मी शेतकरी बोलतोय

188

माझ्या माय बापहो,भारत हा कृषि प्रधान देशाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची थट्टा ऐकायची तुम्हाला! तर मग ऐका.
मी एक अल्पभूधारक शेतकरी. त्यात दुष्काळ, नापीकीच्यानं सतत विचारात मग्न असतो. दिवसभर शेतात घाम गाळुन थकलेला घरी परत येतो. एक दिवस घरी परत आल्या आल्या मायी चिमुरडी पोरगी बाबा आले,बाबा आले म्हणत मले चिपकली. आन् म्हणली,”बाबा,बाबा आज मले लई भूक लागली व्हती पण,मायनं मले अर्ध्याच भाकरीवरुन उठवलं. माय म्हणे,उद्या पोटभर जेवजो म्हणे. खरंच काहो बाबा,मले उद्या पोटभर जेवाले भेटन काय? सांगा न बाबा, सांगा ना”.
शेतकरी:-(रडवलेल्या,काळजीच्या स्वरात )होय पोरी ,तुले उद्या नक्कीच पोटभर जेवाले भेटणार हाय.
(तेवढ्यात मोठा पोरगा माया जवळ आला)
पोरगा:-बाबा, बाबा माह्य शायेत नाव कवा टाकणार हाय. मले पाटी,लेखन,पुस्तक कवा घेऊन देणार हाय. मले चांगल्या शायेत शिकून लई मोठ्ठ व्हायचंय बाबा. सांगा न हो बाबा, माह्य शायेत नाव टाकान बाबा.
शेतकरी:-व्हय पोरा ,टाकू. तुय नक्कीच शायेत नाव टाकू.
(मंग लहान पोरगा येतो)
लहान पोरगा:-बाबा,बाबा म्या उघडा किती दिस फिरू. मले माणसं,पोरं हासत्यात. मले माई लई लाज वाटते. मले कपडे कवा घेऊन द्यान?सांगा न बाबा.
शेतकरी:-घेऊ पोरा तुले कपडे बी घेऊ.
लहान पोरगा:-नक्की ना बाबा.
शेतकरी:-व्हय पोरा.
(मंग काही वेळानं मायी म्हातारी माय माह्याजवळ येऊन बसली,अन् आपलं फाटकं लुगडं दाखवत मनली)
माय:-बाबू पोरा, माह्य लुगडं गाठी पाडून पाडून चूर चूर झालंय. आणखी किती गाठी पाडू म्या. मले एक लुगडं कवा घेऊन देशीन. बाबू,काय बी करजो पण मले एक लुगडं आणजो. आणशीन बाबू.
शेतकरी:-होय मायी माय.
(तेवढ्यात काठई टेकवत टेकवत माया बाप घरात आला, अन् मले म्हणला)
बाप:-बाबू बाहेरचे उन्हाचे चटके पायाले सोसत नाही रे. बकऱ्या चाराले जातो तवा पायाले काटे बोचते. म्हणून म्हणतो माह्यासाठी एखादी चप्पल आणजो रे बाबू. आणशीन न बाबू. एवढं तरी काम करशीन नं बाबू?
शेतकरी:-होय बाबा. तुमाले चप्पल बी आणन.
(तेवढ्यात घरातून माह्या बायकोनं माह्यासाठी पाणी प्यायले आणलं मी पाणी प्यायलो. मंग बायको मले म्हणली)
बायको:-धनी,अव धनी. माया पोटाचं दुखणं लई वाढलया. आपरेशन केल्या बिगर जमायचं नाय,असं डाक्टर म्हणला. तवा मले सांगा, ऑपरेशनसाठी पैसा आणायचा कुठून? तूमी तं मायी गोष्ट कानावरच घेऊन नायी रायले. म्या कायी म्हणलं का म्हणता,” आपलं वावर पिकू दे मंग आपरेशनचं पाहू.” आता मले सांगा आपलं वावर कवा पिकणार हाय?अन् चांगले दिस कवा येणार हाय?आणखी किती दिस वाट पायची म्या?तुमीच सांगा बाप्पा. मले त् काय बी समजत नाय. माय वं. आरं देवा असं म्हणत ती निघून गेली.
शेतकरी:-समोर दु:खाचा डोंगरच उभा दिसला.
उघड्या डोळ्यानं पावल्या जात नव्हतं घरातलं अठराविश्व दारिद्र्य. सावकाराच्या ताब्यात जमीन गेली हेही सांगायची हिम्मत होत नव्हती. काय कराव काहीच समजत नव्हतं. तवा तसाच ताडकन उठून शेतात गेलो. देवाले विनवणी करत मनलं देवा…….
देवा असा कसा रे मी शेतकरी
दोन वेळची पुरेशी मिळत नाही भाकरी
आता नकोशी झाली रे ही जिंदगाणी करशील का जरा माझ्यावर मेहेरबाणी
उन्हातान्हात कष्ट करुन केलं रक्ताचं पाणी
सावकाराकडून कर्ज काढून पेरली बियाणी
इंद्रराजा बी रुसलाय माह्याकडं पाहून
धरती मायनं,मायं बी- बियाणं टाकलं खाऊन
अठराविश्व दारिद्र्य माया घरात आलं
व्हतं नव्हतं सारं काही घेऊन गेलं
बायको माह्यावाली बिमारीले झुरते
लेकरं माह्ये उघड्यावरच फिरते
माय त् लुगड्याले रोजंच गाठी बांधते
बाप त् गावात अनवाणीच फिरते
साऱ्यासाठी माया लई जीव दु:खते
म्हणूनच मले नको ही जिंदगाणी वाटते
जसं सावकाराचं व्याज लई वाढते
तशी सावकाराची ढेरी लई फुगते
जशी व्याजाची मुदत संपून गेली
तशीच माह्यावाली जमीन हडप केली
आता मात्र मी विसरलो सारी भूख
माह्या जीवनातलं संपलं सारं सूख
स्वप्न रंगवता- रंगवता बरबाद झाली जिंदगाणी
आता मात्रदेवा तूही कधी करणार नाही मनमानी
कायमचा राम-राम ठोकतो अखेरच्या क्षणी
नको ही जिंदगाणी, नको ही जिंदगाणी
(काळ्या आईचं शेवटचं दर्शन घेऊन फासाला लटकतो)
(घरच्यांना माहिती होतं सगळे रडायला लागतात.)पोरं म्हणतात,”बाबा,बाबा उठानं ,तुम्ही आम्हाले पोरके करुन कसे काय जाऊ शकता? बाबा”. मायी बायको हंबरडा फोडत म्हणते,”धनी हे काय केलंय तुम्ही. आम्हाले सोडून गेलात. आता आम्ही कोणाकडं पाहू?आता आमचं कसं होणार?आता आम्ही कोणासाठी जगायचं?आम्ही कुठं जाणार?काय करणार?देवा असं कसं झालं रे. मायच्या तर तोंडातून शब्दच फूटत नव्हता. बाप ढसाढसा रडत रडत सरकारले उद्देशून म्हणत होता …..
कोणी नाही कोणाचं
हे सरकार काय कामाचं
अश्याप्रकारे माझा करुण अंत होतो.
मित्रांनो,
होय,मीच तो अभागी फासावर लटकलेला शेतकरी. मी तर मरण पत्करुन मोकळा झालो. पण माझा आत्मा मात्र आजही इथेच घुटमळत आहे. कारण उघड्यावर पडलेल्या माझ्या फाटक्या संसाराला जोपर्यंत हे सरकार भीक घालणार नाही,तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती कशी मिळणार?
वर्षभर शेतात राबराब राबून, घाम गाळुन, काबाडकष्ट करुन सुध्दा माझ्यासारख्या शेतकऱ्याची अवस्था भिकाऱ्यापेक्षा कमी नाही. भिकाऱ्याने. हात पसरले तर त्याला दोन वेळ पोटभरण्यापुरते आरामात मिळू शकते. पण वर्षभर शेतात घाम गाळुन पिकवलेला आपला कापूस विकण्यासाठी शासनाच्या दारात भीक मांगतो,पण भीक घालायला कुणीच नाही. भारत हा कृषि प्रधान देशाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची ही थट्टा! मला सरकारला उद्देशून सांगावसं वाटते की,ज्या शेतकऱ्याच्या भरवश्यावर तुम्ही पोटभर जेवण करता,मजा मारता तो शेतकरी उपाशी का मरतो?तुम्ही म्हणता ,आम्ही शेतकऱ्यासाठी या योजना राबवतो त्या योजना राबवतो. मग त्या आमच्यापर्यंत का पोहचत नाही? आम्हा शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही कधी जणू घेणार ?आपला संसार असा अर्ध्यावर सोडून आम्ही फासाला का लटकतो?आम्हांला जगण्याचा अधिकार नाही का?यावर उपाय योजना म्हणून शासनाने आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी गावागावात दूष्काळी मदत पथके स्थापन करावी. कोणत्याही निर्णयाची प्रभावी,तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच समाजसेवी संस्थांनी आम्हांला आत्मबळ द्यावे. स्वयंसेवी संस्था,कलावंत,नागरिक यांनी आमच्याबद्दल संवेदनशील राहून आम्हाला हिम्मत द्यावी. असा कोणी एखादा नेता तयार होईल का?की जो आमच्या मुळापर्यंत जाऊन ,आमच्यासाठी लढून आमचं जीवन समृध्द बनवेल,पण हे सर्व करण्यासाठी त्याला राजकारणाचा मोह नसावा.
आता शासनानेच ठरवावे आम्हांला मरणाची किंमत द्यायची की जगण्याची हिम्मत.जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझा आत्मा इथेच घुटमळत राहणार. मला न्याय द्या,मला न्याय द्या,मला न्याय द्या.

लेखिका:-दिपाली राजेश चावरे(माळवेशपूरा,अचलपूर अचलपूर, जि.अमरावती)
मो:-9552806260

▪️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620