पूरग्रस्तांसाठी सुरू आहे संघाचे प्रशंसनीय कार्य

    36

    ✒️रोशन मदनकर(ब्रम्हपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रह्मपुरी(दि.6सप्टेंबर):-कुठल्याही प्रकारच्या आपत्तीच्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आघाडीवर असतात. याचा प्रत्यय ब्रम्हपूरी तालुक्यातील पूरगस्तांच्या मदत कार्यात सर्वांना येत आहे. गोसेखुर्दचे पाणी मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत सोडल्याने आलेले भविष्यातील संकट ओळखून अगदी सुरूवातीपासूनच स्थानिक संघ स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदत कार्यात कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता स्वत:ला मदत कार्यात झोकून दिले आहे.

    पूरस्थिती बिकट होती. गावागावात पूरग्रस्त अडकून पडले होते. त्यांना भर पूरामध्ये प्रशासनाकडून आलेले पिण्याचे पाणी, शिजवलेले अन्न, आपत्ती व्यवस्थापन दलासोबत बोटींवर चढवणे हे काम सोपे नव्हते. वडसा मार्गावरील टिळक विद्यालयाजवळून पाणी चारचाकी वाहनाने आमले राईस मिलपर्यंत न्यायचे. तेथे बोटींवर पाणी आणि साहित्य चढवायचे. त्यानंतर पूल ओलांडून बोट नवेगावपर्यंत न्यायची. तेथून ते साहित्य कोथूळना रस्त्यावर ट्रॅक्टरमध्ये चढवायचे. ट्रॅक्टरने पिंपळगावला जायचे त्यानंतर पुन्हा बोटीने लाडज, चिखलगावला साहित्य न्यायचे. बोटी परत येताना तेथील पूरग्रस्तांमधील महिला रुग्णांना प्राधान्याने ब्रम्हपुरीकडे हलवायचे अशा सर्व कामात संघ स्वयंसेवक प्रशासनासोबत होते.

    प्रशासनाकडून पूरग्रस्तांसाठी अन्न शिजवून दिल्या जात होते. या अन्नाचे पॅकेटस तयार करण्यासाठी संघ परिवारातील विविध संघटनांचा सहभाग होता. विशेषत: महिला, विद्यार्थी, स्वयंसेवक, राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या प्रामुख्याने यात सहभागी होत्या. लाडज, बेटाळा, भालेश्‍वर, किन्ही व इतर अनेक ठिकाणी संघ स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापन चमूसोबत पूरग्रस्तांच्या मदत कार्यात सहभागी झाले. पूर तर ओसरला आता गावागावात पडलेल्या घरांचा मलबा, साचलेल्या गाळाने गावाची स्थिती भयावह आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या गळामुळे घरे, मंदिरे, बौध्दविहार, बोअरवेल व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे.

    त्यामुळे सर्वत्र आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रोगराईची साथ निर्माण होऊ नये म्हणून आता रा. स्व. संघ डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समितीच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेच्या कामी लागले आहेत. ब्रम्हपुरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील स्वयंसेवक यात सहभागी होत आहे. शुक्रवारी सकाळपासून या कामाला प्रारंभ झाला. प्रत्येकी 20-20 संख्येतील स्वयंसेवकांनी आज बेलगाव आणि रनमचन, पिंपळगाव, कीन्ही, बेटाळा, पारडगाव येथे सकाळपासून स्वच्छता मोहीम राबविली. रवीवारीही हे कार्य सुरूच राहणार असून, अन्य पूरग्रस्त गावात स्वयंसेवक पोहचणार आहेत.

    यासोबतच शनिवारपासून डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे फिरते रुग्णालय व वैद्यकीय सेवांकुर चमूद्वारे संघ स्वयंसेवक विविध पूरग्रस्त गावातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार आहे. या सेवा यज्ञात अनेक जण आपले योगदान देत आहेत. राष्ट्र सेवा समितीने पूरग्रस्त नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता निधी उपलब्ध करून मदत केली. जिवनाश्यक साहित्याचीसुध्दा जमवाजमव सुरू आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पडेल ते कार्य करण्यासाठी संघ स्वयंसेवक तत्पर आहेत. संघाचे हे कार्य प्रशंसनीय असल्याची चर्चा सर्वत्र आहे.