उध्दवराव, दाखल्यावरचीही जात काढून टाका !

31

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

महाराष्ट्र सरकारने राज्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला व कौतुकास्पद आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. पण ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला जातो आहे तो उद्देश साध्य करायचा असेल तर हा निर्णय पुरेसा नाही. जात नावाची विषवल्ली नष्ट करायची असेल तर निव्वळ पानं किंवा फांद्या तोडून उपोयग नाही. त्यासाठी थेट मुळावरच घाव घालावा लागेल. या विषवल्लीची मुळं अबाधीत ठेवून निव्वळ फांद्या किंवा पाने तोडून काहीही होणार नाही. निव्वळ जातीवाचक नावाच्या वस्त्यांची नावे बदलून जात संपुष्टात येणार नाही. यासाठी प्रामाणिकपणे अनेक उपाय योजावे लागतील, अनेक प्रयोग करावे लागतील.

जाती-पातीचे मस्तावलेले अहंगंड जोर-जबरदस्तीने तोडावे लागतील. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेवून आतंरजातीय विवाहांना अजून उत्तेजन आणि संरक्षण द्यावे लागेल. उध्दवराव ज्या प्रबोधनकारांचे नातु आहेत त्या प्रबोधनकारांचा कोंदड त्यांना हाती घ्यावा लागेल. त्यासाठी जात वास्तवावर पोसलेली, वाढलेली आणि प्रस्थापित झालेली भटशाही संपुष्टात आणावी लागेल. जात नावाची हागणदारी ज्या व्यवस्थेने वसवली ती व्यवस्थाच मुळासकट उखाडून काढायला हवी. जोवर ती व्यवस्था बदलली जात नाही तोवर हे जात वास्तव अटळ आहे. भटी थोतांडात या जात व्यवस्थेचा प्राण अडकलेला आहे.

ही भटी व्यवस्था जोवर संपवली जात नाही तोवर जातही संपत नाही हे तितकेच खरे. जातीच्या उतरंडीत निव्वळ सवर्ण किॆवा ब्राम्हणच जातीयवादी आहेत अशातला भाग नाही तर प्रत्येक जात कमालीची जातीयवादी आहे.प्रत्येक जातीच्या लोकांनी जातीयवाद जोपासला आहे. क्रमानुसार उतरंडीतले प्रत्येक मडके खालच्या मडक्याला जातीवरून छळते आहे, त्रास देते आहे. अलिकडे सोशलमाध्यमात या जातीयवादाचे सोशली करन आणि डिजीटायझेनही झाले आहे. तिथेही जातीच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. जात व्यवस्थेतली तळातली जातही जातीयवाद जोपासते, कुरवाळते.

आजही प्रेम विवाह करणा-या जोडप्यांना जीवानिशी मारले जाते. त्यांनी आंतरजातीय लग्न केले तर त्यांचे खून केले जातात. सैराट चित्रपटात नागराज मंजूळेने जे मांडले होते ते चित्र सर्वत्र पहायला मिळते. जात लोकांच्या मनात खोलवर रूजलेली आहे. तिची पाळमुळं अधिक खोलवर गेलेली आहेत. ती उखाडून काढण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करायला हवेत. सहजासहजी जात संपणार नाही. त्यामुळे जिथे जिथे जात दिसते, समजते, ओळखली जाते तिथे तिथे काम करायला हवे. जातीच्या नावाने ओळखल्या जाणा-या वस्त्यांची नावे जशी बदलली तशीच शाळेच्या दाखल्यावरूनही जात काढायला हवी. शासकीय कागदपत्रावरूनही जात काढायला हवी.

प्राथमिक शाळेत शाळेचा पट मांडताना सर्रास जातीचा उल्लेख असतो तो ही टाळायला हवा. नकळत्या वयात शाळेतले शिक्षक पट मांडणी फलकावर विद्यार्थ्यांची जात नमूद करतात ती जात कायमस्वरूपी डोक्यात बसणारी असते. असे प्रत्येक ठिकाणचे उल्लेख टाळायला हवे आहेत. हे काम तळमळीतून व्हायला पाहिजे तरच जात संपवणे शक्य आहे. सरकारी नोकरीत आंतरजातीय विवाह करणारांना प्राधान्य द्यायला हवे. त्यांना नोकरीत, उद्योग-धंद्यात अधिकच्या सोई-सुविधा, सवलती द्यायला हव्यात. आंतरजातीय विवाह कसे वाढतील याकडे सरकारी पातळीवरून लक्ष द्यायला हवे. सरकारने त्याला प्रोहोत्सान व संरक्षण द्यायला हवे. हे काम ग्राऊंडला व्हायला हवे कागदावर नव्हे.

गावा-गावागावात जाती-जमातीच्या एकवटलेल्या वस्त्या व गल्ल्यासुध्दा तोडून सर्वसमावेशक लोक तिथे कसे राहतील, एकाच गल्लीत अठरा-पगड जातीचे लोक कसे राहतील याची खबरदारी घ्यायला हवी. प्रत्येक गावात, शहरात विविध जाती-जमातीच्या गल्ल्या, मोहल्ले आहेत. त्या ठिकाणी एकाच जातीचे लोक वास्तव्यास असतात. अशा गल्ल्या, मोहल्लेसुध्दा सर्वसमावेशक व्हायला हवेत. एका ठिकाणी एकाच जातीचा समुह असता कामा नये याचीही दक्षता घ्यायला हवी. पुर्वी शहरामधल्या अपार्टमेंटमध्ये हे होत होतं पण हल्ली त्यालाही खिळ बसली आहे. तिथेही आता जात पाहून प्लँट विकले जातात. हल्ली शहरातही जातीयवाद फोफावताना दिसतो आहे. हे टाळायला हवे.

असे करणारांना दंड करायला हवा. त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत. जात संपवण्यासाठी सरकारचे आणि सर्व पक्षियांचे प्रामाणिक प्रयत्न असायला पाहिजेत. राजकारण्यांनी राजकारणात जात वापरण्याचे बंद करायला हवे. जातीपातीचे राजकीय सेल बंद करायला पाहिजेत. प्रत्येक राजकीय पक्षाने विविध जाती-जमातीचे सेल काढले आहेत. जातवार दुकानं उघडली आहेत, ही दुकानं बंद पाडली पाहिजेत. राजकारणातून जात सर्वाधिक घट्ट केली जाते. त्यामुळे राजकारण्यांनी त्यांची जातीची काऊंटर सर्वप्रथम बंद करायला पाहिजेत. वस्त्यांसोबत जातवाचक आडनावेही बंद करायला पाहिजेत.

या सगळ्या कामात खरेतर पुरोगामी चळवळीची अधिक जबाबदारी आहे. एका धनगर पोराशी स्वत:च्या बहिणीचे लग्न लावून देणा-या शाहू राजांचा वारसा या चळवळीला आहे. पण हिच पुरोगामी चळवळ अधिक जातीयवादी आहे. अनेक पुरोगामी आतल्या खोलीत कट्टर जातीयवादी असतात. त्यांचे आतलेे आणि बाहेरचे व्यवहार वेग-वेगळे असतात. जात मुक्तीच्या स्टेजवर भाषणं करणारे अनेक भामटे स्वत:च जात व्यवहार पाळतात. जात मुक्तीची भाषण जोरदार करतात पण त्यांच्या अंत:करणातील जात संपलेली नाही. पुरोगामी चळवळीतला जातीयवाद मोडला गेला किंवा ही चळवळ प्रामाणिक झाली तर अधिक चांगले काम होईल.

पुरोगाम्यांच्यातले जातवास्तव अधिक गंभीर आहे. प्रतिगामी त्यांच्या विचारांशी प्रामाणिक आहेत पण पुरोगामी दांभिक आहेत आणि त्यांचा दांभिकपणा पुरोगामी चळवळीला मारक आहे. आजवर तेच झाले, यांच्या दांभिकपणामुळेच प्रतिगामी फोफावले. राज्यातले जात वास्तव यामुळेच अधिक तीव्र झाले. ही पुरोगामी मंडळी जर प्रामाणिकपणे काम करत राहिली असती तर महाराष्ट्रात जात वधारली नसती. राज्यातली जात नावाची विकृती आणि विषवल्ली संपवायची असेल तर इतर उपायाप्रमाणे छत्रपती शाहूरांजाचा कृतीशील विचार जगणारी पुरोगामी चळवळही बळकट करायला हवी. त्यांच्यातला जातीयवाद संपवायला हवा.