दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर पर्यावरणपूनरक पद्धतीने करा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

    58

    ?फटाक्यांच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    गडचिरोली(दि.27ऑक्टोबर):-फटाक्यांच्या वापरामुळे वायू प्रदुषण होऊन त्यातून विषारी वायूचे उर्त्सजन होते. त्यामुळे सदर बाबीस आळा घालण्याकरीता सुणासुदीच्या दरम्यान करावयाच्या उपाययोजनबाबत न्यायालयाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली आहे.

    कमी धूर उर्त्सजन करणारे फटाके व पर्यावरण पूरक फटाक्यांची निर्मिती व विक्री अनुज्ञेय राहणार आहे. फटाक्यांची माळ किंवा एकत्रीत फटाके यांच्या निर्मिती, विक्री व वापरास भरपूर प्रमाणात वायू, ध्वनी घनकचऱ्यांचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. फटाक्याची विक्री ही केवळ परवाना धारकास अनुज्ञेय राहिल व त्यांना केवळ परवाना प्राप्तच फटाक्यांची विक्री करता येणार आहे. ऑनलाईन संकेतस्थळावरुन जसे की, फ्लीपकार्ट, अमॅझान इत्यादी संकेत स्थळावरुन ऑनलाईन फटाक्यांची विक्री करता येणार नाही. असे आढळून आल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान समजण्यात येणार आहे व तो द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहील. फटाक्यामध्ये बेरीयम साल्टचा वापर अनुज्ञेय राहणार नाही.

    ज्या फटाक्याची निर्मिती यापूर्वी करण्यात आलेली आहे व जी सदर शर्ती पुर्ण करु शकत नाही त्यांना परवानगी असणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस अधिकारी यांनी दिवाळी व इतर धार्मिक कार्यक्रम, विवाह कार्यक्रम इत्यादी मध्ये होत असलेल्या फटाक्यांचा वापर खरेदी, विक्री व ताब्याबाबत तपासणी करावी व उपरोक्त नमुद निर्देशांचे उल्लंघन होत असल्यास फटाका परवाना रद्द करण्याबाबत त्वरीत निदर्शनास आणून द्यावे असे सूचित करण्यात आले आहे. फटाका विक्रेत्यांनी ध्वनीची घालून दिलेल्या मर्यादेपलीकडील फटाके बाजारात विक्रीस आणल्यास परवाना खारीज करण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य यांनी त्यांचे हद्दीमध्ये फटाक्यांचा दुष्परिणामाबाबत आवश्यक उपाययोजना करणेसही सूचना दिलेल्या आहेत. दिवाळी व गुरुपर्व इत्यादी सणांच्या दिवशी फटाक्यांचा वापर काटेकोरपणे रात्री 8.00 वाजेपासून ते रात्री 10.00 वाजेपर्यंतच करावा. ख्रिसमस, नवीन वर्ष उत्सवाच्या दिवशी रात्री 11.55 ते सकाळी 12.30 वाजेपर्यंतच फटाक्यांचा वापर करावा. फटाक्यांची आतिषबाजी किंवा वापर हा सामुहिक स्वरुपात करण्यावर जास्त भर देण्यात यावा व त्याकरिता संबंधित यंत्रणा/ प्राधिकारी यांनी जागा पुर्वनियोजित करावी. तसेच संबंधित यंत्रणा, प्राधिकारी यांनी खुल्या पटांगणात फटाका विक्रेत्याकरीता जागा निर्धारीत करून देण्यात यावी व तुटक स्वरूपात फटाका विक्रेत्यांची दुकाने लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.

    कोविड 19 मुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने यापुर्वी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्व परवानाधारकांना बंधनकारक असणार आहे. दिवाळी सणासाठी सामुहिक आतिषबाजीसाठी निवडलेली जागा ही इतर सण उत्सवाकरीता देखील वैध राहिल. लग्न व इतर उत्सवाकरीता देखील सुधारीत फटाके व पर्यावरणपूरक हिरवे फटाक्यांचा वापर अनुज्ञेय राहणार आहे. सामुहिक फटाक्यांची आतिषबाजी ही उपरोक्त नमुद कालावधीकरीता संपूर्ण जिल्ह्यास लागू राहील. विशेषत: पोलीस विभागाने फटाक्यांची आतिषबाजी नियोजीत जागी व वेळी पार पाडल्या जाईल याची खबरदारी घ्यावी.

    जर सदर बाबीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन अधिकाऱ्यास त्याकरिता व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येणार आहे व त्यांचेविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचे गृहित धरुन कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शंक सूचना संपूर्ण जिल्ह्यास पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व तहसिलदार यांनी त्यांचे स्तरावर काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.