुबे यांच्या नेतृत्वाखाली काम केले.
ऊस तोडणी मजुर, महिला,शेतमजूर,कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल पुरस्कार निवड समितीने घेतली,त्यामुळे त्यांना हा पुरस्कार शनिवार दि.२४ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहावे,असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, खजिनदार भगवान राऊत, संयोजन समिती अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, शाहिर भारत गाडेकर यांनी केले आहे.