तरुण देत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

98

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.17ऑक्टोबर):-धन किंवा स्थूल वस्तु यांचे दान करणारी व्यक्ती दानी म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती महादानी म्हटली जाते. तर गुण व शक्तीचे दान करणारी व्यक्ती वरदानी म्हटली जाते. मात्र ईश्वरीय ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असते. ज्या ज्ञानाने देणार व घेणार या दोघांचेही जीवनचंद्रमा चढत्या कळेत प्रवेश करतो.

त्यामुळे उभयतांचे जीवन सर्वकाळ सुखमय होते. ज्ञान दान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीने प्रेरित होऊन चिमूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खंडाळा गावातील सुशिक्षित तरुण आकाश देविदास श्रीरामे यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थांना आपल्या घरी शिक्षणाचे धडे देत आहेत.

तालुक्याच्या ठिकाणापासुन १५ कि. मी. अतिदुर्गम भागातील गटग्रामपंचायत पेठभांसुली अंतर्गत खंडाळा हे गाव आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम ४०० च्या घरात आहे. यंदा कोविड १९ या आजारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळा बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थांना आँनलाईन शिक्षण दिले जात आहे. शाळा बंद अवस्थेत असल्यामुळे गावातील विद्यार्थी दिंगामस्ती, हिंडणे, फिरणे, खेळणे करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले आहे.

खेडयातील विद्यार्थांचे पालकांची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असते. त्यात विद्यार्थांकरिता आँनलाईन शिक्षण घेण्याकरिता मोबाईल घेणे पालकांना परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता असते. हि सगळी परिस्थिती पाहून गावातील सुशिक्षित तरुण आकाश देविदास श्रीरामे यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थांमध्ये सामाजिक अंतर ठेवुन आपल्या घरी शिक्षणाचे धडे देत आहेत.

त्यामुळे विद्यार्थांच्या शिक्षणात कसल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.