मनी स्वच्छता अंतर्भूत : तोच खरा स्वच्छतादूत

45

🔸स्वच्छ भारत अभियान [ भाग – २रा ]

अख्ख्या विश्वाच्या इतिहासात सर्वप्रथम सतराव्या शतकामध्ये स्वच्छतेचा पाया जर कोणी घालून दिला असेल तर तो आपल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ! आपल्या परिसरात इतरत्र कोठेही घाण-शौच करून परिसर प्रदूषित होऊ नये. आजारांना आयतेच आमंत्रण-निमंत्रण मिळू नये. याच उदात्त हेतूने महाराजांनी प्रत्येक गड-किल्ल्यांवर शौचालये बांधली होती. किती दूरदृष्टी म्हणावी ही? म्हणून संतश्रेष्ठ रामदासजी महाराज अशा थोर पुरुषांचा मोठ्या सुंदर शब्दात गौरव करतात –
“वरी चांगले अंतरी गोड नाही !
तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही !!
वरी चांगले अंतरी गोड आहे !
तयालागी कोणीतरी शोधताहे !!”

तदनंतर संताची पावन भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्रात १९ व्या व २० व्या शतकांमध्ये संतश्रेष्ठ गाडगेबाबांनी स्वच्छतेचा वृक्ष जोमाने बहरविला. ते अथक गावोंगावी फिरून रस्त्यावरील धूळ, घाण, केरकचरा खराट्याने झाडून-झटकून अख्खा गाव कसा लख्ख करीत असत ! त्यांच्या हातात नेहमी खराटा व गाडगे असायचे. त्यामुळेच लोक त्यांना खराटे महाराज किंवा गाडगेबाबा म्हणून ओळखत होते. त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर हे होते. लोक आपल्याला खराटे महाराज अथवा गाडगेबाबा म्हणून चिडवितात अशी घाणेरडी कल्पना त्यांच्या स्वच्छ, शुद्ध व परिमळ मनालाही शिवू शकली नाही.

त्यांनी ग्रामस्वच्छतेसह शेतकरी-कष्टकरी, गोरगरीब, दीनदलित, दीनदुबळे, रंजले-गांजले व अनाथ-अपंग यांच्या मनाचीही स्वच्छता केली. त्यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळसट-बुरसट समजुती, अनिष्ट रुढी-परंपरा, दुर्गुण-दोष, हिंसा, पशुपक्षी बळी, जातीभेद, अस्पृश्यता, मंत्रतंत्र, जादूटोणा, चमत्कार, वाईट व्यसने, आळस, ऐतखाऊवृत्ती, देवदेवस्की, उचनीचता, लिंगभेद, धर्मद्वेष आदी प्रकारचा घाण-कचरा वारंवार झटकून काढला. या स्वच्छतेसाठी त्यांनी प्रभावी माध्यम, साधन किंवा झाडू वापरला, तो होता जनप्रबोधन आणि कीर्तन ! संत कवीवर्य कबीरजी महाराजांनी हीच गोष्ट मोजक्या शब्दांत पण हृदयस्पर्शी अशी रचून ठेवली –

“मन मैला और तन को धोयें ।
हम शुद कैसे हो पायें ।।”

गावातील गल्ली, बोळ, रस्ते व जनमन झटकून-पुसून त्यांच्या अंगावरील वस्त्रांची लक्तरे लोंबकळत होती. हे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बघवत नव्हते. त्यांना १४ जुलै १९४१ रोजी कळले की गाडगेबाबांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब त्यावेळी भारताचे कायदेमंत्री होते. कामानिमित्त ते मुंबईत आले होते आणि लगेच त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीस रवाना व्हायचे होते. परंतु त्यांनी ते रद्द केले. २ घोंगड्या विकत घेऊन त्यांनी रुग्णालय गाठले. कोणाकडून काही न घेणाऱ्या गाडगेबाबांनी त्या प्रेमाने स्विकारत म्हंटले, “डॉ.साहेब, मी एक फाटका फकीर ! तुमच्याकडे खुप मोठाली कामे आहेत. तुमचा एक-एक मिनिट लाख मोलाचा आहे.

कशाला आले तुम्ही?” तेव्हा डॉ.बाबासाहेब म्हणाले, “बाबा, माझा अधिकार दोन दिवसाचा ! उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणीही विचारणार नाही. तुमचे अधिकार व कर्तृत्व थोर आहेत.” याप्रसंगी डॉ.बाबासाहेबांचे अश्रू निखळून त्यांची दृष्टीही सतेज झाली. म्हणून त्यांनी बहुजनांना न्याय मिळवून देणारा प्रतिभासंपन्न ग्रंथ ‘भारताचे संविधान’ याची रचना केली. त्यांच्या या स्वच्छता सेवा कार्यामुळे अनेक जण प्रभावित झाले होते. “देवभोळ्या माणसापासून तर नास्तिकांपर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले स्वच्छताविषयक तत्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे हुबेहूब शब्दचित्र उभे करणे माझ्या क्षमतेबाहेरचे काम आहे !” असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. खरोखरच ज्याने आपल्या मनाची स्वच्छता केली. शुद्ध सात्विक भाव मनात अंतर्भूत केले आहेत. तोच इतर सर्व बाबींमध्ये स्वच्छता राखू शकतो व तोच खरा स्वच्छतादूत शोभून दिसतो. केवळ तोंडाच्या वल्गना किंवा दिखावा करणारा महारथी स्वच्छतादूत शोभेलच कसा? त्यानंतर वं.रा.सं.तुकडोजी महाराजांनी त्यांचा समाज प्रबोधनाचा वसा अंगिकारून पवित्र ‘ग्रामगीता’ ग्रंथाचे लेखन केले. सुरस भजन-कीर्तनातून समाजमानस जागविले –

“मिळोनि करावी ग्रामसफाई | नाली मोरी ठायी ठायी |
हस्ते परहस्ते साफ सर्वही | चहूकडे मार्ग ||५३||
त्यात जी जी निघेल घाण | ती दूर न्यावी गावापासून |
अस्ताव्यस्त न देता फेकून | नीट व्यवस्था लावावी ||५४||”
[ पवित्र ग्रामगीता : ग्रामनिर्माण पंचक : अध्याय १२ वा : ग्रामशुद्धी ]

महाराष्ट्र शासनाने इ.स.२०००-०१ पासून ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ राबविण्यास प्रारंभ केला. का? तर बहुतांश आजार हे अशुद्ध हवा-पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात, हे शासनाला कळून चुकले होते. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रुप दिले गेले. एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामेही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी, घरादाराची स्वच्छता व अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन, घन-द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन, मानवी मल-मूत्राची विल्हेवाट, या सारख्या गोष्टींवर विचार करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामस्वच्छतेचा अर्थात ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.

गावातील विद्यार्थी असो किं अंगणवाडी सेविका व मदतनीस, सरपंच असो किं महिला व भगिनी अशा सर्वांनी या अभियानात भरीव योगदान दिले. एवढेच नाही तर गावाच्या सामाजिक तथा आर्थिक विकासालाही गती प्रदान केली. स्वेच्छेने स्वच्छतादूत म्हणून काम करणारी फळी तयार झाली. त्यांनी गावोंगावी स्वच्छतेची ग्राम-धून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न व सुदृढतेचा मंत्र प्रसारित केला, असे म्हणणे वावगे ठरू नये.
मनाच्या कोपऱ्यातील घाण वरवर पहाता दिसून येत नाही. मात्र चांगल्या शुभ महत्वाच्या कार्यालाही ती नासवू शकते. बाह्यांगावर पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून मिरविल्याने स्वभाव चमकेलच कसा? म्हणून आधी मनमंदिर सुशोभित केले पाहिजे. थोर ग्रंथकार संतशिरोमणी अवतारसिंहजी महाराज विश्वातील सकल मानवजातीला उद्देशून लिहिते झाले –

“उत्ते चिट्टी चिट्टे वस्त्तर मन विच मैल समाई ए ।
एह करतूत लुकी नही रहन्दी भावें लख छुपाई ए ।
मन विच हिरसी कुत्ता बैठा भौंके ते हलकान करे ।
मुंह विच राम बगल विच छुरियां ऐसा कम शैतान करे ।”
[ सम्पुर्ण अवतार बाणी : पद क्र. १५६ ]

ही जनतेची धडाडी पाहून महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींना ‘संत गाडगेबाबा स्वच्छग्राम पुरस्कार’ देणे सुरू केले होते. त्यात जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तर असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्वच्छ भारत अभियानामुळे तेही आता थांबविलेले आहे. ‘तीन तिघाडा न् काम बिघाडा..’ अशी स्वच्छतेची ऐसी तैसी झाली आहे. म्हणून आपण स्वयंस्फूर्तीनेच स्वच्छता राखू चला !
(समाप्त)

▪️!! निर्मल होऊ द्या आंतरोर्मी, वाचून वाचून संदेश पुरोगामी !!

✒️लेखक :- श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी,
(संत साहित्याचे गाढे अभ्यासक)
प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास,
मु. रामनगर वार्ड क्र.२०, गडचिरोली,
पो.ता.जि. गडचिरोली(मो:-७४१४९८३३३९)
ईमेल – krishnadas.nirankari@gmail.com