गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर गुन्हा दाखल

43

🔺कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकरण आले अंगलट

🔺रेती चोरी प्रकरनाचे बिंग फुटणार – आरोपी फरार

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी(दि.2नोव्हेंबर):- गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह दोघांवर रविवार 1 नोव्हेंबर रोजी अहेरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह त्यांचे लहान भाऊ वैभव कंकडालवार ट्रॅक्टर चालक अमोल कोरेत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर असे की, रविवार 1 नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील इंदाराम परिसरात रेतीची तस्करी होत असल्याची भनक अहेरीचे तहसीलदार यांना लागल्याने पटवारी यांना सकाळी 9 वाजताच्या दरम्यान तपासणीसाठी पाठविले असता मुदुमतुरा गावाकडून इंदाराम कडे जाणाऱ्या मार्गावर विनाक्रमांकाची महिंद्रा कंपनीची लाल रंगाची ट्रॅक्टरवर अवैधपणे रेतीची वाहतूक करतांना रेतीने भरलेली ट्रॅक्टर सापडले. उल्लेखनीय म्हणजे सुरुवातीलाच पटवारी यांनी मोबाईलद्वारे ट्रॅक्टरचे फोटो काढून घेतले.

त्या दरम्यान अजय कंकडालवार यांचे लहान भाऊ वैभव कंकडालवार यांनी त्यांचे मोठे भाऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना मोबाईलद्वारे घटनेची माहिती दिली असता स्वतः अजय कंकडालवार 10 मिनिटात घटनास्थळी पोहचले. ‘मी साहेबांशी बोलून घेईन’ असे बोलत असतांनाच वैभव कंकडालवार यांनी सूचनाविना ट्रॅक्टर चालकाला सांगून गाडी घेऊन गेले व इंदाराम येथील स्वतःच्या घराच्या आवारात ट्रॅक्टर मधून रेती रिकामी केले.

त्यानंतर दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी “गाडी रिकामी सापडले असे सांगा काही होणार नाही, मी सांभाळून घेतो” असे म्हणत पटवारी यांच्याशी हुज्जत घातले आणि सुनावले. गाडी तहसील कार्यालयात आणू न देताच अवैधरित्या रेतीने भरलेली ट्रॅक्टर विनासुचना खाली केल्याने व तिथून गाडीला हलविन्यात आल्याने लगेच पटवारी यांनी, सदर बाब अहेरीचे तहसीलदार यांना कळविले जीविताला धोका होऊ नये यासाठी तात्काळ तहसीलदार यांनी पटवारी यांना कार्यालयात बोलावून घेतले व अहेरी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास सांगितले.

तक्रारी वरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार त्यांचे भाऊ वैभव कंकडालवार व ट्रॅक्टर चालक अमोल कोरेत यांच्यावर भारतीय दंड संहिता 379, 353, 186, 341, 34 नुसार गुन्हा नोंदविण्यात आले असून आरोपी फरार आहेत.
विशेष म्हणजे गत 21 सप्टेंबर सोमवार रोजी आणि मंगळवार 22 सप्टेंबर रोजी सलग दोनदा रेतीची तस्करी करतांना कंकडालवार बंधूंची ट्रॅक्टर पकडण्यात आले होते तरी सुद्धा राजरोस व बिनधास्तपणे रेतीची तस्करी सुरूच होती दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या या कारनाम्यामुळे आश्चर्य व संताप व्यक्त केले जात आहे.