परराज्यातील निकृष्ट धान अनाधिकृतरित्या जिल्ह्यात विक्री केल्यास गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:- 8888628986

चंद्रपूर(दि.11डिसेंबर):- परराज्यातील कमी प्रतिचे धान चंद्रपूर व गडचिरोली भागात विक्रीस येत आहे. हे धान स्थानिक व्यापारी किंवा शेतकऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यातील खरेदीविक्री संघाकडे खपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी पालकमंत्री यांनी मॅराथॉन बैठकी घेतल्या. यात धान व कापूस खरेदी, चांदा ते बांदा योजना, महसुली उत्पन्न वाढविणे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम, सिंचन, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण, तसेच वन विभागाशी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी पालकमंत्री बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रविण कुमार, नियोजन अधिकारी गजानन वायाळ, सार्वजनिक बांधकामच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हमी भावापेक्षा 700 रुपये अधिक बोनस जाहीर केला असल्याने परराज्यातील निकृष्ट धान आपल्या जिल्ह्यात विक्री करून शासनाची फसवणूक करण्यात येत आहे. याला आळा घालण्यासाठी अशा परराज्यातून धान विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून एका बारदाण्यामध्ये 40 किलो धान अधिक बारदाण्याचे वजन एवढेच धान घेण्यात यावे, यापेक्षा जास्त धान घेतल्यास संबंधीत खरेदी केंद्रावरही कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

चांदा ते बांदा योजनेचा आढावा घेतांना पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून गैरप्रकार झाल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने त्रीसदस्यीय समितीमार्फत संबंधीतांची चौकशी करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी बैठकीत दिले.तसेच जिल्ह्यात अवैध गौण खणीज चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व पोलीस यंत्रणेला दिले.बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.