अजब नेत्रांची गजब कहाणी

29

माझे डोळे जन्मतःच लालभडक आहेत. आपण त्यांना तसे होण्यास अथवा दिसण्यास काही एक उचापत केलेली नाही. माझ्या तीर्थरूप आई-वडीलांनी सुध्दा त्यांना घडविले नाही. ती त्या परमेश्वराची लखलाभ देणगी आहे. हे कोणत्याही डोळ्यांच्या तज्ञ डॉक्टरांना कळते. बालपणी तर माझी सर्वच भावंडं मला ‘लालडोळ्या’ म्हणून हिणवत असत, हे मला आजही चांगलं आठवतं. त्यांचा आपल्याला मिश्र स्वरूपाचा लाभ होत आहे. आपण तारुण्यात याच लालबुंद डोळ्यांच्या बळावर गावगाड्यातील नाटकात अक्राळविक्राळ व भितीदायक पात्र रंगविले. त्यांत खलनायक व दारुड्याचे पात्रसुद्धा अगदी हुबेहूब वठविले होते, दारुचा लवलेशही नसतांना! प्रेक्षकांना आपण तर्रर्र दारू ढोसून पात्र रंगविल्याची शंका वाटत असे. कारण एक म्हण स्पष्ट सांगते.

“दिसतं तसं नसतं !
म्हणूनच जग फसतं !!

आपल्याला बालपणापासूनच दारूच्या व्यसनाचा तिरस्कार आहे आणि पुढेही आजीवन राहिलच, याची मी प्रतिज्ञापूर्वक ग्वाही देतो. एकदा तर मी अविवाहित असतांना माझी जन्मदात्री आईच माझ्या दारूड्याच्या अॅक्टींगने पार गारद झाली होती. मी दिवसा थोड्या उशीरा घरी पोचलो, तोही दारुड्याच्या पावित्र्यात!…. माझी प्रेमळ आई मला तशा अवस्थेत बघून एकदम भडकली. तीने उजव्या हाताची सणसणाटी चापट माझ्या डाव्या गालावर हाणली. दोन्ही कान धरून पिरडत गदागदा हलविले आणि महाकालीचा अवतार धारण करून ओरडली होती, “दुसऱ्यांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगणारा तू असा कसा रे कुत्र्याचा मुत पेलास? कोण्या नतद्रष्टाची वाईट नजर माझ्या गुणी पोराला या थडीला लावली असेल?” म्हणून ती ओक्षाबोक्षी रडू लागली.

तेव्हा मी दारूड्याची नक्कल बंद करून आपण दारूला हातसुद्धा लावलेला नाही म्हणून सांगून पाहिले. पण तीला खरे वाटेना! ती रागातच जवळ आली आणि लागलीच तीने माझा ‘मुखवास’ तपासला. तेव्हा कुठे तीला खात्री पटली होती की आपला लाडका पुत्ररत्न – बापू (टोपणनाव) खरंच नशामुक्त आहे. त्या तरण्याताठ्या वयात आपल्या चमत्कारिक नेत्रांची लाली लाभदायक ठरत होती. हिंदी चित्रपट गीताच्या ओळी आठवतात –

“चेहरा क्या देखते हो?
दिल में उतर कर देखो ना ।”

आता मात्र उतरत्या वयात आपले लालेलाल नयन अधिकच पेचप्रसंग निर्माण करीत आहेत. धोकादायक ठरू लागले आहेत. चोविसही तास दारूच्या नशेत धुंद-फुंद असल्याचे सिद्ध करू पहात आहेत. आपण अगदी तरूणपणापासून जागतिक कीर्तीच्या संत निरंकारी आध्यात्मिक विचारधारेशी एकरूप आहे. आपण सद्गुरूवचनांचे तंतोतंत-काटेकोरपणे पालन करीत नसेन तर या विश्वात माझ्यासारखा महापापी व आत्मघातकी मीच नाही का? मी शिक्षकी पेशात तब्बल ३० वर्षे पूर्ण केले आहेत. ज्या गावी जातो त्या गावचे लोक माझ्या केवळ लालबुंद डोळ्यांकडे बघून मला रंगेल व नशाखोर समजू लागतात.

मागचा पुढचा विचार न करता लाठ्या-काठ्यांनी मारायला उठतात. मस्त ढोसून असलेलेच तरूण आपली कॉलर पकडून दारूड्या म्हणून निर्भत्सना करत तोंडसुख घेत असतात. कारण काळ्या रंगाचं गॉगल लावणाऱ्यास सभोवतालचं सारं काही काळंकुट्टच दिसतंय. तद्वतच दारूच्या नशेत वावरणाऱ्या वस्तादास सगळं जगच झिंगलेलं आहे, असं भासतंय. आपण पित नसल्याचे सांगितले तरी मानायला तयार होत नाहीत. आपण तशांना नेहमी या शब्दात उत्तर देतो, “गड्यांनो, तुम्ही ओठाने घोटभर पिता अन् तासभर अंगाला आणता! पण आपलं तसं नाही! आपण डोळ्याने भरपूर पितो अन् चोविसही तास निरंकाराच्या नामस्मरणात देहभान विसरून तल्लीन राहतो !!” तरीही आपल्या सांगण्यावर त्यांचा विश्वास बसेल तर… शप्पथ !!! संतश्रेष्ठ चोखोबा महाराजांच्या अंभगातून सांगावेसे वाटते –

“ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा।
चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा ।”

माझी मोठी मुलगी कु. प्रियंका निकोडे ही साखरा ग्रामपंचायतमध्ये कंप्युटर आॅपरेटर म्हणून अल्पशा मानधनावर काम करते. तर तिच्या पाठचा मुलगा दुर्वांकुर निकोडे हा हैद्राबाद येथे डिझाईन इंजिनीअर आहे. त्यांनासुध्दा भेटलेले लोक नेहमी “तुझा बाप दारुड्या आहे!” अशा स्पष्ट शब्दात आपली बदनामी सांगतात. आहे किं नाही करामत? आज माझे डोळेच मला धर्मसंकटात ढकलू पाहात आहेत.

आपली सत्य परिस्थिती या लेखातून जगासमोर मांडण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यात हातचे बोटचे लाऊन बनावट लेखन केलेले मुळीच नाही. आपल्यासारखे या विश्वात आणखी काही ‘लालबुंद नेत्रांचे’ हतभागी लोक असतीलच. आमच्या नुसत्या डोळ्यांना बघून एकदम ‘दारूडे’ समजू नका. आधी खात्री करून मगच काय ते ठरवावे. अनंतकाळापासून सज्जनांची अशीच अवहेलना होत आली आहे. अशा सर्व सज्जन मित्रांच्या वतीने आपली माफकशी अपेक्षा आहे. मग सांगा. सज्जनहो, कशी वाटतंय? माझ्या अजब नेत्रांची गजब कहाणी !

‘✒️केजीएन्.’ – श्री कृष्णकुमार जी. निकोडे, (से.नि.प्राथ.शिक्षक)
जि. प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा, काटली.
ता.जि. – गडचिरोली
मो. नं. ७४१४९८३३३९ / ७७७५०४१०८६.
ई-मेल – nikodekrishnakumar@gmail.com