रमाई नगर या लेकरास आवाज देत आहे..
भाऊ सागरही तुम्हास आवाज देत आहे..

त्या रोहित वेमुलाचा फास आवाज देत आहे..
लोकशाहीचा आखरी श्वास आवाज देत आहे..

त्या प्रियंका ताईची आस आवाज देत आहे..
भोतमांगे एकटाच उदास आवाज देत आहे..

नामांतर लढ्याचा प्रवास आवाज देत आहे..
वाड्या वस्त्या या भकास आवाज देत आहे..

शुर पँथरचा इतिहास आवाज देत आहे..
तुम्हा रिपाईचा -हास आवाज देत आहे..

परिवर्तनाच्या तो ध्यास आवाज देत आहे..
भीम क्रांतीचा विश्वास आवाज देत आहे..

आणि तुकडे तुकडे झालेला निळा झेंडा,
हे सारं बघितलेल्या समाजास आवाज देत..!

त्या वेदना, त्या यातना, अवहेलना, संवेदना…
तो जोश, तो आक्रोश, ती संपलेली चेतना…

आवाज देत आहेत आणि सांगताय…
त्यांच्यावर झालेला वार,
अमानुष अत्याचार आणि
आया बहिणींवर झालेला बलात्कार

सांगताय…
व्यवस्थेला चढलेली मस्ती
हुकुमशाही सम जबरदस्ती
आणि कशी जळाली वस्ती

सांगताय…
किंकाळी, ती आरोळी, फाटलेली झोळी…
त्यावेळी, वेळोवेळी, या हातात पडलेली बेडी…

सुनी झालेली भीमवाडी…
या संसाराची राखरांगोळी…
नेत्यांनी भाजलेली पोळी…
वाघावानी ती डरकाळी…
समाजाने झेललेली गोळी…
बेईमानी मतदानाच्या वेळी…
बापालाच विकणारी टोळी…

यातून सांगताय…
भीम चळवळीची दशा…
स्वार्थाची चढलेली नशा…
आंदोलनाची परिभाषा…
आमची भविष्याची दिशा…

सांगताय सारं आम्हाला.. सांगताय..!
तरी बेसावध असणाऱ्या षंढांनो…

तुमचा बेसावधपणा तुम्हाला नडणार आहे..!
डोळ्या समोर वस्त्या वस्त्या जळणार आहे..!
प्रत्येक वेळी नवा हत्याकांड घडणार आहे..!

रोखायचं असेल जर तुला सारं,
तर संधी मिळणार नाही पुन्हा..
आताच जागवूनी मेल्या मना..
तोच स्वाभीमानी ठेऊन बाणा..
मोडण्या हुकुमशाहीचा कणा..
शासनकर्ते बना…!
शासनकर्ते बना..!!
शासनकर्ते बना.!!!

अन्यथा येणार आहे गुलामी
यावर मुळीच नाही शंका
आणि तुमच्याच घरातून असेल
पुढचा बळी गेलेली प्रियंका

आणि तुमच्याच घरातून असेल
पुढचा बळी गेलेली प्रियंका

✒️कवी- निलेश पवार, भुसावळ
मो:-८३०८५५८७१०

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED