विदर्भातील थोर संत परंंपरा

183

आपला भारत देश ही संत महापुरूषांची पावन भूमी आहे. देशकाल परिस्थितीनुसार संत मंडळीनी समाजाचे निरीक्षण करून चिंतन केले.आपल्या तपोबल आणि आत्मबल जागवत स्वतः वैरागी जीवन जगत विश्वात मानवतेच्या गाठी मजबूत बांधल्या.विदर्भातील जनमानसांवर मोठ्या प्रमाणात ज्या संताचा प्रभाव होता , त्यांच्या विषयी उल्लेख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका गीतांमध्ये करतात ,
शिरडीत बंधु माझा म्हणे आडकोजी ! दुजा भाऊ शेगावात नांदतो अजी ! ! तिजा ताजुद्दीन अमुचा मित्र , जीव भाव साचा !! मुंगसाजी बंधु चवथा ! आमुच्या भुजी ! साईखेडाचाही दादा आमचाची बंधुराजा ! खटेश्वराचीही माझी ,संगती गुजी !! मायबाई माता माझी , सर्वाभूती पान्हा पाजी ! म्हणे दास तुकड्या यांची , भक्ती ना दुजी !!त्यांचा या लेखात विशेत्वाने उल्लेख करणार आहे.

🔸संत आडकोजी महाराज:-
समर्थ आडकोजी महाराज मुळचे आर्वीचे .दि.१४.११.१८२१ ला त्यांचा त्रिपुरी पौर्णिमेला जन्म झाला.त्यांच्या वडीलांचे नांव सदाशिव फिसके. बालपण कष्टात गेले. संसार प्रवेशाचे दिवशीच ” मायबाई का पुरा पसारा ,एक पलमें वो आडकुजी तारा !” हा कृपाप्रसाद मिळाला. अद्वैत वृत्ती आली. लोक वेडा, पिसा समजायला लागले . त्या काळात लोकांना काही त्यांचे अनुभव आले. वेडा आडकू मात्र पुढे आडकोजी महाराज म्हणून प्रसिद्धीस आले. “वय चौसष्ट वर्षाचे , आले वरखेडी साचे !” सुख मनी खांदी , घोंगडी , शिकाळी करी ! ” या प्रकारची त्यांची स्थितप्रज्ञास्थिती होती. ‘ नच लहरीविणा बोलती ‘ निरासक्ती मध्ये वास . बोलले तर ” हरपे मन कामना परी ” कुत्री , गाई, मांजरी , पक्षी हे सर्व एकाच ताटात भोजन करायचे. ” बाहेरी पिशाच्च ,अंतरी शहाणा !सदा ब्रम्ही जाणा निमग्न तो ! ” ही त्यांची अवस्था होती . राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज , संत लहानुजी महाराज , संत सत्यदेवबाबा हे या महापुरूषांच्या कृपा प्रसादाचे फळ होय. त्यांच्या विषयी संत सातळीकोतळीकर आपले स्वानुभव लिहितात , “नरजन्म सफल करना है तो, आडकुजी भजले ! वरखेड में परब्रम्ह आया , मोह माया तू त्यजले !!” .
अशा या समर्थ आडकोजी महाराजांना शंभर वर्षांचे आयुष्य लाभले.

🔹संत गुलाबराव महाराज:-
अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथे त्यांचा जन्म झाला .जन्मांध असलेल्या गुलाबराव महाराजांचे वयाच्या चौथ्या वर्षी मातृछत्र हरवले होते . ज्ञानमार्गातील विविध अडथळ्यांवर प्रबळ इच्छाशक्तीवर मात करून ,सतत दहा वर्षे पायपीट करून मिळेल तेथून दुर्मिळ ग्रंथ मिळवून व जमेल त्याच्याकडून तो वाचवून घेऊन मनन चिंतनाद्वारे आध्यात्मिक विषयाच्या आकलनात अधिकार प्राप्त करून घेतला . अध्यात्मविचार जाणून घेतला आणि अद्वैतभक्तीयोगाचा विकास साधणारा नवा मौलिक आविष्कार जनमानसांत रूजविला. वयाच्या विसाव्या वर्षातच प्रवचन, निरूपण, काव्यलेखन , चर्चा व शंकासमाधान याद्वारे जनतेला थक्क करून सोडले. ते स्वतः निरक्षर असूनही त्यांची ग्रंथनिर्मिती स्तिमित करणारी आहे. संस्कृत , मराठी , हिंदी , व-हाडी आणि वज्र या पाच भाषांमधून अवतरलेली आहे. त्यांनी भाष्य ,टीका, चंपू, सर्गकाव्य ,आख्यान , गवळन, प्रभाती, नाटक ,चरित्र , प्रवास , निबंध , विलापिका आदि सर्व जुने -नवे साहित्य प्रकार हाताळले. त्यातून त्यांच्या अत्युच्च प्रतिभाविलासाचे स्वच्छ दर्शन घडते. भारतीय विचारपरंपरेचा धागा तुटू न देता तिचा विकास साधण्यासाठी सामाजिक बंधुत्वभावाला तात्त्विक अधिष्ठान दिले.

🔸संत गाडगेबाबा:-
संत गाडगेबाबा यांची शिकवण , त्यांची भक्ती विज्ञानवादी होती . अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे त्यांचा जन्म झाला असला तरी दापुरे येथे त्यांचे संगोपन व जडणघडण झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी समाजातील अज्ञान ,अंधश्रध्दा , शोषण , गरीबी दूर व्हावी यासाठी आयुष्यभर जनप्रबोधन केले. साडेसहाशे वर्षांच्या संतपरंपरेतून विविध लोकपीठांच्या मुखांनी प्रवाहित झालेल्या सदविचारांचा आधार देत त्यांनी समाजजीवन धारणेचे निकोप मानवी तत्त्व सांगून स्वतःही अंमलात आणला. गाडगेबाबाचा धर्म हा खराट्याचा सेवाधर्म आणि संप्रदाय म्हणजे सार्वजनिक स्वच्छता – आरोग्य . यामुळे ते जनतेचे सेवाव्रती पथदर्शक बनले. तळागाळातल्या मानवसमूहाच्या मर्यादांमध्ये अत्युच्च वैराग्य , त्याग व मानवता मूल्यांची जिवंत ,प्रखर अभिव्यक्ती म्हणजे संत गाडगेबाबा होते.बोलीभाषेत संवादाच्या साखळीतून फुलत जाणाऱ्या कीर्तनातून त्यांनी विज्ञानवादी संस्कार जनमानसांवर केले. त्यांचा कालखंड १८७६ ते १९५६.आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्या विचारांची गरज आहे.

🔹संत लहानुजी महाराज:-

सामान्य जनांच्या बुध्दी आणि अंतर्वृत्ती ह्यांना परमात्मस्वरूपाचे दर्शन घडविणारे आणि सेवा हाच मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखविणारे सुर्योपासक संत लहानुजी महाराज सर्वदूर परिचित आहे. मंगरूळ ता.चांदूर येथे सौ. भिमादेवी आणि अभिमानजी भांडे यांच्या पोटी लहानुजी महाराजांचा जन्म झाला.लहानपणापासून त्यांना परमार्थ साधनेची ओढ होती .कठिण परिस्थितीच्या चिखलातून उदय पावलेले हे संत कमळ अखंड सेवा सुगंध देते झाले. त्यांनी आपल्या नव्वद वर्षाच्या आयुष्यात आत्मशक्ती जागविली .
” ऐ शंकरगीर गीरीपर ही चढा , तेरी तप और तपस्या काम करे ! तू टाकरखेड मे है बैठा , पर भारत मे तेरा नाम स्मरे ” या शब्दात राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी लहानुजी महाराजांचा गौरव केलेला आहे. लहानुजी महाराज यांची सुधामय वाणी अनेक दुःखी लोकांना नवचैतन्य प्रदान करीत. संताचे जीवन म्हणजे ” भूतांची दया हे भांडवल संता !!” .संत व्यक्तीगत स्वार्थाकडे लक्ष न देता सदैव भूतमात्रांच्या कल्याणासाठी झटतात. समाजोध्दारक लहानुजी महाराजांनी इहलोकीची जीवन यात्रा दि.६ आॕगष्ट १९७१ रोजी संपविली . टाकरखेड जि.वर्धा येथे आश्रम आहे.

🔸राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज:-
दि. ३०.४.१९०९ रोजी यावली जि. अमरावती येथे बंडोजी आणि मंजुळामाता इंगळे या गरीब दाम्पंत्याच्या पोटी यांचा जन्म झाला.प्राथमिक शिक्षण चांदूरबाजार येथे झाले. भगवद् भक्ती च्या तीव्र ओढा त्यांना स्वस्थ बसू देईनात. त्यातून त्यांनी ताडोबा – गोंदोडा , रामटेक च्या जंगलात योगसाधना आणि विविध प्रकारची तपश्चर्या केली. प्रचंड भ्रमंती बरोबरच समाज निरीक्षण करीत सुरूवातीला माणिक बाल समाज आणि पुढे आरती मंडळ स्थापन करून लोकसंघटन केले. खंजेरी भजनाच्या माध्यमातून जनमानसांवर मोहिनी घालत राष्ट्रीय जनजागृती केली. १९४२ च्या आॕगष्ट क्रांती आंदोलनात त्यांनी अपुर्व रंग भरला.

“अब काहेको धुम मचाते हो , दुखवाकर भारत सारे , आते है नाथ हमारे ! झाडझडूले शस्त्र बनेंगे ,भक्त बनेगी सेना ! पत्थर सारे बम्ब बनेंगे , नाव लगेगी किनारे …” या प्रकारच्या त्यांच्या भजनामुळे आष्टी , यावली , बेनोडा आणि चिमूर या गावात जनतेनी इंग्रजांच्या विरूद्ध क्रांती केली. त्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी रचनात्मक कार्य गावागावातून घडवून आणले .त्यांचे शंभरावर ग्रंथ प्रकाशित असून त्यात अभंग , ओव्या, श्लोक , पोवाडे , भाषणे, प्रवचने ,गीते , छंद रचना , आत्मचरित्र , पत्रे , शंकासमाधान या विविध साहित्यरूपात उपलब्ध आहे. या सर्व साहित्यात माधुर्य , भक्ती , उत्स्फूर्तता , ओज, आवाहकता , प्रतिभा आदी गुणांचा सुंदर समन्वय आलेला दिसून येतो. राष्ट्रसंतानी पारंपरिक अध्यात्मतत्त्व आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहार यांची योग्य सांगड घालून परिवर्तनवादी विचार कृतिनिष्ठ संघटनाद्वारे जनमानसांत रूजविण्याचा प्रयत्न केला. ग्रामगीता ग्रंथातून ग्रामकेंद्री आचारसंहिता दिली. क्रियाशील मानवधर्मांची पताका चहूकडे फडकविणारे त्यांच्या साहित्याचे वाचन गावोगावी होत आहे.दि.११ आक्टोबर १९६८ ला त्यांचे महानिर्वाण गुरूकुंज आश्रम मोझरी येथे झाले.

संत गजानन महाराज (शेगाव ) , संत मायबाई (आर्वी जि.वर्धा) महाबाहो संत दामोदरदास महाराज (खापा जि. नागपूर ) ,संत गौरीशंकर महाराज (सिंदी ),संत मारोती महाराज ( सालबर्डी ),स्वामी संतोखदास (रूणमोचन ता. ब्रम्हपुरी), संत गणपती महाराज , संत उकिरडाबाबा (अचलपूर ) ,संत अमरसिंह महाराज (मोझरी ), संत दादाजी महाराज (घाडगे), संत भाकरे महाराज (नर्सरी ता.अचलपूर ) , संत झामसिंग महाराज ( आर्वी ) , संत सत्यदेवबाबा (भारवाडी) , संत नानाजी महाराज (सूरगाव जि.वर्धा ), संत श्रावण महाराज ( पहूर जि.यवतमाळ ), बापूशहा फकीर (नेरी जि.चंद्रपूर ) आणि अलिकडे आपल्या जनसेवेने प्रसिद्धीला आलेले ग्रामसभेचे तत्त्वचिंतक संत श्रीतुकारामदादा गीताचार्य (अड्याळटेकडी जि. चंद्रपूर ), ज्ञानेश्वरी चे प्रचारक संत बाजीराव महाराज (अडेगाव ) , संत मुंगसाजी महाराज आदी संतमहापुरूषांची महान परंपरा आपल्या विदर्भातील भूमीचीही आहे. या सा-या संतांनी ” ज्याने परसृष्टी अनुभवली ! त्यास परमात्मता साधली ! आप पर बोलीच निघोनी गेली ! एकात्मता आली सर्वाभूती !! (ग्रामगीता ) या प्रमाणे सुखसंवाद साधला तो मानवाच्या उन्नतीसाठीच. “जितके संतरूप जाणू आपण ! तितके अंगी येई संतपण ” याप्रमाणे आपल्यातही वैश्विक भाव वाढत जाते. संसार करतांना चित्त शुद्ध होऊन विकारावर मात करता येते . याकरिता संत साहित्याचे वाचन चिंतन आवश्यक आहे.

✒️लेखक:-बंडोपंत बोढेकर ग्रामगीताचार्य ,चंद्रपूर
मो:-9975321682