अॅग्रो टुरिझम विश्व व परभन्ना फाउंडेशन तर्फे सुमीत अंबेकर यांना २०२० चा पत्रकार कृतज्ञता पुरस्कार प्रदान

    43

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.,6डिसेंबर):-कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा करता सेवाकार्य करणाऱ्या वैद्यकीय, पोलिस, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक अरुण खोरे, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते.

    पत्रकार सुमीत अंबेकर यांनी कोरोना महामारीच्या काळात पत्रकारितेची जबाबदारी पार पाडत गोर-गरीब व गरजूं घटकातील शेकडो लोकांना अन्न, धान्य व औषधी उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेऊन संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत चालू ठेवले होते. तसेच मिडिया वल्ड न्यूज च्या “मदत नाही कर्तव्य” या विषेश कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमीत यांनी पुणे शहरातील विविध क्षेत्रातील कोरोना युद्धांच्या कामांचा आढावा तसेच जनजागृती करण्यासाठी मुलाखती घेऊन प्रसिद्ध केले.

    गणेश चप्पलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. विजय गायकवाड यांनी आभार मानले.

    जेष्ठ पत्रकार, माजी संपादक अरुण खोरे म्हणाले, “समाजकार्याचा मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांचा वारसा कोरोना काळात अनेकांनी जपला. गांधीजींनी जशी कुष्ठरोगी परचुरे शास्त्री यांची सेवा केली, तसाच सेवाभाव या काळात पाहायला मिळाला. मानवतेचा, करुणेचा बिंदू डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी निस्वार्थ सेवा केली.”

    रवींद्र धारिया म्हणाले, “मानवसेवा ही ईश्वरसेवा आहे. धर्म, जातीभेद विसरून लोकांनी या काळात समाजसेवा केली. गरजूंना, वंचितांना मदतीचा हात वनराईसह इतर अनेक संस्थांनी, व्यक्तींनी दिला. दुष्काळग्रस्त भागात वनराईचे काम सुरू असून, तेथील लोकांमध्ये सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा आमचा प्रयत्न आहे.”