उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँक स्थापन करा व आरोग्य व्यवस्था दुरुस्त करा

105

🔹अँड सुधीर कोठारी यांची मागणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.9ऑक्टोबर):-येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्याच्या परिस्थितीत ब्लडबँकेची नितांत आवश्यकता असून या परिसराच्या दृष्टीने शासनाने तातडीने ब्लडबँक मंजूर करावी व येथील शासकीय आरोग्य व्यवस्थेची बिघडलेली घडी व्यवस्थित बसवावी अशी कळकळीची मागणी वजा विनंती ज्येष्ठ नेते एड सुधीर कोठारी यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री व अन्य संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

आपल्या निवेदनातून एड सुधीर कोठारी यांनी मागणी केली आहे की,हिंगणघाट शहराची लोकसंख्या ही एक लाखाचे घरात असून हे शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे.त्यातच दिवंसेदिवस शहराची लोकसंख्या वाढत असल्याने या महामार्गाच्या पलीकडे लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर गेलेली आहे. सोबतच शाळा,महाविधालयेही या भागात नव्याने झाल्याने या परिसरात वर्दळ वाढल्याने हा महामार्ग ओलांडताना नेहमी अपघात होत असतात त्यामुळे या भागात आरोग्य सेवा ही परिपूर्ण असायला पाहिजे व ती काळाची गरज आहे.

वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे असून हे शहर औदयोगिक क्षेत्र म्हणून सर्वत्र परिचित आहेत.तसेच राष्ट्रीय महामार्गावर हा भाग असल्याने येथे अपघातांची मालिका नेहमीच असते.वारंवार होत असलेल्या गंभीर अपघातातील रुग्णांना नेहमी तातडीने रक्ताची गरज असते परंतु ब्लडबँक नसल्याने अनेक गंभीर रुग्णांना नागपूर किंवा वर्धा येथे पाठवावे लागतं असते आणि या कालापव्याने अनेकांना प्राणाला मुकावे लागतं आहे. येथे शासनाने ट्रामा केयर युनिटला मंजुरी सुद्धा दिलेली आहे परंतु या ट्रामा केयर युनिटची इमारत ही केवळ शोभेची वस्तू ठरलेली आहे.

या ट्रामा केयर युनिट मध्ये कोणतीही वैधकीय सेवा उपलब्ध नाही.हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने नेहमी अपघाताची भीती असते त्यामुळे शासनाने येथील गरज ओळखून ट्रामा केयर युनिट मंजूर केले परंतु या युनिटमध्ये कोणत्याही सोयीसवलती नसल्याने गंभीर रुग्णांना नाईलाजाने वर्धा,नागपूर येथे जावे लागते व विनाकारण गरिबांना आर्थिक भुर्दन्ड बसतो. त्याचप्रमाणे आताच्या कोविडच्या काळात रुग्णांसाठी रक्ताची नितांत गरज आहे.मागील चार महिन्यापासून येथे कोविडचे रुग्ण रोज मिळत आहेत परंतु येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन,रक्त व अन्य आरोग्यासाठी आवश्यक त्या गरजा येथे नसल्याने येथील बहुतांश कोव्हीड पेशन्टला बाहेरगावी जावे लागतं आहे.यात गोरगरीब रुग्णाना विनाकारण नाहक त्रास होत आहे.ही या मतदार संघाची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने या परिसराची गरज लक्षात घेता या उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढीची व अन्य आवश्यक वैधकीय सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.

सध्या या रुग्णालयात रक्त साठविण्याची व्यवस्था आहे. या स्टोअरेज बरोबर रक्त पेढीची निर्मिती केल्यास हिंगणघाट व समुद्रपूर या दोन्ही तालुक्यातील हजारो गरजू रुग्णांना त्याचा फायदा होईल तसेच या परिसरात नेहमीच विविध सामाजिक संघटना रक्तदान शिबिराचे आयोजन करतात त्यावेळी वर्धा,नागपूर येथून ब्लडबँक बोलवाव्या लागतात.व केवळ सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून कार्य करणाऱ्याना विनाकारण थोडाफार आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी एड कोठारी यांनी केली आहे. एड सुधीर कोठारी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, व पालकमंत्री यांना याबाबतचे निवेदन पाठविले आहे.