बारावीच्या पाहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट!

300

🔺बीडच्या सरस्वती विद्यालयाच्या इमारतीवर चढून पुरवल्या कॉप्या

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.21फेब्रुवारी):-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परीक्षा केद्रांच्या बिल्डिंगवर चढून कॉप्या पुरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आला आहे.

बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट!

आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. तरी, देखील बीडच्या तेलगावामध्ये असलेल्या सरस्वती महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थी परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बीडच्या सरस्वती विद्यालयाच्या इमारतीवर चढून पुरवल्या कॉप्या

आज बारावीचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर असून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी बाहेरून कॉप्या करू नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. मात्र, सरस्वती महाविद्यालयाच्या मागील इमारतीच्या मागील बाजूने विद्यार्थी जीव धोक्यात घालून इमारतीवर चढून परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

बीड जिल्ह्यातील 41 हजार 52 परीक्षार्थी

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. बीड जिल्ह्यातील 41 हजार 52 विद्यार्थी यंदा बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. जिल्ह्यात एकूण 102 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून जोरदार तयारीही करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बीडमध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत.

कॉपी करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : शिक्षणमंत्री

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बाराबी परीक्षेती गैरप्रकाराबाबत म्हटलं आहे की, कुठलाही परीक्षार्थी कॉपी करताना दिसला तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे. कॉपी करण्यास कोणी मदत करत असेल तर त्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाणार आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत माहिती घेऊन यासंबंधी पुढील निर्देश मी देईल. कॉपीच्या विरोधात मोहिम आम्ही सुरु केली आहे, असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.