बालपण

30

“मुलींनाही असतं मन,
जपावे तयांचे बालपण”

एकदा मी आईसोबत बाहेर हॉटेल मध्ये गेले होते. तिथे मी एका छोट्या मुलाला काम करतांना बघितले. त्याला बघून माझ्या मनात अनेक विचार आले. मग मी माझ्या आईला विचारले की,आई बालपण म्हणजे काय गं?काय असतं हे बालपण,आणि ते कसं जोपासायचं असतं ते मला सांग.
त्यावर ती म्हणाली, ऐक तर मग,तू झालीस तेव्हा अनेकांनी नाक मुरडले,पण मी नाही. तुला माझ्या कुशीत बघून ही गुलाबाची नाजूक कळी बघून आनंदाश्रू टपकलेत बघ माझ्या डोळ्यातून. तुझ्याकडे स्मित करुन बघत होते. तू पोटात असतांना स्वप्नात येऊन मला म्हणत होती की,आई मला हे सुंदर जग बघायचं आहे.

तुझ्या कूशीत झोपायचं आहे. तुझ्याकडून मला माझे बालपणाचे लाड पूर्ण करुन घ्यायचे आहे. ‘आई’ या कळीला फुलायचे आहे. ‘आई’ तर मग दाखवशील ना मला हे जग!कुणी नाही विचारलेस मला तरी चालेल पण , तू जवळ करशील ना मला. काही नकोस मला फक्त बालमन जपशील ना माझं. सांग ना आई? असा प्रश्न केला होतास तू. जेव्हा तू माझ्याकडे स्मित हास्य करुन बघत होती तेव्हा तू हेच म्हणत असशील की,Thanks ‘आई’ मला या सुंदर जगात प्रवेश दिल्याबद्दल.

तुझं ते गालातल्या गालात गोड हसणं हळू-हळू सर्वांना आवडायला लागलं. सर्व तुझे लाड करायला लागले.बघता -बघता तू एक वर्षाची झाली. पहिलं पाऊल टाकतांना तू माझ्याकडे झेप घेतली, वाटलं होतं अलगद उचलून घ्यावं,पण नाही. मी माझ्या बोटाचा आधार दिलास तुला चालायला. तू चालायला शिकली. संपूर्ण घरभर दुडू-दुडू धावायची. तुला धावतांना बघून कुठेतरी ठेच लागून पडेल या विचाराने भीती वाटायची मनात. कारण आईचं मन. माझा पदर धरुन अवती-भवती फिरायचीस तू. हळू-हळू तीन वर्षाची झाली. आतापर्यंत आई,घर आणि घरातील माणसे हेच तुझं जग. आजही मला आठवतो, तुझा तो शाळेतील म्हणजेच नर्सरीचा पहिला दिवस. तुला शाळेत घेऊन गेले, तेव्हा तू मला सोडायला तयार नव्हती. मग मी तुझ्याजवळ बसले. तू समोर मी मागे. आणि अलगद नजर चुकवून तुला सोडून आले.

पण अगदी खरं सांगू का बाळा?मन मानत नव्हतं. तुला धोका देऊन असं निघून यायला. तुलाही वाटलंच असेल की, किती ही निष्ठूर ‘आई’,मला या अनोळखी जगात एकटीच सोडून गेली,पण बाळा मी जरी सोडून गेले तरी माझं मन मात्र तुझ्यातच तरंगत होतं. जोपर्यंत मी तुला माझ्या हातचा पहिला चिऊ-काऊचा घास भरवत नाही तोपर्यंत तू अन्नाला स्पर्श सूध्दा करायची नाही. मग तिथे माझ्या बाळाला घास कोण भरवणार या विचाराने तू येईपर्यंत अन्नाचा कणही माझ्या घशात उतरायचा नाही बघ. बाळ कधी घरी येणार याकडेच डोळे लागलेले असायचे. तू सर्वांची लाडाची होती. तुला खेळणी खेळायला भरपुर मिळाली. तुझ्या अंगावरचे ते रंगीबेरंगी फ्राक बघून तर तू जणु परिच भासत होती. सर्वांना तू हवीहवीशी वाटायची. कुणाची तुला नजर लागली, तर तू आजारी पडायची. तू आजारी पडली तर माझा रात्रभर डोळा लागायचा नाही बघ. कारण आईचं ‘प्रेम’. तुझा प्रत्येक वाढदिवस आम्ही थाटामाटामत साजरा केला. आता तर तुला समजतेस आहे.
त्यांवर मी म्हणाले:-हो आई,आता मी समजदार झाले आहे.
आई तू तर माझी माय।पण ही स्कूल तर माझ्यासाठी दुधावरची साय।आई तू मला प्रेम दिले।पण,या स्कूलनी मला ज्ञान दिले।’आई’रात्र तुझ्या पोटाशी। पण दिवसा मात्र माझे नाते या शाळेशी। आई माझं बालमन तू जोपासलस। मात्र बालदिन साजरा करुन या स्कूल ने मला आपलसं केलंस ..

बालमन हे सर्वांच्या आईवडिलांनी जोपासायला पाहिजे. बालपणापासून मुलांना कामाला न लावता त्यांच्यावर योग्य संस्कार देऊन त्यांना उच्चशिक्षित केले पाहिजे.
पहिल पाऊस पडला की, माझी आई पण मला पावसाचा आनंद घ्यायला शिकवते. कागदी नावा करुन पाण्यांत सोडायला मदत करते.
रोज सकाळी उठून बाहेर फिरायला जावे.
उघड्यावरचे काही खाऊ नये.
प्राणीमात्रांवर दया करावी.
चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या.
मुलांनी भरपूर मैदानी खेळ खेळावे.
भरपुर अभ्यास करावा.
मुले ही देवाघरची फुले असतात.
हे ज्याला लाभतं त्यालाच ‘बालपण’असे म्हणतात. हे सर्व मला लाभलं तसं इतरांनाही लाभावं. 

✒️लेखिका:-दिपाली राजेश चावरे
मळवेशपूरा,अचलपूर सिटी
अचलपूर, जि. अमरावती
मो:-९५५२८०६२६०

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620