रब्बी हंगामासाठी शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातून 25 नोव्हेंबरला प्रथम पाणीपाळी

32

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.22नोव्हेंबर):- शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2020-21 साठी एकुण तीन पाणी पाळया देण्याचे नियोजन आहे. यात पहिली पाणीपाळी बुधवार 25 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचे नियोजन आहे. याबाबत शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या कालव्यावरील लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे.

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2020-21 साठी कालव्यावरील प्रथम पाणीपाळी आवर्तनाचे नियोजन 19 नोव्हेंबर 2020 रोजी प्रकल्पाचा कालवा समितीच्या शासकीय सदस्यांच्या बैठकीत करण्यात आले आहे. उर्वरित पाणीपाळया बाबतचा अंतिम निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येईल. परंतू पाऊस व इतर अपरीहार्य कारणामुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल. रब्बी हंगाम 2020-21 पाणीपाळी क्र.1. बुधवार 25 नोव्हेबर 2020 शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी नमुना नंबर 7 व 7 अ मध्ये पाणी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुढील दर्शविलेल्या शर्तीस शासनाच्या प्रचलित नियमास अनुसरुन पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल. जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी.

आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकमध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी हंगामी दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजुर उपसा मंजुर जलाशय उपसा व मंजूर नदी /नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापूर्वी संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक आहे. पाणीपट्टी व भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालसास बंधनकारक राहणार नाही.

काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबधीत लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपतीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाने टाळावा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहातील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे.