महानिर्वाणानंतर चटके सोसणारा महामानव

38

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विषयी जितके लिहिले जाईल तितके कमीच पडणार,कारण त्यांचं उभ आयुष्य हे एक आपल्यासाठी पुस्तक आहे,ते कोणा विशिष्ट व्यक्ती,जात ,समूह यासाठी नसून संपूर्ण मानव जातीसाठी आहे.मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांचे आयुष्य खर्ची गेले आहे.

ज्यांनी संपूर्ण आयुष्यात पिडीत, वंचित,बेदखल, यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला,त्या महामानवासच हयात असताना आणि हयात नसताना पण म्हणजेच अद्याप पर्यंत सभ्यतेचे,असहिष्णुतेचे,अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागत आहेत.ते पूर्वीपासून अन्याय करत होते त्यांच्याकडून आणि ज्यांच्यासाठी आयुष्यभर लढा दिला त्यांच्याकडून पण आंबेडकरांना मरणोत्तर त्रासच सहन करावा लागत आहे.

ज्या महामानवाने फक्त संपूर्ण मानव जमात हि एकच जात आहे,आणि सर्वाना जगण्याचा अधिकार सारखाच मिळाला पाहिजे,यासाठी लढा दिला. आंबेडकरांच्या आयुष्यात काट्यांची पेरणी ज्यांनी केली,आज त्यांचीच पिलावळ आंबेडकरांना बदनाम करत सुटला आहे ,अथवा त्यांच्या कार्याला मातीमोल ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत,पण अशा एका संकुचित विचारामुळे कोणाचे कार्य झाकले जात नसून उलटपक्षी त्या विचारणा मानणारा प्रवाह वाढतो . त्यामुळे देशात आंबेडकरी विचारधारा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे . जे आंबेडकरी विचारांना विरोध करत आहेत त्यात आंबेडकरी चळवळीचे नुकसान काही नाही तर ते स्वतः स्वतःच्याच पिढ्याना अंधाराच्या खाईत लोटत आहेत.

आंबेडकरी विचार म्हणजे तरी काय?

समान न्यान, समान वागणूक,मानवता हाच श्रेष्ठ धर्म,विज्ञान निष्ठ विचार , योग्यतेवर आधारित काम,जातपात विरहित समाज,डोळस श्रध्दा, अंधश्रद्धा यापासून फारकत ,न्यायाची जोपासना तर अन्यायाचा विरोध, गुलामीपेक्षा स्वाभिमानी जीवन, कर्मावर श्रद्धा, स्वत्वाची जाणीव या तत्वावर आधारित विचारांची पेरणी आंबेडकरांनी केली, या विचारधारेलाच तर आंबेडकरी विचारधारा म्हणता येईल. या विचारांना जो विरोध करेल तो स्वतः चे नुकसान करून घेईल,यात आंबेडकरी चळवळीचे वा विचारांचे काही नुकसान होणार नाही कारण भविष्यात संपूर्ण विश्वाला याच मूल्यावर चालावे लागणार आहे.तरच जग टिकेल. अन्यथा वर्चस्ववादाच्या खाईत बुडून मरेल.

आंबेडकरांचा विरोध????

जे समाज बांधव आंबेडकरांना विरोध करत आहेत त्यापैकी काही जणांचे खालील करणे अनुभवायला मिळतात..

जन्मजात मनूच्या विचारांचा पगडा, उच्च-निचतेचा भाव, मानव-मानवात भेद, रूढी-परंपरांच्या जोखडात अडकुन पडलेले असणे, श्रद्धा-अंधश्रद्धा फरक न समजणे, सनातनी विचारधारेचे मनोवैज्ञानिक अतिक्रमण , विज्ञानापेक्षा दंतकथांवर विश्वास असणे हे झाले विचारांच्या बाबतीत.कर्मकांड,धार्मिक विचारधारेच्या जोखडात अडकून राहणे, वर्णव्यवस्था आणि त्याचा प्रभाव, वर्चस्ववादाची भुमिका, या सारख्या अनेक बाबी आंबेडकरी विचारांना विरोध करायला भाग पाडतात. त्यामुळे ज्यांच्यावर अशा प्रतिगामी विचारांचा पगडा आहे साहजिकच ते शाहू, फुले, कबिराच्या विचारधारेवर चालणाऱ्या आणि कित्येक लोकांना ती विचारधारा आत्मसात करायला लावणाऱ्या आंबेडकरांना विरोध दिसून येतो.

राज्यघटना..कळीचा मुद्दा- ‘आरक्षण’….

मुळात बऱ्याच लोकांना आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली याचंच पोटसुळ आहे ,कारण ज्यांना आपण अस्पृश्य म्हणून समाजबहिष्कृत केलं होतं त्यांनीच या देशाची राज्यघटना लिहावी हेच बऱ्याच अविचारी,तर्कहीन अविचारी माणसांना वाटत असते.पण ते त्यांच्या योग्यतेमुळे एवढं मोठं महान कार्य करू शकले होते. याचा विसर याना पडलेला दिसतो आहे. राज्यघटना समतेवर,न्यायावर ,निष्पक्ष,निधर्मी आहे जे आंबेडकरांच्या महानतेचं ,मानवतेकडे पाहण्याच्या विशाल दृष्टिकोनाचं प्रतीक आहे . जे संपूर्ण देशासाठी अतिशय योग्य,हितावह,मानवतेचं रक्षण करणारं आहे.त्याचेच प्रतिबंध राज्यघटनेत आढळून येते.

आरक्षण….

मुळात आरक्षण का द्यावे लागते हेच बरेच जण समजून घेत नाहीत,ज्यांना आतापर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची संधी दिली नाहीत, उलट त्यांच्यावर अन्याय केलात , अशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही अंशी प्रमाणात प्रतिनिधित्व दिले आहे, ते काही कोणाचा अधिकार हिरावून घेऊन नाही तर त्याला आतापर्यंत जो अधिकार मिळाला नाही तो मीळवून देण्यासाठी. तो पण सरसकट सर्वाना नाहीतर त्या समूहातील योग्य त्याच व्यक्तीला.

पण याचा विचार न करता आरक्षण याना का दिले? आम्हाला का नाही? आरक्षण म्हणजे भीक. आंबेडकरांनी फक्त त्यांच्या जातीचा फायदा व्हावा म्हणून आरक्षणाचा घाट घातला अशा तर्कहीन विचारांचा सुळसुळाट या देशात माजला आहे,ज्याला कसल्याही प्रकारचा आधार नाही .देशात जवळपास पन्नास टक्के लोकसंख्येला आरक्षणाचा लाभ राज्यघटनेतून मिळतो.म्हणून आंबेडकरांनी घटना लिहीताना पक्षपात केला असे समजनेच दुधखुळेपणा आहे . मग हेच लोक आंबेडकरांबद्धल अपशब्द अथवा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात .पण त्यामुळे त्यामुळे महामानवाचा कमीपणा होत नसून यांच्या ओंगळवण्या विचारांचे प्रदर्शन जगभर होत असते.विचारांनी नागडे असलेले लोक दुसऱ्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असतात.

स्वकियांकडून विचारणा हरताळ…..

बराच समाज शिकला,सुशिक्षित झाला पण आंबेडकरी विचारांशी इमानदार झाला नाही. संघटित तर झालाच नाही. उलट स्वतःमध्ये ‘मी पणा’ आणला. ज्या आंबेडकरांनी ज्या विचारांचा विरोध करून धर्मांतर केले होते. त्याच विचारांना आजचा समाज आतापर्यंत चिटकून राहिल्याचे दिसून येत आहे. कर्मकांडात गुंतुन गेल्याचे दिसत आहे. आता तर आंबेडकर आणि बुद्धालाच कर्मकांडांचा मार्ग बनवल्याचे आढळून येत आहे. आंबेडकर ,बुद्ध यांची पुजा करणे,त्यांच्या जयंतीनिमित्त ,महापरिनिर्वाण दिनानिमित्त भोजन दान करणे हा एक कर्मकांडांचाच एक प्रकार आहे.असे प्रकार सर्रासपणे गावागावात ,शहराशहरात होताना आढळून येत आहेत.याला पण काही लोक अपवाद आहेत.

पण जर आंबेडकरांचे आपण खरेच अनुयायी असू तर त्याप्रमाणे आपले स्वतःचे वर्तन असायला पाहिजे.
आपली मुलं,तरुण पिढी पुन्हा एकदा भरकटत चालली आहे,व्यसन,वेळेचा अपव्यय, मौज मजा यात आपला वेळ वाया घालवत आहेत.

आंबेडकर हे फक्त जयंतीला ढोल,डीजे लावून नाचून आंबेडकरास आम्ही मानतो असे म्हणायचे नसते किंवा जयंती तशी वाजतगाजत साजरी करायची नसते तर ती त्यांचे विचार आत्मसात करून कृतीत उतरायची असते. तरच या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पील्यासारखे होईल . अन्यथा आपण पण त्यांच्या माघारी त्यांच्या विचारांची प्रतारणा केल्यासारखे होईल.

“चला आंबेडकरी होऊया, आंबेडकर आत्मसात करूया. आंबेडकरी विचारधारेचा प्रसार करुया.”

जय भीम..नमो बुद्धाय..

✒️लेखक:-सतीश यानभुरे,नांदेड
प्राथमिक शिक्षक, पुणे