भारतीय संविधान आणि भारतीय जनता

31

भारतीय संविधाना विषयी भारतीय जनता भावनिक वा आदरणीय नाही आहे. म्हणून तर भारतीय संविधानाचा वारंवार अवमान होऊन देखील देश पातळीवर भारतीय जनता म्हणून लोक संविधानाचा अवमान झाला तर निषेध करत नाही. मुळात भारतात एक कटू सत्य आहे अपवाद वगळता भारतीय लोक संविधानाच्या ज्ञानापासून आजही दुर राहीलेले आहेत. देशामध्ये जेव्हा जेव्हा भारतीय संविधानाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा विशिष्ट समुहच समोर येतो पण संविधान भारताचे आहे म्हणून भारतीय जनता संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेली दिसली नाही. बहुसंख्य लोकांनी तर संविधान वाचलेच नाही ज्यांनी वाचले त्या पैकी बऱ्याच लोकांना संविधान समजले नाही असे माझे मत आहे. जर संविधान वाचले असते, संविधान समजले असते तर प्रत्येक भारतीय नागरिक संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरला असता किंबहूना संविधानाचा अवमानच झाला नसता. परंतु आजही शिकलेल्या आणि डोक्यात जातीची घाण असलेल्या, मेंदूचा वापर न करणारे लोक सुद्धा संविधान एकाच जातीची संपती आहे गृहीत धरतात. कितीतरी लोकांना संविधानाचा कोणी अवमान केला तरी काहीच फरक पडत नाही हे लोक देशाचे नागरिक कसे असु शकतात? हा साधा प्रश्न कोणाच्या ही डोक्यात येत नाही. संविधानाने विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, आपण आपले मत व्यक्त करू शकतो, संविधानाने आपापल्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले, आपण अभिव्यक्त व्हावे, धर्माची उपासना करावी हा संविधानीक अधिकार असला तरी संविधानाचा अवमान करणे हे कोणते देशप्रेम आणि ही कोणती नितीमत्ता आहे? संविधानाचा जाणीव पुर्वक अवमान केला जातो पण जेव्हा संविधानाचा अवमान होतो तेव्हा एक समुह सोडून ईतर समुह गप्प बसतात याचा अर्थ ते कदाचित भारतीय संविधानाला मानत नसतील. आणि जे संविधानाला माणत नाहीत ते भारतीय कसे? त्यांच देशावर प्रेम आहे असं कस म्हणता येईल? भारतीय लोकांना भारतीय संविधान समजून घेणे महत्त्वाचे आहे.

काही लोकांना भारतीय संविधान एका धर्माचा धार्मिक ग्रंथ वाटतो, तर काहींना एकाच समुहाच्या विकासाचे साधन वाटते. भारतीय संविधान देशाच्या हिताचे आहे, आणि संविधान एका जातीच्या वा धर्माच्या मालकीचे नाही कसे समजणारा वर्ग संख्येने खुप कमी आहे. देशाचे सर्वोच्च असे संविधान असताना त्यांच्या विषयी अपशब्द बोलणे, आपल्या कृतीमधून संविधानाला कमी लेखणे अशा प्रकारचे अनेक प्रकार आज देशात घडत आहेत. एकीकडे बहुसंख्य लोकांना संविधाना बद्दल आपुलकी नसताना दुसरी कडे एका समुहाला संविधाना विषयी प्रचंड आपुलकी व प्रेम आहे. संविधानाच्या विरोधात कोणी काही लिहले, बोलले वा कृत्य केले तर आक्रमक भुमिका घेणारा एक वर्ग आहे. हा वर्ग संविधाना बद्दल एवढा संवेदनशील आहे की त्यांच्या लक्षात जर आले कि एखाद्या व्यक्तीकडून, संस्थेकडून संविधानाचा अवमान झाला तर लगेच सोशल मिडीयावर अवमान झाल्याचे पुरावे एवढ्या जलद गतीने शेअर करतात की क्षणात आवमानाचे फोटो सत्कारा सारखे शेअर करतात. प्रत्येक जण आवमानाचा फोटो शेअर करतो आणि खाली लिहीलेले असते एवढे शेअर करा कि या हरामखोराला अटक झाली पाहिजे. मला अजूनही एक गोष्ट कळत नाही अवमानाची पोस्ट शेअर करून आरोपींना अटक होते का? काही लोक सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन अरेरावी आणि अश्लील भाषेत समाचार घेतात, त्याने जर संविधानाचा अवमान केला तर तो संविधान विरोधी आहेच पण त्याला शिवीगाळ करून धमकावे, ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणे हे कोणते संविधानीक काम आहे? आम्ही संविधानाचा सन्मान करतोय तर आमचे वागणे सुद्धा संविधानीक नको? एखाद्या ने जर संविधानाचा अवमान केला आणि आपण त्याला असंविधानीक भाषेत उत्तर दिले तर आपल्याकडून संविधानाचे पालन होते? जर आपल्याकडून संविधानाचे पालन होत नाही तर दूसऱ्या कडून संविधानाचे पालन व्हायला पाहिजे ही अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? संविधानाचा अवमान झाला तर सोशल मिडीयावर धुमाकूळ सुरू होतो, दोन चार दिवस सुरुच राहते पण हळूहळू तिव्रता कमी होते आणि सर्वांना विसर पडतो. मग आता विषय आहे संविधानाचा अवमान झाला तर सदर आरोपींना मोकाट सोडून शांत बसायचे का? तर मुळीच शांत बसायचे नाही. फक्त एवढेच करायचे भडकाऊ, असंविधानीक, अवमानाचे फोटो शेअर न करता जेथे कोठे संविधानाचा अवमान झाला असेल तर सर्वात अगोदर ज्याला समजले त्याने रितसर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात FIR दाखल करावा आणी FIR चा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल करण्याचे आवाहन संविधानीक पद्धतीने करावे म्हणजे त्याच्यावर राज्य व राष्ट्रीय पातळीवरून दबाव येऊन कारवाई होते आणि एकदा अशी कारवाई झाली तर पुन्हा तसे कृत्य करण्यास कोणाची हिंमत होत नाही. परंतु सध्या काय होत आहे कोणी अवमान केला तर त्याला एवढे शेअर करतात, अवमान करणारा झिरो जरी असला तरी त्याला हिरो करून टाकतात, एवढी प्रसिद्धी दिली जाते, उलट कुठेच गुन्ह्याची नोंद नसल्याने त्या व्यक्तीवर कारवाई सुद्धा होत नाही. आणि म्हणून अवमान करणाऱ्या लोकांवर दबाव निर्माण होत नाही उलट त्यांना प्रोत्साहन दिले जाते. सोशल मिडीयावर संबधीत व्यक्तीला फॉरवर्ड करून नाही तर संविधानीक मार्गाने जाऊन आपण शिक्षा देऊ शकतो. म्हणून संविधान समजून घेणे गरजेचे आहे. येथे असे दिसते संविधानाच्या निषेधार्थ प्रतिक्रिया देणारा समुह आणि न देणारा समुह या दोन्ही समुहानी संविधान वाचले नाही वा समजून घेतले नाही म्हणून संविधाचा अवमान झाला तरी त्यावर संवैधानिक कार्यवाही होत नाही याचे कारण आपण त्यांना संविधानीक प्रक्रियेमध्ये आणतच नाही. ज्या लोकांना संविधान थोडेफार कळाले आहे त्यांनी संविधानीक बाजु प्रभावी पणे मांडलेली दिसत नाही. म्हणून तर संविधानाचा अवमान करणारे खुलेआम फिरत आहेत.
संविधानाचा वा महापुरुषांचा अवमान झाला तर सोशल मिडीयावर जोरजोरात बोलणारे, त्यांचे फोटो शेअर करणारे लोक म्हणतात आरोपीवर आम्ही दबाव आणला आणि अवमान करणाऱ्या आरोपीने माफी मागितली , पुन्हा त्यांच्या माफीचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरवून त्याला मोठे करण्याचा प्रयत्न केला जातो. अवमानाचे फोटो व्हायरल करून नेमका कोणता उद्देश साध्य होतो हेच कळत नाही. अवमान पुढे पुढे पाठवून तो जास्त अवमान होतो याचा विसरच पडलेला असतो. जर अवमान करणाऱ्या आरोपीकडून माफीच माघुन घ्यायची तर मग सोशल मिडीयावर एवढा विरोधाचा रोष कशाला? माफी मागुन सन्मान होत नाही तर इतर मानसिक अपंग लोकांना प्रोत्साहन मिळते म्हणून आता माफीनामे बंद करून कायदेशीर कारवाईला सामोरे जाणे गरजेचे असताना संविधाचा सन्मान करणारेच जर संविधानाचा आधार घेणार नसतील तर मग नेमके संविधान कोणासाठी? संविधानाचा आधार न घेणे म्हणजे संविधाचा सन्मान का? या सर्व गोष्टी तेव्हा च लक्षात येतील जेव्हा संविधान कळाले असेल. बरं संविधाना विषयी कोणी काही बोलले, काही संविधानाच्या सोबत प्रत्यक्ष काही केले तरच संविधानाचा मुद्दा समोर येतो वा संविधानाचा अवमान वाटतो. परंतु शासकीय पातळीवर संविधान पायदळी तुडवून निर्णय घेतले जातात तेव्हा आपण आक्रमक होत नाही, संविधानीक पद्धतीने काम होत नाही तेव्हा आपण आक्रमक होत नाही, संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारावर निर्बंध आणले जातात तेव्हा आक्रमक होत नाही. याचाच सखोल विचार केला तर असे दिसते संविधानाचा सन्मान केला करणाऱ्या लोकांणाच संविधान कळाले नाही. म्हणून विशिष्ट समुह संविधानाला धर्माशी जोडून संविधानाकडे धार्मिक दृष्टीने बघितलं जाते. आज भारतीय जनतेला भारतीय संविधान कळालेच नाही. ज्यांना कळाले त्यांनी प्रत्येक भारतीय जनतेला संविधान साक्षर करणे गरजेचे आहे. संविधान साक्षर भारत निर्माण करण्यासाठी भारतीय तरुण तरुणींनी एकत्र येऊन देश मजबूत करणे गरजेचे आहे. आज भारतीय संविधान व भारतीय जनता संविधानापासुन दुर आहे मग ते संविधान साक्षर असो, हक्क अधिकार असो. देशाचे संविधान देशातील जनतेच्या मनात रुजवण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.

                                        ✒️विनोद पंजाबराव सदावर्ते
                                               रा. आरेगाव ता. मेहकर
                                                    मो:-९१३०९७९३००