पवारसाहेब, बारामतीच्या बाहेर पण देश आहे

  41

  ✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, मो.9561551006

  राष्ट्रवादीचे व महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती शहराचा मोठा विकास साधला आहे. बारामती शहराच्या विकासाची चर्चा सर्वदुर होते. देशभरातील नेते येवून बारामतीच्या विकासाचे कौतुक करतात. खरेतर बारामतीचा विकास तसा आहेच कौतुक करण्यासारखा. तिथे जाणा-या कुणाचेही डोळे दिपतील असे काम शरद पवारांनी केले आहे. त्यांनी तिथे केलेल्या विकासाला नाकारण्याचे पाप कुणी करणार नाही पण तब्बल चार ते पाच दशके जो माणूस राज्याच्या राजकारणातला केंद्रबिंदू आहे, सुपर पॉवर आहे त्या माणसाने पन्नास वर्षाच्या राजकारणाची उपलब्धी म्हणून एकच शहर दाखवावे, एकाच शहराच्या विकासाचा डांगोरा पिटावा हे हजम होत नाही. पवार साहेब ज्या सातारा जिल्ह्यातले त्याच सातारा जिल्ह्यातील अनेक गावांची आजही दयनीय अवस्था आहे. प्यायला पाणी नाही, रस्ते नाहीत. देशाने चंद्रावर, मंगळावर यान सोडले पण अजून तिथल्या काही गावामध्ये अँब्युलन्स पोहोचू शकत नाही इतकी विदारक स्थिती आहे. विशेष म्हणजे हा भाग याच विकासपुरूषाच्या जिल्ह्यातला आहे. या विकास पुरूषाच्या पक्षाचा बोलेकिल्ला असलेलाच हा भाग आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाची नैतिक जबाबदारी शरद पवारांचीच आहे. शरद पवार गेली पन्नास वर्षे राज्याच्या राजकारणातले मात्तबर नेते आहेत.

  चार वेळा ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दोन वेळा केंद्रात मंत्री आहेत, एक वेळा लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. म्हणजे १९८० पासून तेच राज्याच्या राजकारणातली प्रमुख ताकद आहेत. त्यांच्याकडून निव्वळ एका गावाच्या विकासाचा डांगोरा त्यांच्याच लौकीकाला शोभत नाही. त्यांना जी सत्ता आणि संधी मिळाली आहे त्याचा जमा खर्च मांडता शरद पवारांनी राज्यात अशी किमान शंभर शहरं तरी उभी करायला हवी होती. हे सगळं मांडायचे कारण की त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या अनेक गावांची आजही दुरावस्था आहे. त्यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या माढा मतदारसंघातल्याही अनेक गावांची अवस्था भयंकर आहे. त्यामुळेच बारामतीच्या बाहेरही देश अस्तित्वात आहे आणि त्या देशाचा विकास करणे ही पवार साहेबांची नैतिक जबाबदारी आहे. पवारांच्या अधिपत्याखालील परिसरात तर त्यांनीच विकास केला पाहिजे.

  परवा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या चाफळ जवळ असलेल्या कोळेकरवाडी- वनवासवाडी या गावांना बातमीसाठी भेट द्यायचा योग आला आणि डोळ्यावर असणारी पवारांच्या विकासाची झापड निघाली. गडचिरोलीपेक्षा बत्तर जिणे जगणा-या कोळेकरवाडी-वनवासवाडी ग्रामस्थांचे हाल कुत्रे खात नाही. त्या गावांना जायला दिड-दोन फुटापेक्षा मोठा रस्ता नाही. एकावेळी एकच माणूस त्या रस्त्याने चालू शकतो. गाव खड्या डोंगरावर आहे. लोकांना दवाखान्यात जायचं म्हंटलं तरी झोळीतून न्यावे लागते. जिथे एका माणसाला निट चालता येत नाही तिथे आजारी माणूस झोळीत घालायचा आणि ती झोळी उचलून डोंगर चढायचा व उतरायचा हे काम जीवघेणे आहे. हे काम जीवघेणे असले तरी गेल्या चार ते पाच पिढ्या या गावचे लोक हेच जीणं जगत आहेत. कित्येक महिलांची बाळंतपणं त्या झोळीतच झालेली आहेत. झोळी पकडणारे पुरूष बाळंत झालेल्या स्त्रीच्या रक्ताने भिजत असल्याचे भयंकर वास्तव एका आज्जीने सांगितले. त्या गावात धड शाळा नाही. जी आहे ते पत्र्याचे शेड. कोंबड्या कोंडायची जागाही त्यापेक्षा खुप चांगली असते. रस्ता नाही परिणामी मास्तर वेळेत येत नाही. तो कधी येतो कधी येत नाही. त्यामुळे सदर गावातील मुलं दहावीच्यापुढे शिक्षणच घेत नाहीत. हे गाव ज्या मतदारसंघात आहे त्या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षाचा होता. विक्रमसिंह पाटणकर हे राष्ट्रवादीचे. ते राष्ट्रवादीच्या गत सरकारात राज्याचे बांधकाम मंत्री होते.

  आज त्याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेचे शंभूराजे देसाई करत आहेत. ते ही राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. या शिवाय या मतदारासंघाचे विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे आहेत. यापुर्वीचे खासदार उदयन महाराज होते ते ही राष्ट्रवादीतूनच खासदार होते. म्हणजे सगळे कारभारी राष्ट्रवादीचेच. आजवरची सत्ता, प्राबल्य राष्ट्रवादीचे पर्यायाने शरद पवारांचेच. मग बारामतीचा विकास हे पवारांचेच यश असेल तर कोळेकरवाडी, वनवासवाडी या गावांच्या वाट्याला आलेल्या भोगाची, अवहेलनेची जबाबदारीही पवारांचीच. हे ही त्यांचेच अपयश. स्वत:च्या घरापुरतं कुणीही कंपाऊंड करतो, त्याची डागडूजी करतो पण ज्याच्या हाती अवघ्या गावाचा कारभार आहे त्याने स्वत:च्या घरापुरता विचार करून चालत नाही. शरद पवार यांच्यासारख्या माणसाने निव्वळ बारामती उभे करून चालणार नाही. त्यांनी तशी किमान शंभर शहरं, हजारो गावं उभी करायला हवीत. तेव्हाच ते ख-या अर्थाने विकासपुरूष. खरेतर हे सगळं पवारांच्या चमच्यांना पेलणार नाही. शरद पवारांचा अभ्यास, वकूब, आवाका दांडगा आहे. त्यांना राज्याचा खडान-खडा आणि माणूस ना माणूस माहिती आहे. प्रत्येक भागाचे वैशिष्ठ्ये, तिथली संस्कृती, चळवळ आणि राजकारण कोळून पिलेला हा माणूस. गतवर्षी त्यांच्याशी पंधरा मिनिटं गप्पा मारायचा योग आला तेव्हा त्यांनी माझ्या तालुक्याचा इतिहास मला सांगितला. म्हणजे बहूतेक सर्व राज्याचा इतिहास, भूगोल पाठ असणा-या या माणसाला आपल्याच जिल्ह्यात लोकं आदीवासी जीवन जगत आहेत याची माहिती आहे की नाही ? की माहित असूनही ते त्याकडे कानाडोळा करतायत का ? असे प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाहीत.

  पवारांंच्यावर प्रेम करणा-या भक्तांना हे प्रश्न खटकतील. त्यांना राग येईल पण कोळेकरवाडीच्या लोकांचे जिणे पाहिले आणि पवारांनी आजवर उपभोगलेली सत्ता पाहिली की हा प्रश्न त्यांनाच विचारावा लागेल. प्रगत समजल्या जाणा-या पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात वसलेली ही गडचिरोली पवारांचीच देण आहे असं का म्हणू नये ? ज्या बारामतीच्या विकासाचा भुलभुलैय्या सांगितला जातो त्या बारामतीपासून पस्तीस किलोमीटरवर असणारा फलटण तालुका अजूनही दुष्काळाच्या झळा सोसतोय. फलटणपासून पस्तीस किलोमीटरवर असणा-या माण-दहिवडीची तीच अवस्था. तिथून पस्तीत ते पन्नास किलोमीटवर असणा-या आटपाडी-कवठेमहंकाळची तीच अवस्था. बारामती सोडता त्याच्या अवतीभोवती समस्यांचे जाळेच जाळे असेल, लोकांना अजून रस्ते, प्यायला व शेतीला पाणी उपलब्ध नसेल तर ती ही जबाबदारी या जाणत्या राजाचीच नाही का ? विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाची गोष्ट नंतर पण जो भाग पवारांच्याच हातात आहे, जो त्यांचाच बालेकिल्ला आहे तिथे ही अवस्था असेल तर शरद पवारांना बारामतीच्या विकासाचे ढोल बडवण्याचा अधिकार नाही. बारामतीच्या आणि पुण्याच्या मध्ये वसलेल्या पुरंदर तालुक्यातही ब-यापैकी दुष्काळाची तीव्रता आहे. खुद्द बारामती परिसरात अजूनही काही गावं पाण्यापासून वंचीत आहेत. हे सर्व चित्र पाहिल्यावर शरद पवारांनी विकासकामात दुजाभाव केला की काय ? हा प्रश्न पडतो. पाच दशकं राज्यात ज्यांच्या शब्दाला मोठे वजन आहे, ताकद आहे त्यांनी इतर भाग का बारामतीसारखा विकसीत केला नाही ? बारामतीचा विकास हे जर पवारांचे कर्तृत्व असेल तर कोळेकरवाडी, वनवासवाडीची दुरावस्था हे पण शरद पवारांचेच कर्तृत्व आहे. हे शरद पवारांचेच अपयश आहे.

  पाटण तालुक्यातील या भागाचे आमदार शिवसेनेचे आहेत तर खासदार राष्ट्रवादीचे आहेत. यापुर्वीचे खासदारही राष्ट्रवादीचेच. राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असणा-या या भागाची ही दयनीय अवस्था आजही का आहे ? ही जबाबदारी कुणाची ? शरद पवारांचा बालपणीचा मित्र असलेले खासदार श्रीनिवास पाटील त्या लोकसभेचे प्रतिनिधी आहेत. कधीतर या दोन मित्रांनी या गावाला भेट द्यावी. जाताना हेलिकॉप्टरने जावे. कारण चालत जाता येणार नाही, तिथे चारचाकी लाबंची गोष्ट साधी दुचाकीही पोहोचत नाही. बर पवारांना आणि खासदार श्री निवास पाटलांना डोलीतून वरती न्यावे इतके त्राण बिच्चा-या कोळेकरवाडीच्या ग्रामस्थांच्यात आज उरलेले नाही. जाताना सध्या राज्याच्या सत्तेत भागिदार असलेले शिवसेनेचे मंत्री शंभूराजेंनाही न्यावे. जमलं तर यापुर्वी ज्यांनी राज्याचे बांधकाम मंत्रीपद भोगले त्या विक्रमसिंह पाटणकरांनाही न्यावे. या सर्वींनी मिळून त्या लोकांचे दु:ख डोळ्यावरची सत्तेची झापडं काढून पहावे. मग जगभर बारामतीच्या विकासाच्या गपड्या माराव्यात अन्यथा त्या मारू नयेत. इथे एक प्रसंग आवर्जून सांगावा वाटतो. कारण तो प्रसंग माणसाची नैतिकता काय असते, बांधिलकी काय असते सांगणारा आहे. शहीद भगतसिंगांचे आत्मचरित्र एका लेखकाने लिहीले व त्यांच्या आईला त्याच्या प्रकाशनाला आमंत्रित केले. सदर लेखकाला भगतसिंगाची आई म्हणाली, “बाळा तु सुखदेव आणि राजगुरूवर पुस्तक लिहीले आहेस का ? यावर तो म्हणाला, अजून नाही लिहीले.

  त्या लेखकाला ती माऊली म्हणते, “बाळा आधी त्यांच्यावर पुस्तक लिही मग हे भगतसिंगाचे पुस्तक प्रकाशित करू !” याला म्हणतात बांधिलकी आणि नैतिकता. जर अशी बांधिलकी आणि नैतिकता पवारांच्याकडे असेल तर त्यांनी त्यांच्याच बारामतीच्या आसपास असलेल्या पण विकासासाठी आजही टाचा घासणा-या भागाचा कायापालाट करावा, तिथेही विकासाची गंगा न्यावी मगच बारामतीचे कौडकौतुक सांगावे. खरेतर बारामतीच्या विकासाचे, पवारांच्या रचनात्मक दृष्टीचे अप्रुप मलाही वाटते पण कर्त्या माणसाचा दृष्टीकोन संकुचित असेल किंवा आपल्यापुरता असेल तर उपयोग नाही. स्वत:चे घर कुणीही सावरते. त्यात पवारांनी केले याचे नवल काय ? चारवेळा मुख्यमंत्री, दोन वेळा केंद्रात मंत्री, लोकसभेचे एकदा अध्यक्ष, अपवाद वगळता सतत राज्याच्या सत्तेत सहभाग असताना निव्वळ बारामतीची टिमकी पवारांच्या कर्तृत्वाला शोभा देत नाही इतकेच. त्यांना मिळालेल्या सत्तेचा व संधीचा हिशोब करता त्यांनी किमान निम्मे राज्य विकसीत करायला हवे होते. बाकी अण्णा हजारे आणि पोपट पवारांनी कुठलेही पद नसताना त्यांची गावं विकसीत केलीच की ? ते नव्हते मुख्यमंत्री, कृषीमंत्री, संरक्षमंत्री. पवारांना मिळालेल्या संधीचा आणि त्यांनी केलेल्या बारामतीच्या विकासाचा आणि एकाच गावापुरता विचार करावयाचा झाल्यास शरद पवारांच्यापेक्षा पोपट पवारांचे काम मोठे वाटते, अण्णा हजारेंचे, पाटाद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटलांचे काम मोठे वाटते.

  टिप:- बाकी साहेबांच्या भक्त मंडळींनी आज थंडावा देणारे मलम वापरायला हरकत नाही. भले माझ्या नावाने खडे फोडत का असेना पण ते मलम वापरावे तेवढेच गार वाटेल.