बुध्द् आणि भारतीय संविधान

27

✒️लेखक:-प्रा. संदिप गायकवाड

प्रस्तावना-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक अनोखी देणगी दिली असून ते भारतीय संविधान होय.जगाच्या उज्ज्वल भविष्यसाठी आवश्यक असलेल्या जीवनशैलीचे वैश्विक संविधान निर्माण केले आहे.संपूर्ण मानव जीवनासाठी इहवाद,विज्ञानदृष्टी आणि सामाजिक न्याय असा एकजीव मूल्यप्रकल्प धम्म या संकल्पनेतून साकार केला आहे.

स्वातंत्र्य,समता ,बंधुता आणि न्याय या उदिष्टांचा वापर करून धम्माच्या विचाराचे पुनरूज्जीवन केले आहे. भारतीय संविधानवर तथागत गौतम बुध्दाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो . बाबासाहेब आंबेडकरांचे जगणेचं धम्माच्या शिकवणीनुसार असल्यामुळे त्यांना संविधान तयार करताना ज्या अडचणी निर्माण झाल्या तरी ते डगमगले नाही.
बुध्द् धम्म ही एक सामाजिक तत्वप्रणाली आहे हे आता सर्वाना आज समजले आहे.जगाला आकृ्ष्ट किंवा प्रभावित करणारी कोणती गोष्ट असेल तर बुध्द् धम्मातीलम नवतावाद,विज्ञानवाद,सहिष्णूता,प्रेम,सदाचार,मैत्री,करूणा इत्यादीमुळे सारे विश्व धम्माचा अभ्यास करीत आहेत.बहूतेक शास्त्रज्ञानी आपले सिध्दांत बुध्दाच्या कार्यकारणभाव सिध्दांताचे प्रतिपादन केले आहे.

भारतात वैदिक ब्राम्हणी कर्मकांडा विरूध्द पहिले आंदोलन बुध्दानी केले.समाजाला माणूसप्रिय विचार दिला.विषमतेच्या अनिष्ठ रूढी समाप्त करून लोकशाहीव्यवस्थेचा नवा सिध्दांत दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बुध्द् धम्माची आेळख लहाणपनातच झाली ते म्हणतात की,”दादा केळुसकरांनी नवा बुध्दाच्या चरित्राचे पुस्तक बक्षिस दिले,हे पुस्तक वाचल्यावर
माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला .मारूती ,लाता ,राम वनवासाला गेली.धोब्याच्या सांगण्यावरून सीतेचा त्याग ,कृष्णाच्या सोळा सहस्त्र बायका त्या गोष्टी काहीतरी भयंकर वाटल्या .या गोष्टी मनाची पकड घेईनात.

परंतु बुध्द् धम्माच्या अभ्यासाने मला जास्त च अभ्यास करावासा वाटला.आजही त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे व माझी अशी ठाम खात्री आहे की,जगाचे कल्याण फक्त बुध्द् धम्मचं करू शकेल.”बुध्दाच्या विचाराचे संगोपन त्याच्यावर असल्यामुळे भारतीय संविधानात बुध्द् तत्वज्ञानाचा आधार घेतला आहे.भारतीय संविधानात माणसाच्या माणुसकीला स्थान दिले आहे.व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांचा सामाजिक,आर्थिक,व राजनैतिक विकास करण्याचे माध्यमातून म्हणजे संविधान होय.या संविधानाच्या माध्यमातून भारताला बुध्द् शासनाची आेळख करून दिली.बुध्दाचा प्रभाव आपल्या संविधानावर असल्यामुळे ते कठीण काळातही भक्कमपणे उभे आहे.

बुध्द्कालीन शासन पध्दती-
बुध्द्कालीन शासन पध्दती गणाची होता.गणाचा प्रमुख राजा राहत होता .सर्व राज्याची जबाबदारी त्याच्यावर राहत होती.
सर्व मानवाना अधिकार मिळावे यासाठी काही समानसुत्रे समाजात होती.व्यवहारात पारदर्शिकता होती.अन्याय करणा-यासाठी कठोर शिक्षा होती.जातीभेद ,वर्णभेद , उच्च-नीच असे भेद नव्हते.सम्राट अशोकानी आपले सारे राज्य कारभार बुध्द् धम्माच्या शिकवणीनुसार चालविले म्हणून ते जगात महान चक्रवती राजा म्हणून ओळखले जातात.

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र,समता,बधुता व न्याय ही तत्वे दिली असे काही अभ्यासक मानतात पण मी ते तत्वे बुध्दाच्या धम्मातून घेतली आहेत.बुध्द हा जगातील पहिला लोकशाही निर्माण करणारा महान दार्शनिक होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाही विषयी म्हणतात की,”भारताला लोकशाही माहित नव्हती असे नव्हे एक काळ असा होता की भारत लोकसत्ताक राज्यांनी बहरला होता.

त्यावेळी राजेशाहीचे अनियंत्रित स्वरूप अजीबात नव्हते , भारताला पार्लमेंट माहित नव्हते की,पार्लमेंटरी पध्दती माहीत नव्हती असे नव्हे.बौध्द् भिक्खू संघाचा अभ्यास केल्यास दिसून येते की,भिक्खुसंघ म्हणजे पार्लमेंटच होते आणि आधुनिक काळातील पार्लमेंटच्या कामकाजाचे नियम बौध्द्संघाना माहित होते.त्या नियमांचे ते पालनही करीत होते.संघात बसण्याच्या जागेबद्दलचे नियम होते.ठराव आणण्याबद्दलचे होते.किमान उपस्थितीबद्दलचे होते.मतदान पत्रिकेबद्दलचे होते.मतमोजणीबद्दलचे होते.कायदेशीरपणाबद्दलच्या मंजूरी बाबतचे होते.अंतिम निकालाबद्दलचे होते.भगवान बुध्दांनी हे नियम बौध्द्संघाना लागू केले होते.”या चिंतनावरून असे लक्षात येते की,भारतीय संविधानातील पार्लमेंटरी पध्दत बुध्द् शासन काळातील आहे.फक्त तीला नव्या स्वरूपात भारतीय संविधानात मांडली आहे.ही बुध्द् धम्माची मोठी उपलब्धी आहे.

भारतीय संघराज्य पध्दती–
भारत हा जगातील वैशिष्टेपूर्ण असा देश असून विविधतेने नटलेला आहे.सर्व जाती-धर्म-पंथ-भाषा-वेष यांना एकत्र जोडायचे असेल तर अध्यक्षिय प्रणाली भारताला उपयुक्त ठरणार नाही.सर्व भारतीय यांचा विकास करण्यासाठी संसदीय शासन पध्दतीता स्वीकार केला.आपल्या संविधानाचे स्वरूप फेडरल असे आहे.यात दुहेरी केंद्र व्यवस्था आहे.ती म्हणजे केंद्रस्थानी संघ आणि सभोवताल राज्ये .यामुळे भारतातील कोणत्याही राज्याला वेगळे होता येत नाही.भारताने एकेरी नागरिकत्व स्वीकारल्याने राज्याना स्वतंत्र होता येत नाही.हे भारतीय संविधानाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.हा बौध्द धम्माच्या नीतीतत्वाचा विजय आहे.

लोकशाहीची व्याख्या—
जागतिक पातळीवर अनेक देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था असून,सर्व माणसाचा उद्धार करण्यासाठी लोकशाही सारखे दुसरे माध्यम नाही.काही विचारवंताच्या लोकशाही व्याख्यातून बुध्द्च्या तत्वज्ञानाचा प्रभाव पाहायला मिळतो.वॉल्टर बजेट म्हणतो की,”लोकशाही म्हणजे विचार विनीमय,चर्चा करून सरकार चालविने”. अब्राहम लिंकन म्हणतो की,”लोकांचे लोकांनी व लोकांकरीता चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही.”तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”लोकशाही म्हणजे जिच्यामुळे रक्तपात न होता आर्थिक व सामाजिक क्षेत्रात बदल घडवून आणता येईल अशी पध्दत किंवा सरकार होय.”यामधून लोककल्याणाचा विचारगर्भ प्रगट होते.

संविधानाची उद्देशपत्रिका—
कोणत्याही संविधानातील उद्दिष्टे व ध्येय स्पष्ट करणारी गुरूकिल्ली म्हणजे उद्देशपत्रिका होय.भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतून भारताच्या राज्यकारभाराची स्वरूप स्पष्ट केले आहे.भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेची सुरवात आम्ही भारताचे लोक…..यापासून सुरू झाले आहे.यामध्ये देशाचे सार्वभौमत्व ,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य घडविण्याची हमी दिली आहे.स्वातंत्र,समता,बंधुता व न्याय ही मुलतत्वे बुध्द् धम्माच्या सामाजिक अभिसरणातून घेतली आहेत.ही उद्देशपत्रिका एवढी महत्वाची आहे की या प्रभावातून सर अर्नेस्ट बार्करने आपल्या ग्रंथाच्या प्रारंभीच तिला उदधृत केले आहे.

मुलभूत अधिकार,मार्गदर्शक तत्वे,व मुलभूत कर्तव्ये–
भारतीय संविधानाच्या सुरवातीला ३९५अनुच्छेद व ८ परिशिष्टे होती.भारतीय संविधान भारतीय नागरिकांचे प्राणतत्व आहे.कारण ब्राम्हणी मनुस्मृती कायद्याने बहुजनाना गुलाम करुन टाकले होते.बाबासाहेबाना याच कायद्याने छळले होते . त्यासाठी भारताला नवीन राज्यकारभाराची निर्मिती करायची असेल सर्व नागरिकाचा विकास करण्यासाठी बुध्द् धम्माच्या नीतीतत्वाची आवश्यकता आहे हे हेरूनच त्यांनी संसदीय शासनाची निर्मिती केली.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १२ ते ३५ मध्ये मुलभूत अधिकार दिले असून ते अधिकार कोणत्याही सरकारला काढता येणार नाही.कारण ते न्यायप्रविष्ट आहेत.राज्याची मार्गदर्शन तत्वे ही अनुच्छेद ३६ ते ५१ पर्यंत असून सरकारला कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी नीतीदर्शक तत्वे आहेत.पण ती न्यायप्रविष्ट नाहीत.जर मार्गदर्शन तत्वांचा सत्तेतील पक्षांनी भंग केला तर निवडणूकिच्या दरम्यान मतदार दाब विचारतील म्हणून ते अनमोल आहेत.मुलभूत कर्तव्ये अनुच्छेद ५१ क मध्ये ४२ व्या घटना दुरूस्तीने जोडली आहेत.त्यामध्ये एकूण ११ कर्तव्ये दिली असून,आपण काय करावे ,काय करू नये याचे विवेचन केले आहे. या सर्वांवर बध्द धम्माच्या नीतीतत्वाचा मोठी प्रभाव पडला आहे.

भारतीय संसद—
प्रा तीन बुध्द् काळात लोकसभेसारखी राजव्यवस्था होती.तीच आजची भारतीय संसद आहे.ज्याप्रमाणे भिक्खू संघात निर्णय घेतले जायचे तशीच प्रणाली भारतीय संसदेत दिसून येते.राज्याच्या पूर्ण पणे अखत्यारीत असलेल्या विषयी संबंधी कायदे करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे.विधानमंडळ,मंत्रीमंडळ,आणि न्याययंत्रणा लोकशाहीचे मजबूत पिल्लर आहेत.प्रत्येकाने आपल्या नियमाप्रमाणे कारभार पाहावा हा हेतू घटनाकाराचा होता.भारतीय संविधानाची विविध अंगे असून त्यात निवडणूकिच्या आयोग,सामाजिक न्याय विभाग,घटनीदुरूस्ती,वित्त आयोग,आणीबाणी ,आरक्षण व्यवस्था,केंद्र व राज्य संबंध ईत्यादी ने भारतीय संविधान मोहरून आले आहे.पण आज भारतीय संविधानाची अंमलबजावनी होताना दिसत नाही.सामान्य जनता न्यायापासून वंचित ठेवण्यात येत आहे.जोपर्यंत सामान्य जनतेला त्यांचे अधिकार मिळत नाही तोपर्यंत भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश सफल झाला असे म्हणता येणार नाही.

भारतीय राष्ट्रध्वज व राजमुद्रा–
डॉ.बाबासाहेब आंबेडकरावर बुध्द् संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे आणि जगाला एकसुत्रात बांधणारी , विज्ञाननिष्ठा
जीवनशैली एकमेव असलेली तसेच सर्व धर्माना एकत्र ठेवणारी दुसरी कोणतीही विचारधारा नसल्याने बौध्द धम्माच्या प्रतीकांचा वापर करण्यात आला.राष्ट्रध्वज समिती मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे.कारण कॉग्रेसल प्रणित नेत्यांना तिरंगी ध्वजावर गांधी विचाराचे चरखा असावे असे वाटत होते,तर हिंदू नेत्यांना भगवा राष्ट्रध्वज असावा असे वाटत होते.शेवटी विचारमंथन झाले बाबासाहेब यांनी योग्य दाखले देऊन सम्राट अशोकाच्या राज्यकारभारातील चोवीस आरे असलेले निळ्या रंगानी नटलेले अशोक चक्र ध्वज समितीकडून मंजूर करून घेतले . भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज बुध्द् धम्माच्या गतीचे गीत गात आजही मोठ्या डौलाने फडकत आहे.त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने सम्राट अशोकाच्या लोकशाही राजवटीतील मुद्रित केलेला सारनाथ येथिल सिंहस्तंभावरून राजमुद्रा स्वीकारलेली आहे.या राजमुद्रेवरुन भारताचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवहार चालतो.बौध्द धम्माच्या प्रज्ञा,शील व करूणा या शिकवणीचा प्रभाव राष्ट्रध्वज व राजमुद्रेवर पडला आहे.तसेच राष्ट्रपतीच्या खुर्चीवर धम्मचक्र प्रर्वतन सुक्त लिखित अशोक चक्र अंकीत केले आहे.राष्ट्रपती भवनातील तथागत गौतम बुध्दाची मुर्ती शांतीचा मार्ग दाखवते . भारताचे राष्ट्रीय फुल कमळ बुध्द् जन्माचे पवित्र प्रतिक आहे.अशोका हॉल ,भारतरत्न पुरस्कार ,बिद्रवाक्य सत्यमेव जयते या सर्वांवर बुध्द् तत्वज्ञानाची मोहर उमटलेली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरचे सम्राट अशोककालीन बुध्द् शासन व गांधीजीची रामराज्य संकल्पना–
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतीय संविधान तयार करत होते तेव्हा त्याच्यासमोर तथागत गौतम बुध्द , सम्राट अशोक, छ.शिवाजी महाराज म.जोतीराव फुले,शाहू महाराज,सयाजीराव गायकवाड यांच्या मानवमुक्ती कार्याचा आदर्श होता.धम्म आणि लोकशाही समाजावाद हा एकच मार्ग देशाला उन्नतीच्या शिखरावर घेऊन जावू शकतो.तोच देशाला एकात्म व एकखंड ठेवू शकतो.

जगातल्या अनेक संविधानाचा अभ्यास केल्यावर बाबासाहेबला कळून चुकले की बुध्द् धम्माच जागतिक धम्म होऊ शकतो.आधुनिक काळाच्या कसोटीवर उतरणारा विज्ञाननिष्ठ धर्म म्हणजे बुध्द् धम्म होय.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”समता,स्वातंत्र,बंधुता व न्याय या चार समानसुत्रावर भारतीय संविधानाचा पाया उभा आहे.ही सुत्रे मी माझे आदर्श गुरू बुध्दाच्या धम्मातून घेतली आहेत.बौध्द् धम्म हा आशिया खंडाला प्रकाशित करणारा सूर्य असून आपल्या जीवनाच्या अंतिम सत्यापर्यंत पोहचविणारा सन्मार्ग आहे.सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा प्रभाव त्याच्यावर असल्यामुळे अशोकाच्या राज्यव्यवहारातील मुलतत्वे भारतीय संविधानात स्वीकारली.म.जोतीराव फुले यांच्या विषयी ते म्हणतात की,”ब्राम्हणेतरांचे खरे गुरू महात्मा जोतीराव फुले आहेत.सर्व समाजाला माणूसकिचे धडे त्यांनी दिले . पूर्वी ही राजकारणात त्याच्या मार्गाने गेलो.काही नेत्यानी महात्मा जोतीराव फुले मार्ग सोडला असला तरी आम्ही जोतीरावाचा मार्ग सोडणार नाही.
त्यासाठी त्यांनी म.जोतीरावाच्या घराचा क्रमांक असलेल्या ३९५ अनुच्छेदापर्यंत घटना थांबवली .कारण या देशाचा राज्य कारभार हा म.जोतीरावाच्या घरापासून,विचारापासून चालला पाहिजे ही भावना त्याच्या मनी असावी असे वाटते.

गांधीजीची संकल्पना ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेची होती,म्हणजे रामराज्याची होती.त्यांना मनुस्मृती मधील व्यवस्थेवर आघात न करता शूद्रांनी आपल्या धर्मग्रंथानुसार वागावे असे त्यांचे म्हणणे होते.गांधीजी पुरानमूल्यांना नव्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करत होते.त्यांनी सर्व माणसाना समान दर्जा देण्यास सातत्याने विरोध केला .हिंदू तत्वज्ञान हे समाजव्यवस्थेतील उच्चतम पातळी असून स्वतःचा विकास हा आध्यात्मीक पध्दतीने करावा ही भूमिका त्यांची होती.गांधीजी ब्राम्हणवादाचा पुरस्कार करतात तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,ब्राम्हणवाद असमानतेवर आधारीत अवैज्ञानिक विचार आहे.ब्राम्हणवाद समाप्त झाल्याशिवाय भारताला उज्ज्वल भविष्य नाही.गांधीजी स्वयंपुर्ण खेडी ही भूमिका घेतात तर डॉ.आंबेडकर खेड्यांना जातीवादाचे डबके संबोधतात.यामधून अस्पृश्यांनी लवकरात लवकर सुटका करून शिक्षणाची कास धरून शहराकडे प्रस्थान करावे त्यासाठी ते आपल्या बांधवाना शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा हा नारा देतात .यामधून अस्पृश्य मानवात नवे आत्मभान जागृत केले.

विषमतेला मुठमाती—
भारतीय संविधानावर बुध्दाचा प्रभाव असल्यामुळे भारतातील अस्पृश्यतेला अनुच्छेद १७ च्या कायद्यान्वये मुठमाती दिली.हजारोवर्षापासूनच्या दास्य श्रृखंलेला तोडून टाकले.तसेच अनुच्छेद १४ अन्वये कायद्यापुढे समानता मुलभूत अधिकारात प्रविष्ट केले.स्त्रीला जो दर्जा बुध्द् काळात होता तो दर्जा भारतीय संविधानाने दिला.हिंदू कोडबिलामधून बुध्द् कालिन मातृसत्ताक शक्तीची पुर्नरचना केली.

युध्दाला खरा पर्याय बुध्द्—
आज सारे जग कोरोना विषाणू मुळे हादरून गेले आहे.सा-या जगात युध्दजन्य परिस्थितीत निर्माण झाली आहे.प्रत्येक राष्ट्र स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र श्रीमंत राष्ट्रची बाजू घेत आहे.सारे संरक्षण क्षेत्रात जास्त गुतंवणूक करीत असून अणुबॉम्बची पेरणी करीत आहेत.आज पृथ्वीवर युध्दजन्य काळे ढग जमा झाले असून हे विध्वसंक ढग समाप्त करायचे असेल तर बुध्द् धम्माची जगाला गरज आहे.जगातील शोषण,आंतकवाद,नरसंहार, अन्याय , अत्याचार यांना थांबविण्यासाठी बुध्द् विचाराची कास सर्वानी धरली पाहिजे.

समारोप–
बुध्द् आणि भारतीय संविधान याचा योग्य मेळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बसवला आहे.त्यांना ज्या प्रमाणे घटना समिती मध्ये त्रास झाला तो शब्दात व्यक्त करता येणार नाही.भारतीय संविधान जेव्हा आकारायला येत होते तेव्हा बहुसंख्य उच्चवर्णीय सनातनी हिंदू असल्यामुळे अनेक वेळा वादळी चर्चा व्हायच्या या चर्चेत योग्य संदर्भ देऊन त्यांच्या पश्नावर उत्तर देऊन एक-एक अनुच्छेदाने भारतीय संविधान तयार झाले.डॉ.आंबेडकर म्हणायचे की,”आपण लवकरात लवकर सैंवधानिक नैतिकता स्वीकारली पाहिजे,तसेच राजकिय समानता मान्य करताना आर्थिक व सामाजिक समानता लवकरात लवकर स्थापना करावे.जर असे झाले नाही तर हक्क मिळाले नाही म्हणून भारतीय जनताच लोकशाहीचा डोलारा उध्दवस्त केल्याशिवाय राहणार नाही.

लोकशाहीच्या स्थापनेसाठी काही गोष्टी वर्ज कराव्या . व्यक्तीपुजा भारताला लागलेला रोग आहे.यापासून अलिप्त राहले पाहिजे.त्यासाठी जॉन स्टुअर्स याचा भयसुचक संदेश दिला आहे.ते म्हणतात की,”आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नये.”हा मोलाचा संदेश आपण विसरत चाललो आहोत.आज भारतीय राजकारणात व्यक्तीपुजेचे अवास्तव स्त्रोम माजले असून अंधःभक्ताची अज्ञानी खोगीरभर्ती ग्यांग तयार झाली आहे.ही अज्ञानी खोगीरभर्ती ग्यांग भारतीय संविधानाची मुलभूत चौकट उध्दवस्त केल्याशिवाय राहणार नाही किंवा तसे करण्यासाठी राजकारणी षडयंत्र करीत आहेत.म्हणून देशाचा उत्कर्ष करायचा असेल तर आपल्यातील भेदाभेद नष्ट करावे लागेल.

त्यासाठी बुध्द् धम्म हाच अभ्युदयाचा महामार्ग आहे.जगातील सर्व माणसाना जोडणारा करूणामय मार्ग आहे.बुध्दाची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे.मानवाच्या वास्तवादी जीवनाचे सारे तत्वज्ञान विशद करते ,दुःखाचे निवारण करते,दुःख निवारण्याचा मार्ग दाखविणे ह्या धम्माचे अंतिम ध्येय आहे.बुध्द धम्माच्या प्रज्वलीत प्रकाशा शिवाय आपण आपले ध्येय पूर्ण करू शकत नाही यासाठी भारतीय संविधानाला आपल्या प्राणापेक्षाही जपले पाहिजे.हेच आपल्या जीवनाचे प्रथम आणि अंतिम ध्येय असावे.