🔹शाहूपुरी आघाडीच्या ग्रा.पं.सदस्यांनी केली मासिक भत्ता रकमेतून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन खरेदी

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.20सप्टेंबर):-कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर भयभीत झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी परिसरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना लागेल ते सहकार्य करणे ही जबाबदारी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीकृत  ‘ॲंटी कोरोना समन्वय कृती समिती शाहूपुरीची ‘ निर्मिती करुन या समितीमार्फत पार पाडली जात आहे.

सद्यस्थितीतही संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सातारा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे संबंधित रुग्णांना कोणत्याही दवाखान्यात सहजपणेजागाही उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे. परिणामी ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी आहे अशांना ऑक्सिजनची उपलब्धता न झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक समाजोपयोगी उपक्रमांत अग्रेसर असलेल्या शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे वतीने ज्या होम आयसोलेटेड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिनची गरज आहे अशांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य अनुक्रमे श्री.राजेंद्रकुमार मोहिते, श्री.नवनाथ जाधव, श्री.सुहास वहाळकर, सौ.शोभाताई राजेंद्र केंडे, सौ.निलमताई विकास देशमुख, सौ.माधवीताई सुरेश शेटे या आपल्या ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या सदस्य पदाच्या कारकिर्दीतील आपापल्या वाट्याचा सर्व मासिक भत्ता या मशिन खरेदीसाठी देऊ केल्याने ही सेवा रुग्णांसाठी यास्थितीत देणे शक्य झाले असल्याची* माहिती आघाडीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आलेली आहे.तसेच , या सामाजिक उपक्रमासाठी ज्यांना शक्य आहे अशांनी सहभागी व्हावे असेही आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED