लाचारीचे समर्थन कशासाठी ?

67

अतिशय बलदंड आणि कणखर मनोवृत्तीच्या समाज समुहाला,त्यांचा पाडाव केल्यावर प्रतिक्रांतीवाद्यांनी सर्वशक्तीनिशी, अनेक हातखंडे वापरुन,अन्यायाची परिसीमा गाठून, त्यांचे हाल हाल करून त्यांना असहाय्य बनविले आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या मेंदूत लाचारी पेरली हा सिद्धांत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती,प्रतिक्रांतीच्या लढ्याचा अभ्यास करून आम्हाला शिकविला….!!

आणि म्हणूनच मग डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लढ्यातुन स्वाभिमान,आत्मभान पेरण्याचं कार्य अविरतपणे केलं…!!लाचारीने माणुसपणं करपलं,हरपलं, जनावरांची अवस्था निर्माण झाली,ऊकीरड्यावरच्या अन्नालाही देह मौताज झाला हा इतिहास आहे…!!बौद्ध धम्माची दीक्षा देतानांही २२ प्रतिज्ञा देण्याच्या पाठिमागचा ऊद्देशही तोच होता,हजारो वर्षांपासून मनात, आणि मेंदूत निर्माण झालेली लाचार वृत्ती संपविणे, मेंदूची साफसफाई करणे, जळमटं धुवून काढणे…!!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकांड पांडित्याच्या जोरावर निर्माण केलेलीं संवैधानिक व्यवस्था,लोकशाही प्रधान सत्तर वर्षाचा “समतावादी” व्यवस्थेचा कालखंड साक्षी आहे, इथल्या सत्ताधारी राजकीय पक्षांनी आणि प्रस्थापित राजकीय नेतृत्वाने आंबेडकरवादी समुहाच्या ऊद्धाराचे वा आंबेडकरी तत्वज्ञानावर आधारीत राजकारण कधीच केले नाही…!!
ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून देशाची सेवा केली त्या महामानवाचा साधा फोटो सुद्धा संसदेत लावला नाही हे कशाचे लक्षण आहे…??संवैधानिक आयुधांचा वापर करुन समताधिष्ठित समाज निर्मीती ऐवजी आपल्या राजकीय सोईसाठी “लाचार” आणि गुलाम प्रवृत्तीचे लोकं शोधून त्यांना आंबेडकरवादी म्हणवून समाजासमोर पेश करणे हा व्यवहार, सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने बेमालूमपणे केला हाही इतिहास साक्षी आहे…!!गेल्या सत्तर वर्षाच्या राजकीय इतिहासात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सक्षम राजकीय पक्ष का ऊभा राहिला नाही..??याचे सिंहावलोकन केले तर चटकण लक्षात येते की,लाचारांनी आंबेडकरवादी राजकारण पराभूत केले…!!

इथे कुणी मंत्री झाले,कुणी गृहमंत्री झाले,कुणी सामाजिक न्यायमंत्री झाले, कुणी मुख्यमंत्री झाले कुणी राज्यपाल झाले,परंतु त्याच आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या एकालाही असे वाटले नाही की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब दिला गेला पाहिजे,मग सांगा हे आंबेडकरवादी कसे.? स्वत:च्या सत्तेतील तुकड्यासाठी प्रस्थापितांची गुलामी पत्करणा-या या लाचार लोकांनीच आंबेडकरवादी राजकारण पराभूत केले हे नव्याने सांगण्याची गरज आहे का..?जर सत्तर वर्षांनंतर आंबेडकरवादी राजकारण यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर मग लाचारांच वा लाचारांना जन्माला घालणारांचा कडाडून विरोध केला गेला पाहिजे,लाचार वृत्तीचा पदोपदी धिक्कार केला गेलाच पाहिजे…!!सत्तेसाठी तडजोड करुन बेगडी आंबेडकरवादी मंडळीने स्वत:साठी पदे मिळविलीतं मात्र याच लाचार तडजोडीने आज संवैधानिक व्यवस्थाच धोक्यात आणली आहे, संविधान संपविले जाते आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल..!!

हा लेखनप्रपंच यासाठी की, गेली दोन तीन दिवसांपासून वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते एकांगी वागतात किंवा कुणालाही लाचार, गुलाम म्हणून हिनवितात अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर दिसल्या त्या संदर्भाने लिहिले आहे…!आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांची बाजू घेऊन वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याऐवजी हा गायक आनंद शिंदे समाजहितासाठी काय करणार आहे हे तरी सांगा मग त्याला आंबेडकरवादी ठरवा…!!आनंद शिंदे गायक आहे म्हणून त्याला आमदारकी त्याच्या कर्तृत्वामुळे मिळाली असा कुणी युक्तिवाद करीत असेल तर मग कृष्णा शिंदे आणि तशाच अनेक गायक वा लेखक आणि विचारवंतांना या अगोदर आमदारकी का दिली नाही…??याचे समर्पक ऊत्तर द्या…!!

जेव्हा जेव्हा आंबेडकरवादी राजकारण यशस्वी होण्यासाठी सक्षम व्हायला लागलं तेव्हा तेव्हा इथल्या पाताळयंत्री मनुवादी राजकीय नेतृत्वाने “लाचारांची” नवी फौज निर्माण करुन आंबेडकरवादी भाबळ्या, अशिक्षित, आणि भावनाप्रधान समाज बांधवांना संभ्रमीत करण्याचें षढयंत्रकारी राजकारण केले आहे…!!सत्तर वर्षापुर्वीची जनावरांची अवस्था समाजाला परत मिळू नये म्हणून वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमकपणे व्यक्त होतं असतील तर मला वाटते कुठल्याही सच्चा आंबेडकरवादी माणसाला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही…!!

वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते ऐतिहासिक कार्य करीत आहेत असा सकारात्मक विचार का केला जातं नाही..??
प्रस्थापितांच्या मिडियाने पेरलेला विचारच तुम्ही का बोलता…??
आंबेडकरी समुहाच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधण्याची तयारी करणारे नेतृत्व जर कुणाला प्रभावी आणि दमदार वाटतं असेल तर मग तुमच्या वैचारिकतेची कीव कराविशी वाटते…!!वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते हे एकांडे वा टोकाची भूमिका घेतात असे कुणाला वाटत असेल तर तो तुमचा समज तपासून घ्यावा…!!वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते जात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन कोणाच्याही अन्याया विरुद्ध रस्त्यावरची लढाई लढतो आहे, पारधी समाजातील तरुणांचा खुन असो की, ओबीसीं महिलेची नग्नधिंड असो की,मांतगांच्या मुलांची नग्नधींड असो…!!

वंचित बहूजन आघाडीचा कार्यकर्ता धर्माच्या भिंती ओलांडून मंदिर तथा मस्जिद आणि गुरुद्वारा तथा जैन मंदिर उघडण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतो आहे…!!
लाचारांना चारित्र्य नसतेच मग त्यांचे चारित्र्यहनन होण्याचा प्रश्नच ऊद्भवतं नाही…!!लाचारांचे समर्थन का आणि कशासाठी करावे याचेही समर्पक आणि तात्विक ऊत्तर दिले पाहिजे,नुसते हवेतील बुडबुडे उडवून समाजहित साधता येतं नाही हेही तितकेच खरे…!!कुणालाही खिजविण्याचा मुळीच उद्देश नाही मात्र समाजात लाचारांची वकीली करणारा वर्ग निर्माण होऊ नये या भावनेपोटी हा लेखनप्रपंच केला आहे…!!
जयभीम.

✒️लेखक:-भास्कर भोजने
( राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत,जेष्ठ मार्गदर्शक ,अकोला)
मो-9960241375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो-8080942185