प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळण्यासह देशाच्या विकासातही महाराष्ट्राचे योगदान — आ. देवेंद्र भुयार महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते ध्वजारोहण !

  127

   

  ( वरुड तालुका प्रतिनिधी ) :- १ मे १९६० या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून हा ‘महाराष्ट्रदिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतांनाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, तसेच सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी येथे केले.
  १ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत वरुड तहसील कार्यालय येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
  ‘‘महाराष्ट्र ही संत, शूरवीर, समाजसुधारक, क्रांतीकारक यांची भूमी आहे. राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिहांचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सुपुत्रांप्रती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालते, हे सप्रमाण सिद्ध करणार्‍या कामगार बांधवांना कामगारदिनी शुभेच्छा दिल्या.
  सर्वधर्मसमभाव हे सूत्र अंगीकारून सर्वांना एकत्र पुढे नेणारा आपला महाराष्ट्र आहे. समाजात एकोपा कायम राखूया. पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा तसेच आपल्या मेहनतीतून प्रगतीचा आलेख सतत उंचावत नेणाऱ्या सर्व कामगारांचा सन्मान करण्याचा आज निर्धार करूया असे मत यावेळी आ. देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले. प्रसंगी प्रशासकीय अधिकारी, सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.