मी समाजात बुद्ध पाहिले!

    115


    आता मी ८५ वर्षाची आहे. जेव्हा मला तो काळ आठवतो तो म्हणजे जुने कर्मकांड, देव-देवता, प्रथा यांचा त्याग करून देशात नवी ओळख आणि नवी सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करण्याचा होता. गेल्या ६८ वर्षांत झालेल्या या सर्व सामाजिक बदलांची मी साक्षीदार आहे.त्या काळात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत व समाजसुधारक गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अनेक समाजसुधारकांना मी पाहू शकले. माझ्या आई -वडिलांनी फक्त जन्म देऊन वाढविले,पण महामानव डॉ.बाबासाहेबांमुळे जीवन जगणे म्हणजे काय, स्वाभिमानाचे जीवन म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय या सर्वांचा उलगडा तर झालाच आणि अनुभवायला पण मिळालं.
    माझे बालपण गोसे बुजरूक भंडारा ज़िल्हा येथे गेले. मी जेव्हा लहान होते तर मला आठवते कि वडिलांचे घरी धार्मिक वातावरण होते. घरी नेहमी भजन कीर्तन होत असायची. संपूर्ण महार समाज दिवाळीत लक्ष्मीपूजन जन्माष्टमी, गणपती साजरा करत होता. पण त्या काळी आम्ही कुठल्याही हिंदू मंदिरात जात नव्हतो किंवा हनुमान मंदिरातही जात नव्हतो. आमचे गावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे तीनदा कीर्तन झाले, त्या कीर्तनाला माझे वडील, मी आणि महार समाजाचे इतर लोक दुरून ऐकत होतो.त्या काळात साऊंड सिस्टम नव्हती, त्यामुळे कीर्तनात काय सांगितले ते लक्षात नाही,पण माझ्या लक्षात आहे ती “मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे.” मला गाडगे महाराजांचे कीर्तन पण सतत दोन दिवस ऐकण्याचा योग आला.मी जरी अशिक्षित होती, पण माझे विचार नेहमीच सुधारणावादी होते. परिवर्तनवादी विचार हे माझे वडिल दशरथ वानखेडे कडून मिळाले.
    त्या वेळी लग्न विधी ४ -५ दिवस चालायचे. माझे लग्न पण जुन्या पद्धतीने झाले. लग्न झाल्यानंतर दरवर्षी देव पुजायला जावे लागायचे. मी धानाला (कुही तालुका) गावावरून कामठी येथे दरवर्षी देव पूजन्या साठी जात होते. गावात कुणालाही ताप-ज्वर आला कि मरीआई, मातामाई यांची पूजा करीत होते. संपूर्ण समाज हा अंधविश्वासाने बरबटलेला होता.कान्होबाची पूजा, उपास, देवपूजा, सण साजरे करणे समाजात रूढ होते.
    युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा मला योग आला.भारताच्या स्वातंत्र्य नंतर लगेच 1954 मधे झालेली लोकसभेची पोटनिवडणूक भंडारा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेबांनी लढवली. त्या वेळेस स्वतःच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर पवनी ला आले असताना पहिल्यांदा या थोर युगपुरुषाला पहिले. मी त्यावेळेस पंधरा वर्षांची होते. या प्रचार सभेला पंचवीस हजारचे वर लोक उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब म्हणाले कि, “मला निवडून द्या, आपले झोपडी चिन्ह लक्षात ठेवा”. मतदानानंतर आठ दिवसानंतर मतमोजणी झाली. काँग्रेस आणि प्रजा सोशालिस्ट पार्टी यांचे कार्यालयात फटाके फुटत होते, लोक पेढे वाटीत होते. हवेत उडणाऱ्या गुलालाने सूर्यप्रकाश पण गुलाबमय झाला होता, पण हजारो वर्षांपासून अंधारात राहिलेल्या वस्त्या आणि तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनातला अंधार अधिक गडद झाला होता. आमची आशा,आमचे भविष्य, आमची प्रेरणा निवडणुकीत हारली होती. बाबासाहेब हरल्यामुळे सर्व खेड्या-पाड्यात तीव्र दुःख झाले.
    १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्माची शिकवण अवलंबली तेव्हापासून आमच्या धानला गावात घर-घरात असलेले देव -दैवत नदीत आणि विहिरीत फेकून दिले. हजारो वर्षांपासून पालन करीत असलेले कर्मकांड, देवपूजा, उपास, लग्नपद्धती एका क्षणात झुगारून टाकले,हि केवढी मोठी वैचारिक व भावनिक बदल, ही इतिहासातील मोठी क्रांतीच होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बुद्धाचा संदेश मनात खोलवर रुजला होता.आम्ही पहिल्यांदा गौतम बुद्धांचे नाव ऐकत होतो,आम्ही बुद्धाच्या पुतळ्याकडे, त्यांच्या चित्रांकडे खूप कुतूहलाने पाहत होतो आणि इतके सुंदर चित्र पाहण्याची संधी आम्हाला कधीच मिळाली नव्हती. लोकांनी आपले परिधान पद्धती, खानपान, लग्नपद्धती मध्ये बदल केला तसेच मांसाहार खाणे बंद केले.१९५६ अगोदर मुले -मुलींचे नावे मीरा, सीता,जनाबाई, लक्ष्मी, सरस्वती, एकनाथ,रामनाथ,जयराम, श्रीराम, ईश्वर, ,दशरथ, रामदास, प्रल्हाद, मारोती, मोतीराम, ढेकल्या, वासुदेव, सखाराम, महादेव, किसन अशी देवी देवतांची नावे ठेवायचे. १९५६ च्या धम्मक्रांतीनंतर कांचन, रमा, संगीता, भिमाई, वंदना,अंजली, राहुल,सिद्धार्थ,मिलिंद,अशोक, भीमराव, धम्मा,कश्यप अशी नावे ठेवण्यात आली. लोकांना स्वाभिमानाने जीवन जगणे कळायला लागले. समाज निळ्या झेंड्या खाली एकत्र येऊन सामाजिक बदलाची चर्चा करायला लागला. आमंत्रणविना कोणाकडेही जेवण बंद केले.आपणही माणसे आहोत व आपला विटाळ मानतात, विहिरीवर पाणी भरू देत नाही, आपला स्पर्श पण वर्ज्य आहे हि भावना लोकांमध्ये तीव्र झाली.हे आपल्या मागील जन्माचे फळ आहे असे समजून घेण्यापेक्षा बंडाची भाषा बोलू लागले. लोकांना आपणही मनुष्य आहोत ही पहिल्यांदा जाणीव होताना मी पाहिलं. नेतृत्वहीन असलेल्या समाजात बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचाराचे नेतृत्व पुढे आले. लोकगीते,कीर्तन,तमाशे,भजने यांची पण भाषा बदलून समाजपरिवर्तनाची तसेच समाज प्रबोधनाची भाषा बोलू लागले. हि किती मोठी वैचारिक क्रांती होय.
    आज मी जेव्हा मागे वळून पाहते तर गेल्या ६८ वर्षा नंतर गावा-गावात खूब सामाजिक बदल झालेत. कुणबी, तेली, माली व इतर समाजाचे लोक आता लग्नामध्ये एकत्र जेवण करतात, आपसातील प्रेमभावना वाढली आहे, एकमेकातील भेदा-भेद फार कमी झालेत.नवी पिढी आंतर-जातीय विवाह व एकमेकाकडे जाणे-येणे, खान-पान स्वीकारत आहे. जातीने दुभंगलेली गावे एकोप्याने नांदत आहेत.हे खऱ्या अर्थाने राष्ट्र प्रगतीचे लक्षण होय. “सोडून जाती-पाती माणसांना जोडले,बावीस प्रतीज्ञामुळे, आम्ही देव धर्म सोडले.”
    मनोगत : श्रीमती पुष्पा वासनिक -9891901316.
    शब्दांकन :डॉक्टर कृपाकर वासनिक,नवी दिल्ली
    Kpwasnik2002@gmail.com,