त्या झाडांची सुरक्षा वाऱ्यावर ; बांधकाम विभागाने हात झटकले ?

    169

    साकोली:-
    सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या कामांमुळे अनेक झाडांचे नुकसान झाले. मात्र उर्वरित झाडांची सुरक्षा धोक्यात आली असून साकोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले हात झटकल्याने संपूर्ण झाडांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. प्राप्त माहितीनुसार एकोडी चौक ते तलाव वॉर्ड असा बायपास रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या रस्त्यावरील तलाव पाळीवर नगर परिषदेतर्फे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तलाव पाळीवर गिट्टी पीचींगचे काम सुरू आहे. या पाळीवर पिचींग करिता मोठ मोठे दगड टाकण्यात आले. मात्र या दगडामुळे ५ वर्षापासून जोपासलेल्या अनेक झाडांचे जागतिक पर्यावरणाच्या दिवशी नुकसान झाले. या मोठ मोठ्या दगडामुळे झाडाच्या सुरक्षेसाठी लावलेले बासाचे कठडे दगडाखाली पिचल्या गेले. त्यामुळे या झाडांची सुरक्षा धोक्यात आली. जनावरापासून ही झाडे सुरक्षित राहावी म्हणून मोठ्या प्रमाणात बासाचे कठडे तयार करून लावण्यात आली होती. मात्र झाडे तर गेलीच पण कठडेही गेलीत. निदान उर्वरीत झाडांसाठी तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडांना सुरक्षित करून द्यावे. या पाळीवर जवळपास १ ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत विविध प्रकारची ८० ते ९० झाडे लावलेली आहेत. अशातच बांधकाम विभागाने गिट्टी पिचिंगचे काम सुरू केले. त्यामुळे उर्वरित झाडांची सुरक्षा धोक्यात आली आहे. बांधकाम विभागाने काम होईपर्यंत या झाडांना सुरक्षा पूरवावी अशी मागणी पर्यावरण समितीने केली आहे. अन्यथा काम बंद करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असा सुचक इशारा पर्यावरण समितीचे पदाधिकारी अँड.मनीष कापगते, किशोर बावणे, आशिष शेडगे आणि रवि भोंगाने यांनी दिला आहे.