“आनंदभान” अभंगसंग्रह – आनंदाचा डोह

32

🔹पुस्तक समीक्षण

प्रत्येक माणूस जीवनात आपआपल्या परीने जगत असतो. त्यावर लहानपणापासून घरचे संस्कार लाभत असतात. परंतु जगत असतानी आपली नोकरी, वावरण्याची ठिकाणे, मित्र परिवार याचाही चांगला वाईट परिणाम जीवन पटावर होत असतो. यादृष्टीने बंडोपंत बोढेकर हे साहित्यिक चांगल्या संस्काराच्या मुशीत वाढलेले दिसतात. त्यांना राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज स्थापित गुरूदेव सेवा मंडळाच्या विचारांचा परीस स्पर्श झाला.तसेच ग्रामीण संस्कृतीत ते चांगले रूजले. म्हणूनच संत वाड.मयासारखा समाजोपयोगी अभंग काव्य प्रकार त्यांच्या हातून लिहल्या गेला. आजकालच्या प्रदुषित झालेल्या धकाधकीच्या जीवनात आजचे आधुनिक कवीवर्य या काव्य प्रकाराच्या वाटेला सहसा जात नाही.

बहुतेक कवी मंडळी या प्रकारात एखादं दुसरी रचना करून मोकळे होतात.आणि उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग जुन्याच संत वाड.मयावर पिएचडी करतील. पण नवीन संत वाड.मय निर्माण करण्याची तसदी घेत नाहीत. हे कटु वाटत असले तरी ते सत्य आहे. आजच्या काळात संत वाड.मयाची वाणवा आहे. मात्र ही पोकळी “आनंदभान” हा अभंग संग्रह वाचकांना देऊन बंडोपंत बोढेकरांनी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दृष्टीने ते कौतुकास पात्र ठरले आहे.

कवीने “आनंदभान” हे समर्पक शिर्षक संत वाड.मयाला शोभेल असे दिलेले आहे.मुखपृष्ठावर हरी – विठ्ठल, साहित्यिक संत तुकडोजी महाराज व वारकरी दिंडी यांचे आकर्षक चित्र आहे.यावरून या संग्रहाच्या गर्भात काय असेल, हे सहज लक्षात येते. संग्रह वाचताना नित्य आनंदाचे भान होत राहते. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे…

रोमांच जीवन ।आनंदाश्रु नेत्री।
अष्टागंही गायत्री। प्रेम तुझे।

अशी बेभान आनंदाची अवस्था हा संग्रह वाचतानी होतो.याचे कारण यातील अभंगाची नाळ ही झाडीपट्टीतील ठिकाणे, चालीरीती,समस्या, झाडीबोली यासोबत जुळणाऱ्या आहेत.असे म्हणतात साहित्य हा समाजजीवनाचा आरसा आहे. त्याचे प्रतिबिंब या संग्रहात ओतप्रोत भरलेले दिसून येते .समाज किंवा संसार म्हटला कि,समस्या आल्या.या समस्या सोडवतांनी अनेकांची चांगली दमछाक होते.मात्र बंडोपंत यासाठी शांतीचा मार्ग खालील ओळीतून सहज सांगून जातात.

तेथे येतो कधी । विसंगती पेच।
शांती मार्ग हाच। सोडवेल ।

“हाच” या शब्दातून त्यांचा आत्मविश्वासही दिसून येतो किंवा

या तुम्ही एकत्र। मिटवा भांडण।
करावे कांडण। विकाराचे !!

असे चांगले सल्लेसुध्दा गावकऱ्यांना त्यांच्या भल्यासाठी देतात.

या कवींचे झाडीबोलीशी असलेले चळवळीचे नाते सर्वश्रुत आहे. त्यामुळे “आनंदाचे घर” या पहिल्याच अभंगात झाडीपट्टी म्हणजे त्यांना “आनंदाचे घर” दिसते.झाडीपट्टीच्या मातीशी ते इतके रूळले आहेत. मग त्याच्या कवितेत झाडीबोलीचे विस्मरणात गेलेले शब्द दिसणार नाही तर नवलच. त्यांच्या “आदिवासी बाई” या कवितेत …..

असती अंगात।चिंध्या चिरकुटे ।
रस्ती गोटेगाटे। सर्वत्रही!!

वरील अभंगात झाडी बोलीतील चिंध्या,चिरकुटे,गोटेगाटे हे विस्मरणात गेलेले शब्द चपखल बसविल्यामुळे आदिवासी बाईचे चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते.अशा अनेक झाडी बोलीच्या शब्दांना या संग्रहात उजाळा मिळाला आहे , हे झाडीबोली वरील त्यांचे उपकार होय.कवी “आनंदभान”या कवितेतून ते भोंदू साधूवर तुटून पडतात.

त्या असत्य सीमा।धार्मिक बुरखा।
मोक्षच अनोखा। वदे भोंदू !!

असा फालतूपणाचा भोंदूसाधू मोक्ष सांगतात.त्याऐवजी कवीने आध्यात्म म्हणजे…

सार्वभौम आत्मा। तरल लहरी!
मौन सुविचारी। निश्चितच !!

अशी सुंदर व्याख्या ते करतात. हेच परमसत्य होय , असे ते समजतात. हेच “आनंदभान” त्यांना अभिप्रेत असावे , असे मला वाटते.अध्यात्म म्हणजे काय? याचे बंडोपंता नी “अध्यात्म” या कवितेत सुंदर विवेचन केलेले आहे.श्रीमंत असला तरी प्रेम करणारा,दारिद्री असला तरी कर्तव्य सांभाळणारा,आपला संसार सुखी करणारा,विश्वाचे कल्याण करणारा,गाव दुरूस्तीसाठी नियोजन करणे म्हणजे हेच “अध्यात्म” होय ,असे सोपे तत्त्वज्ञान ते लोकांना सांगतात.हे त्यांचे सोपे हिताचे अध्यात्म वाचून राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या खालील ओळी आठवल्या शिवाय राहात नाहीत.

सेवेची ही नैतिक सत्ता !
वजन मिळविल गावहिता !
मग कोणी विरोध तत्त्वता !
न टिके तेथे !!ग्रामगीता !!

शहरातील जीवन कसे असते याचे “अद्वैती जीवन” या कवितेतून,

कपटी व्यवस्था। द्वेती तडफड।
द्रोही बडबड। आहे येथे।!

या चरणात नेमक्या शब्दात शहराची स्थिती मांडलेली आहे.कमी शब्दात,वर्मावर बोट ठेवणे ,हे बंडोपंताचे आणखी एक वैशिष्ट्ये यातून दिसून येते.
या संग्रहातून ‘मुखमंडी’ सारख्या नवीन शब्दांची पण निर्मिती झालेली दिसते.दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर मौलिक तूप बनते त्याप्रमाणे आनंदभान संग्रहात अनेक कवितांत शेवटच्या क्षणी आनंदी होण्याचे “मौलिक तत्त्वज्ञान” मिळते ,हेच “आनंदभान” वाचताना दिसून येते .
संपूर्ण संग्रह वाचतांना त्यांनी वास्तविकतेला महत्त्व दिले.कल्पनाविलास,अवडंबरपणा याला कुठेही त्यांच्या काव्यात थारा नाही.जे समाजातील सत्य तेच त्यांनी उचलले. सामाजिक विषमता, वाईट चालीरिती या गोष्टींचा त्यांनी तुकाराम महाराज,तुकडोजी महाराज या संताप्रमाणे अनेक काव्यपंक्तीत खरपूस समाचार घेतला , म्हणून त्यांना खऱ्या संतांच्या पंक्तीत बसण्याचा मान निश्चितच आहे , असे मला वाटते.

विशेष म्हणजे यांचे सर्व अभंग ६/६/६/४ या वर्णातील चरणात आहेत.यासाठी त्यांनी साधी,सरळ, सोपी भाषा वापरली , हे बंडोपंताच्या काव्याचे वैशिष्ट्ये होय.जे सामान्य जनांना सुध्दा आकलन होते, हे या अभंगसंग्रहाचे बलस्थान आहे.साहित्य कसे असावे याबाबत ते म्हणतात “खरे ते

साहित्य। अन्यायाशी युध्द।
तृष्णाच्या विरूध्द । उभे राही!!

यातून कवीने साहित्यिकांना केलेला उपदेश किंवा आवाहन निव्वळ पोपटबाजी नाही तर आपल्या “मानवी जीवन,नवारोग ,व्यसन,बुवाबाजी,विवाह बंधन,सत्य कथन ,प्रयत्न,उत्तम कर्म इत्यादि अभंगातून वेगवेगळ्या व्यक्तीरेखेवर त्यांना सुधारण्यासाठी दिलेले फटके होय ,अशा लोकांच्या हातात हा संग्रह पडल्यास ते विचलीत झाल्याशिवाय राहणार नाहीत.

एवढी ताकद त्यांच्या अभंगांत आहे ,असे मला जाणवते.
प्रत्येकाने वाचावे असे बंडोपतांनी ७८ अभंगरत्ने वाचकांसमोर या संग्रहाच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. ते समाजाला प्रकाश देणारे निश्चितच आहेत. या संग्रहाची गोडी वर्णावी तेवढी कमीच आहे.
त्यांच्या या अभंग कलाकृतीस माझ्या मनापासून शुभेच्छा.

✒️लेखक:-डॉ.चंद्रकांत लेनगुरे
गडचिरोली भ्र. 9423646743
(लेखक हे गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हा अध्यक्ष आहेत.)