व्यापाऱ्यांच्या हात चालाखीने शेतकऱ्यांची फसवणूक – आर्द्रतेवर ठरवतोय सोयाबीन चा भाव

31

🔹बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष-कुंडलवाडी शहरातील चित्र

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.26ऑक्टोबर):- तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव आर्द्रतेवर ठरत असून केवळ मशीन चे बटन दाबून सोयाबीनची प्रतवारी ठरविण्यात येत आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टीने घायाळ झालेल्या बळीराजाला व्यापाऱ्यांच्या हातचालाखीचा फटका बसत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.

शहर व परिसरात पावसाच्या उघडीप मुळे सोयाबीन काढणीच्या कामाला वेग आला आहे. सततच्या पावसाने सोयाबीन पिकाची प्रतवारी मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकरी सोयाबीन सध्या विक्री करीत आहेत. दरम्यान सोयाबीन खरेदी करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी व दलाल सक्रिय झाले आहेत.

या व्यवसायातून शेतकऱ्यांची लूट करून पैसा कमवण्यासाठी अनेक नवखी मंडळी उतरली असल्याचे शहरात ठिकठिकाणी दुकान मांडलेल्या व्यापा-यावरून दिसत आहे. व्यापाऱ्यांकडून आर्दता मोजण्याच्या मशीनवर हातचालाखी करून भाव ठरविला जात आहे. व्यापार्‍यांच्या जवळ असलेल्या या आर्दता तपासणी मशीनवर एकूण एक ते आठ पर्यंत नंबर आहेत.या मधील प्रत्येक नंबरवर वेगवेगळ्या धान्याची आर्द्रता तपासणीसाठी वापरायचा आहे. दुसऱ्या पिकाचा नंबर दाबला जातो.

सोयाबीनची आर्दता भरपूर असून प्रतवारी खराब असल्याचे सांगत शेतकऱ्यांना कमी भाव दिला जात आहे.
सोयाबीन विक्री करताना व्यापाऱ्यांकडे आर्दतेचे प्रमाण ५ ते १० टक्केच फरकाने कमी-जास्त दाखवत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. एकाच सोयाबीनची वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडे अवघ्या अर्ध्या तासाच्या आत मध्ये १० ते १५ टक्के या प्रमाणात आर्द्रता कमी-जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांपर्यंत फटका बसत आहे.

आर्द्रता तपासणीच्या नावाखाली जर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर अशा व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यास त्यांनी थेट बाजार समितीकडे तक्रार दाखल करावी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे बिलोली तालुक्याचे उपनिबंधक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रमेश कांबळे यांनी सांगितले.