?आजपर्यंत 36 लक्ष 65 हजार रुपयावर दंड वसूल
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.22सप्टेंबर):-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाने कारवाई करत दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत 15 हजार 632 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 31 लाख 16 हजार 140 रुपयांचा दंड वसूल केला आहे.तर सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 355 नागरिकांकडून 49 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.तर इतर कारवाई करत 5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून असे एकूण 36 लाख 65 हजार 910 रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने कारवाई करत वसूल केलेला आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काढलेल्या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे. अशा जागेच्या ठिकाणी थुंकणेस मनाई असून, थुंकल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
दंड आकारण्याची कारवाई चंद्रपूर शहर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत 23 एप्रिल पासून करण्यात येत आहे.
असे आहे वसूल केलेल्या दंडाचे विवरण:
दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपुर अंतर्गत 3 हजार 254 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 6 लाख 49 हजार 40 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 280 नागरिकांकडून 31 हजार 50 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 66 हजार 900 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 7 लाख 46 हजार 990 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.
नगरपरिषद, नगरपंचायत अंतर्गत 7 हजार 938 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 15 लाख 82 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 67 नागरिकांकडून 15 हजार 150 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 2 लाख 76 हजार 870 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 18 लाख 74 हजार 620 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.
गटविकास अधिकारी कार्यालयांतर्गत 4 हजार 440 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 8 लाख 84 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 8 नागरिकांकडून 3 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 1 लाख 56 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 10 लाख 44 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.