बाबासाहेब….!: मानवी मनावर उजेडाची लेणी खोदणारी महाकविता

    65

    ✒️लेखक:-संदीप गायकवाड(मो:-९६३७३५७४००)

    कवी यशवंत मनोहर यांचा बाबासाहेब..!हा दहावा कवितासंग्रह असून बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रगल्भ जाणीवांचा महाऊर्जावान सम्यक तेजःपुंजआहे.अंधकारमय वाटेला लागलेल्या भारतीय समाजाला नवा ऊर्जायान देणारा अखंड सूर्यमान आहे.हा कवितासंग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालीने दिनांक-१४/०४/२०१६ ला प्रकाशित केला आहे.हा कवितासंग्रह लाडक्या लेकराप्रमाणे संपूर्ण विश्वालाच उराशी कवटाळणाऱ्या तुमच्या आर्तस्वी महाप्रज्ञेला .. समर्पित केला आहे.बाबासाहेब ज्ञानाची असीम भूक निर्माण करणारा विचारगर्भ आहे.याची जाणीव हा कवितासंग्रह प्रत्येक वाचकाला करून देत आहे.

    कवीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर , ‘आंबेडकर:एक चिंतनकाव्य’ व ‘काव्य भीमायन’ हे दोन कवितासंग्रह यापूर्वी प्रकाशित केले असून या कवितासंग्रहात बाबासाहेबांच्या ज्ञानसू्र्य प्रतिभेचे अभुतपूर्व दिर्घ चिंतनकाव्य केले आहे. बाबासाहेब ..!हा कवितासंग्रह सलग खंडकाव्य आहे. बाबासाहेबांच्या जीवनात थांबणे नसल्याने कवीची कविता थांबत नाही.स्वल्पविरामाचा थोडा विसावा घेऊन नव्या क्रांतीकारी महास्वप्नाची नवी उमेद घेऊन जगाला माणुसकीची शिकवण देत आहे.कवीने शब्दांच्या शस्त्रांचा अचूक वापर केला असून भारतीय लोकशाहीला मजबूत करण्याचे काम केले आहे.
    आंबेडकरवादी मराठी कवितेत अतिशय कसदार असे काव्यजागर होत आहेत.पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहणारे कवी व लेखक फार कमी आहेत.काहीने समरसतावादी मंच,राजकिय मंच , सनातनी मंच, धार्मिक मंच यावर जावून बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो प्रयत्न पूर्णता फसला .ते बाबासाहेब सांगता सांगता केव्हा हॉफ पँन्टवर आले हे कळलेच नाही.म्हणून अशा भाडोत्री ,अवैचारिक कवीने व लेखकाने आज स्वः निरिक्षण करावे तेव्हाचं बाबासाहेबच्या विचाराशी आपले नाते सांगावे.

    पण यशवंत मनोहर या बनावटाच्या तालमीत सामील झाले नाही म्हणून ते खरे भीमसैनिक आहेत.त्यांनी आंबेडकरवादी साहित्यातील गढूळ होणाऱ्या प्रवाहाला थोपवून धरुन प्रज्ञावान वैैज्ञानिक समाजक्रांतीचा नवा माणूस निर्माण करण्याचा चंग अतूलनिय आहे.कोणत्याही भावनिक चक्रव्युहात न अडकता विषमतवादी व्यवस्थेवर विद्रोहाचा अग्नीप्रहार करतात.ज्या व्यवस्थेने प्रश्न निर्माण केले त्या व्यवस्थेवर प्रश्नांचा भडीमार करतात.त्याची कविता मानवी स्वातंत्र्याचे महायुध्द् लढणाऱ्या सैनिकांना लढण्याची अणुऊर्जा देतात.प्रस्थापित साहित्यावर शब्दाच्या क्षेपणास्त्राने अमानवीय शब्दांना छिन्नविछिन्न करतात.आंबेडकरवादी कवितेची मांडणी करतात ते म्हणतात की,

    “आंबेडकरवादी कवितेच्या डोक्यावरील जबाबदारीचं गाठोडं
    मोठं आहे.आंबेडकरवादी कवितेच्या आस्थापरिघातून भटके, विमुक्त ,आदिवासी , ओबीसी,मुस्लिम,खिश्चन ,स्त्रीया अशा कोणाचेही शोषण वजा होत नाही.तत्वतः या सर्वच वंचितांच्या यातनांचा आणि विद्रोहाचा समूहघोष आंबेडकरवादी कवितेतून होतो.”ही चिंतनशीलता या कवितासंग्रहात प्रस्फुटित केली आहे.माणसाने माणसाचे गाणे गावे माणसासाठी ही विश्वबंधुत्वाची समाजसापेक्ष भूमिका कवीची आहे.ते आपल्या मनोगतात म्हणतात की,”बाबासाहेब एक महान सिस्टम बिल्डर ठरतात . त्याच्या संपूर्ण साहित्यात मला संपूर्ण विश्वसमाजाची नवरचना करणारा हा महाप्रकल्पच दिसतो .ही बाबासाहेबांची महानता या कवितेत बांधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे . बाबासाहेबांचा हा महाप्रकल्प संपूर्णच दुनियेचा सर्जनशील ,साहचर्यशील आणि विज्ञाननिष्ठ जीवनाचा महाप्रकल्प आहे.” बाबासाहेबांना एका सुत्रात बांधण्याचा कवीचा प्रयत्न अत्यंत धाडसीचा आहे.अजोड आहे.महापरिर्वतनशील आहे.त्यामुळे मी त्याचे सहहृदयपूर्वक अभिनंदन करतो.

    सातत्याने बाबासाहेब मेंदूत ठेवून रक्ताच्या धमणीधमणीतून बाबासाहेबांची क्रांती प्रस्वहन होत आहे त्याच्या मर्मबंधातून माणुसकीचा ग्लोबल क्रांतीसि्ध्दात मांडण्याचा अनोखा व अद्वितीय प्रयत्न कवीने केला आहे.अक्रम पठाण सर आपल्या समीक्षेत म्हणतात की,”कवी यशवंत मनोहर यांचे प्राणतत्व हे आंबेडकरवाद हेच आहे.त्यांनीच आंबेडकरवाद या संकल्पनेची प्रस्थापना मराठी साहित्य विश्वात केली आहे.मराठी काव्यात आजपर्यत बाबासाहेबांवरील इतके गंभीर चिंतन कोणी मांडले नाही.यशवंत मनोहरांचे हे चिंतन आस्वादकांना आतून आणि बाहेरून नवीकरणक्षम स्त्रोत देणारे आहे.कवीने बाबासाहेबांच्या विचाराचे सर्जनशील विवेचन समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय पध्दतीने मांडले आहे.”ही वास्तविकता या कवितेचा प्राण आहे.
    कवी यशवंत मनोहर हे एक प्रतिभावंत काव्यकार असून त्याची समाजमूल्यावरची जाणीव कमी न होता ती पुन्हा प्रखर होत आहे. सातत्याने आंबेडकरवादी साहित्याला कसदार असे सेंद्रियतत्व देत आहेत.

    आज आंबेडकरवादी समाजाची दिशा कुठे तरी भरकट असतांना दिसते तरी कवी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे असून कवितेच्या पँसिफिकमधून नव्या जगाला नवा आंबेडकरी विचार देत आहेत.म्हणून सुरेश द्वादशीवार म्हणतात की,”नेते भरकटोत ,पुढारी दिशाहीन होवोत.नाहीतर प्रतिभावंत आत्मग्लानीत जावोत . आंबेडकरी जनता मात्र आपली निष्ठा बावनकशी राखणार आहे तो आशेचा व विश्वाचा भाग मानुन विधायक वृत्तीच्या कार्यकर्त्यानी पुढे होण्याची आज गरज आहे.ज्या कार्यकर्त्या प्रतिभावंतकडून ही अपेक्षा बाळगायची त्या मध्ये यशवंत मनोहर हे महत्वाचे नाव आहे.”हे मत सार्थ आहे असे वाटते.बाबासाहेब..!या कवितासंग्रहात एकशे वीस पृष्ठ असून एकशे अकरा पृष्ठ बाबासाहेबांच्या जीवनाच्या विचाराची वैश्विकता अधोरेखित करणाऱ्या कवितांनी युक्त आहेत.बाबासाहेबांवर नव्यान्नव स्वतंत्र्य कविता लिहलेल्या असून या कवितेतून बाबासाहेबांना सूर्यशब्दात प्रतिबिंबित केले आहे.आंबेडकर हा शब्द पृथ्वीच्या पाठीवर सर्वात जास्त वेळा उच्चारणारा महान शब्द आहे.शोषणविहिन मानवी जीवनाच्या निर्मितीसाठी आता जयभीम हा पासर्वड झालेला आहे.

    आणि मानवी हक्कासाठी संग्राम दीक्षा देत तो दुनियेत दुमदुमत आहे.हा ज्वाजल्यपूर्ण अभिव्यक्तीचा आविष्कार मलपृष्ठावर अधोरेखित केला असून समतामूलक समाज निर्मितीचा नवा आयाम वाटतो.चवदा एप्रिल सर्व जगासाठी असीम सौंदर्याचा व उत्साहाचा महापर्व कारण याच दिवसी क्रांतीसूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकराचा जन्म झाला म्हणून हा दिवस आमच्या जगण्याचा मूलाधार आहे.म्हणून आम्ही रोजच तुमचा जन्मदिन साजरा करतो.अभ्यासातून , आंदोलनातून व विद्रोहातून अन्यायावर तुटून पडतो . लोकशाहीच्या संरक्षणार्थ मानवमुक्तीच्या रणांगणावर.कवी बाबासाहेब..!या कवितेत म्हणतात की,

    तुम्ही तर जन्मता प्रत्येकच क्षणी
    नवनव्या प्रश्नांचे विश्लेषण
    करणारी आमच्या डोक्यातील
    प्राचीन होऊन
    आणि आमच्या अस्तित्वाच्या
    रणांगणावर युध्द होऊन
    निर्णायक.
    पृ क्र १

    अतिशय मूल्यनिरपेक्ष अशी प्रतिमायुक्त कविता कवीच्या भाव विश्वाचे पदर उलघडून दाखवते.बाबसाहेबांच्या क्रांतीची केमिस्ट्रीतून मुसोलिन इतिहासाला आम्ही मोडले असा सार्थ अभिमान वाटतो.आम्हाला जाळणाऱ्या तत्वज्ञानालाच व साहित्याला भस्म करून जळणाऱ्या राखेतून नवे फिनिक्स झालो . बाबासाहेब तुम्ही होता म्हणूनच आम्ही माणसे झालोत आणि जग पाहू शकलो ते पुढे लिहितात की,

    आम्ही संकटांचा कचरा पेटवला
    आम्ही उद्धवस्त केले विषमतेचे
    भुसारी मार्ग
    तुम्ही डायरेक्टर आमच्या प्रतिभाचे
    तुम्ही प्रोड्युसर आमच्या प्रज्ञांचे
    आमच्या उड्डाणांना पंख तुम्ही स्वप्नांचे
    तुम्ही आमच्या आणि जगातल्या सर्वाच्याच
    माणुसकीचा ग्लोबल क्रांतीसि्ध्दात.
    पृ क्र २

    कवीला मानवाच्या महानतेचे गीत गातांना जी क्रांती करायची आहे ती रक्तपाताशिवाय अशी हवी.युध्दाने/बळजबरीने क्रांती यशस्वी होत नाही.बाबासाहेब हे अज्ञानी धर्मग्रंथाची कुटील कारस्थानांना वेशीवर टांगवतात.फँसिस्टॉना उघडे पाडतात.अंधश्रध्देला उद्धवस्त करुन आम्हाला सामाजिक न्यायाचे पध्दतीशास्त्र दिलं म्हणून तुम्हीच आमचे खरे विश्व विद्यापीठ आहात . तुम्ही स्वाभीमानाचा बूलंद गगन असून गरीबाीचा पोलादी कणा आहात.त्याच्या घामात जयभीम तर इमानदार कामात आंबेडकर होता म्हणून सारे विषमतवादी हादरून गेले.तुमच्या महाबारूद भरलेल्या शब्दांने त्यांचे अवडंबर माजवणाऱ्या ग्रंथाच्या पानातील बनवाबनवीचा आलेख मांडला म्हणून मुजोर करणाऱ्या वृत्ती गडप झाल्या होत्या. पण आज त्या पुन्हा डोके वर काढत आहेत त्याचा मार्ग अतिरेकी आहे.यामुळे कवीला दुःख वाटते . आपल्या शब्दाना वाट मोकळी करून देतांना ते म्हणतात की,

    पण उलटे घडले बापा
    लोकांनी मध्यममार्गाला मद्यममार्ग
    बनविले.
    आता लोकांना चढला आहे,
    स्वयंक्रेंद्रिततेची विनाशक झिंग.
    चढली आहे नशा सर्वनाशाची.
    पृ क्र ७
    बाबासाहेबांनी सांगितलेला सम्यक बुध्द् मध्यम मार्ग विसरून विनाशक नशेल्या विचाराच्या कालचक्रात फसून तृष्णादास झाली आहे.स्वतःची आयडेंटिटी गमावून उकिरडे बनले आहेत.स्वतःच्या समाजाला तोडून व्यभिचार वृत्तीने वागत आहेत.माणसे उद्धवस्त होणे पत्करतात पण एकजीव होत नाही.तुमचे बोट पकडून कुठेही जात आहेत.अनीतीशास्त्राच्या आधारानं दिशाहीन भरकटलेले आहेत.लोक निष्क्रियतेच्या कोमात जात आहेत.तुमच्या निखाऱ्यांच्या अन्नावर वाढलेले माणसे अशी राखेसारखी वागताहेत हे भयावह आहे.पण तुमची जन्मदिन म्हणजे आमच्या जगण्याचे जालीम औषध . क्रांतीसाठी उठाव करण्याचा दिवस त्यातूनच अस्सल भारतीय माणूस घडेल असा आशावाद मांडतात कवी म्हणतो की,

    जबाबदारीच्या जाहीरनाम्यातील
    कोलंबसशब्द होण्याचा दिवस.
    ……………….
    तुमच्या बोटापुढील
    अस्सल माणूस होऊन दाखविण्याचा दिवस.
    ……………….
    बाबासाहेब..!
    सक्रिय आणि धगधगती वर्तनशैली म्हणजे तुमची जयंती.
    ……………….
    तुम्ही प्रश्न नाकारणाऱ्या युगाचे महानायक.
    …………….
    विकृत डोक्यांनी निर्माण केलेले
    माणसाला अधःपतित करणारे सर्व प्रश्न
    तुम्ही एका रांगेत उभे करून उडवून दिले.
    पृ क्र११

    या कवितेतून बदलणाऱ्या जीवनाचा भावार्थ व्यक्त केला असून आंबेडकरी क्रांतीची क्रियाशीलता अधोरेखित केली आहे.बाबासाहेब तुम्ही भूतकाळ ,वर्तमानकाळ,व भविष्यकाळ चा वेध घेऊन नव्या जीवनाचा संविधानसूर्य दाखविला आम्हाला कधी प्रश्न विचारण्याची परवानगी नव्हती पण तुमच्या ज्ञानक्रांतीच्या अभ्यासाने आम्ही ती मिळविली म्हणून कवी म्हणतात की,

    आता आम्ही जीवनाला प्रश्न विचारतो
    आम्ही उजेडाला प्रश्न विचारतो
    पहाटेला प्रश्न विचारतो
    आम्ही भांडवली जागतिकीकरणाला
    आणि उदारीकरणारा सरळ प्रश्न विचारतो
    गोंधळून न जाता विचारतो.
    …………………
    माणसांच्या मनातील ठिणग्या मरू द्यायच्या नसतात
    जिद्दीचे दिवे विझू द्यायचे नसतात.
    पृ क्र १६

    जीवनाच्या कठीण काळातही मनातील पेटलेल्या क्रांतीला विझू द्यायचे नाही तर त्याला नव्या अग्नीजाणिवांच्या तेजःपुंजने अविरत धगधगत ठेवायचे आहे.कारण विषमतेच्या महाबंडलबाज कुविचारी गुप्त डावपेच आखत आहेत.त्यामुळे आपण सदोदीत सतर्क असायला हवे म्हणून कवी निखाऱ्यांच्या पोटी जन्म घेतो आणि आपल्या शब्दातून बाबासाहेबांची महाऊर्जा प्रज्वलीत करताना म्हणतो की,

    मी लेक तुमच्या गर्जनांचा
    मी पुढे तुमच्या सर्जनांचा
    तुमच्या उजेडावर अंधार पसरणाऱ्या हातांनामी सूर्य शिकवतो
    अनिवार्य विषय म्हणून.
    पृ क्र १८

    कवी बाबासाहेबा सोबत संवाद साधत असून त्यांच्या कार्यचे परिक्षण करून शब्दाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनतत्वज्ञानाचे भव्यचित्र रेखांखित करत आहेत.कोणताही अक्राडविक्राड शब्दांचा साज न सजवता कवीला शब्दांचा खजिना बाबासाहेबांच्या महाग्रंथयानातून सापडला आहे.बाबासाहेब एकमेव असे प्रज्ञावान आहेत की साऱ्या शास्त्राची प्रज्ञा त्यांच्या मेंदूत साठवली होती.प्रज्ञेच्या बळावर जगाला आपल्याकडे वळविले होते.जगण्याचे सारे संदर्भच बदलवून टाकले होते.सामान्य माणसाला नवा माणूस निर्माण करणारा महाऊर्जावान प्रकाशमान तेजःपुंज बनले होते.म्हणून कविने मानवी काळजावर उजेडाची लेणी खोदणी महाकविता लिहली आहे.पण ते भीम जयंतीच्या निमित्याने होणाऱ्या नाचगाण्याच्या व ढोलताशाच्या कार्यक्रमावर ते तुटून पडतांना ते म्हणतात की,

    तुमच्या प्रज्ञानाचा बोधिवृक्षअखंड
    सळाळत ठेवणारा तुमचा वाढ दिवस
    नाचगाण्यांच्या नव्हे,
    ढोलताशांच्या नव्हे,
    डीजेचा आणि रंजनाचा नव्हे.
    तुमची जयंती
    स्वतःला बुध्दिवादाच्या आगीतून फिरवून आणण्याची
    स्वतःचे रूपांतर करुणेच्या चांदण्यात करण्याची
    तुमच्या तर्काने काळजी तपासून घेण्याची
    रक्तात तुमच्या किरणांनी शर्यत लावण्याची
    तुमच्या अश्रृंचे अध्ययनास करण्याची
    तुमच्या पंखांनी पालथे घातले नभ मोजण्याची
    तुम्ही पेटवलेल्या संघर्षाच्या ज्वाला उरात घेण्याची
    डोक्याला तुमच्या ज्ञानमीमांसेची
    राजधानी करण्याची.
    ……………….
    नवी दुनिया निर्माण करणाऱ्या तुमच्या वैश्विक अभियंतेपणाची
    मुक्त विश्ववास्तूच्या जाहीरनाम्याची.
    पृ क्र २३

    कवी हे आपल्या कवितेतून इतिहासातील विकृत व्यवस्थेवर आसूड ओढतात.तसेच इतिहासातील व्यक्तीरेखांवर जबरदस्त प्रहार करतात.आमचा इतिहास आम्ही लिहिला असता तर आज आम्ही दिशादर्शक झालो असतो.बुध्दाचा धम्म नालंदा व तक्षशिला विद्यापीठाच्या ज्ञानसागराने सारे जग थक्क झाले होते.पण आमचे अधिकार नष्ट करणाऱ्या मनुव्यवस्थेने आम्हाला गुलाम केले.त्या गुलामीला डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी जाळून टाकले व उद्धवस्त नवी माणसे निर्माण केली .नवी प्रज्ञानी वैश्विक प्रयोगशाळा दिली.या प्रयोगशाळेतील नवा माणूस जगाला नवे मूल्यपरिमल देत आहे.आमच्या अखंड खांडववनाला तुम्ही अखंड संग्रामवन केले . म्हणून कवी म्हणतो की,

    नरकातून उपसून आणले वर्तमानात,
    आमच्याजवळ काहीही नव्हते,
    बाबासाहेब आमच्या रक्तात फक्त
    तुमचे प्रमाणशास्त्र होते
    आमच्या काळजात तुमचे काळीज होते
    आमच्या मेंदूंमध्ये तुमच्या मेंदूचे निर्णायक निरोप होते.
    पृ क्र २७

    संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी वैश्विक मानवी स्वातंत्र्याची कलमे कोरली आहेत . आमच्या वर्तमानाच्या कँनव्हासवर सुगंधाचे अनोखे चित्र काढून नवा माणूस घडविला आहे.जोतीराव फुले यांनी सत्य हाच जीवनाचा मूलगामी प्रबंध असून सत्यापासून कुणी वाचू शकत नाही.सत्य हे सर्वश्रेष्ट मूल्य आहे.कवीने सत्यशीलतेच्या विचारातून बाबासाहेबांना रेखाटले आहे.ते म्हणतात की,

    अंतिम विजयाचे धनी असते फक्त सत्य .
    दुष्टपणा जिंकेल खूपदा
    पण अंतिम विजय सज्जनत्वाचाच होतो.
    पृ क्र २८

    अंतिम विजयासाठी सर्वांनी सत्य वचनाने चालले पाहिजे.कारण आम्ही बाबासाहेबांच्या क्रांतीविद्यापीठात नवऊर्जावान ज्ञान आत्मसाद केले आहे. म्हणून कवी म्हणतो की,

    तुमच्या शब्दांमधून
    अामच्या डोक्यात शिरले अर्थाचे सूर्य
    आणि सत्तासंबंधातील अंधार झाला स्पष्ट.
    पृ क्र २९

    आज आम्ही ज्ञानाच्या बळावर आमचे नवे विश्व निर्माण केले पण फँसिस्टवृत्तीने समाजात चंगळशाही विषमतावाद निर्माण करून अभिजनाचा चक्रव्युह तयार करून साऱ्या बहुजनांना निखाऱ्यांवर आणून सोडले आहे.शिक्षणाच्या बाजारीकरणाने
    आमचा तरूण सैनिक होत होता तो अभ्यासक्रमच बदलला .आमची एक एक पिढी आज गारद होत असतांना बाबासाहेब आम्ही तुमचा संदेश घराघरापर्यंत पोहचवणार आहोत.तुमची जयंती म्हणजे फँसिझमच्या कौर्यावर कोसळणारा धबधबा आहे म्हणून कवी म्हणतो की,

    वाघासारखे जगण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस
    युध्दनीती ठरविण्याची संगीती
    सूर्यावर बसलेली धुळमाती झटकण्याचा दिवस
    स्वतःला छिलून ,पिजून काढण्याचा दिवस
    मुर्दाडपणा विसर्जित करण्याचा दिवस
    क्रांतीचा वाढदिवस.
    पृ क्र ३४

    अत्यंत स्पष्ट संदेश देणारी ही कविता आंबेडकरी क्रांतीचे निखारे प्रज्वलीत करीत आहे.बाबासाहेबाच्या ज्ञानसू्र्य तेजाने कवी अंगार झालेले आहेत. ते लिहितात की,

    तुमच्या शब्दांचे अंगारपाणी पिऊन
    आणि तुमच्याच शब्दातील विचारांचा ज्वालामुखी खाऊन
    मी धडपडतो आहे तुम्हाला अभिप्रेत क्रांतीविधान निर्मिण्यासाठी
    तुमचे प्रमाणशास्त्र गदगदून येईल
    असा शब्द होण्यासाठी.
    …………………..
    होतो तुमच्या स्वप्नांचे एक स्पंदन
    हे स्वप्न पाहण्याचे बळ दिले
    तुमच्या प्रमाणशास्त्राने..
    पृ क्र ३९

    या कवितासंग्रहातील बाबासाहेब ही अखंड कविता असून विविध शब्दाच्या माध्यमातून कविने बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा आलेख रेखाटला आहे.कवीला अभिप्रेत असलेली क्रांती करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही.म्हणून ज्ञानसाधनेतचे सारे बँरेकट्स उध्दवस्त करून धार्मिकतेच्या साऱ्या बंधणांना झूगारून नव्या ज्ञानऊर्जेची ज्वाला घेऊन साऱ्या दुनियेला परिवर्तनाचा सम्यक विचार दिला .यावर भाष्य करताना कवी म्हणतो की,

    तुमचे ज्ञानरचनेचे ऑलिम्पिक
    वेगळेच होते .
    विचारांचे महायुध्द् तुम्ही
    परदेशातील विश्वविख्यात बुध्दिदांडग्या मल्लांसोबत सुरू केले.
    आणि दुनियेतील अश्रूंचे महासागर
    तुम्ही अभ्यासले.
    पृ क्र ४६

    जगातील साऱ्याच ज्ञानशाखेचा अभ्यास बाबासाहेबांनी केल्याने नवा ज्ञानमिमांसाक प्रमेय मांडला.कवीला अनेक यातना भोगाव्या लागल्या पण बाबासाहेबांनी ज्या यातना सोशल्या त्या अगणित होत्या तरी बाबासाहेब विचलित झाले नाही.स्वतःचा योग्य मार्ग त्यांनी सोडला नाही.साऱ्या दुःखीतांचा इतिहास बदलवून सुखाचा नवा इतिहास त्यांच्या हातात दिला . म्हणून कवी उगवतो इहवादी तत्वज्ञानाच्या अन्नपाण्यातून त्यावरच त्यांची अढळ निष्ठा आहे.नव्या क्षितीजाच्या शोधात आपले नवे विश्व निर्माण करण्याची उर्मी कवीत ओतपोत भरली आहे , म्हणून ते म्हणतात की,

    राजकारण : माणसाला अधिनायक करणारे विज्ञाननिष्ठ.
    तुम्हाला द्यायचे होते नीतीला समाजवादाची चारित्र्य आणि
    सत्याला सौंदर्याची नीती .
    मानवतेच्या काळजावर
    तुम्हाला लिहायचे होते
    अत्तदीप माणसाच्या विजयाचे संविधान.
    पृ क्र ४८

    आज भारतात अंधभक्ताची फौज
    निर्माण झाली असून अन्याय करण्यासाठी तत्पर असणारी ही मुर्ख फौज फँसिस्टवृत्तीची नशा पिऊन माणसाला माणसातून उठवू पाहत आहे.देशात होणाऱ्या अन्याय -अत्याचारांविषयी कवी चिंतेत आहे.त्यांना भारतीय संविधानातील समानसुत्रांनी साऱ्याना वागवावे .सारे भेद गाडून टाकावे असे वाटते .पण समाज सुधरायला तयार नाही.राजकिय नेत्यांनी अंधभक्ताना अशी अफू दिली आहे की सारे अंधाधुंद होऊन वागतात .यासाठी कवी संदेश देतांना म्हणतो की,

    आंधळे भक्त होऊ नका .
    चिकित्सेलाच माना श्वास .माना जगणे.
    प्रत्येक श्वास
    प्रत्येक शब्द
    आणि तुमचे प्रत्येक वाटणे
    आगीत बुचकळून काढा.
    …………….
    घ्या तपासून प्रेमाचे चारित्र्य
    परीक्षणनलिकेत टाका एकेका बदलाचे द्रावण
    प्रयोगशाळेला देऊ नका झोपू
    आपल्या विवेकाच्या …
    …………………..

    तुम्ही आम्हाला पहाडाच्या काळजाने जगायला शिकविले.
    सूर्य डोक्यात घेऊन वागायला शिकविले.
    पृ क्र ९१

    पण आज सूर्य डोक्यात घेऊन न चालता मनू डोक्यात घेतल्याने सारा भारत विविध समस्येने ग्रासले आहे.विकासाच्या नावावर खोट्याचा महाविकास घडून येत असून सामान्य नागरिकांचे जीवन मातीमोल होत आहे.तरी आमची वैचारिकता बदलत नाही.संविधाननिष्ठ समाज तयार होत नाही.आपली लोकशाही त्यांना हिरोशिमा -नागासाकी सारखी करायचे आाहे.सेक्युलँरिझमला धर्माधतेचा सोमसर पाजायचा आहे . त्यासाठी भारतीय नागरिकांनी सतत सतर्क राहायला हवे.त्यांच्या साऱ्या फसव्या षडयंत्राला ओळखून क्रांतीची तलवार व्हायचे आहे.त्यासाठी कवी म्हणतो की,

    बाबासाहेब..!
    तुम्ही गरिबांच्या आयुष्यात समता चेतवणारा युध्दशब्द.
    गरिबांच्या विजयासाठी
    रणांगणावरील आकांतशब्द तुम्ही.
    मी या शब्दांमधला ऐकतो निर्णायक संग्राम
    आणि तुमच्या शब्दातील दारूगोळा
    वस्त्यांमध्ये वाटते माझी कविता.
    माझ्या शब्दाच्या हातात,
    माझ्या अक्षरांच्या डोळ्यात,
    माझ्या कवितेच्या उद्रेकात
    लखलखत्या तलवारी आहेत क्रांतीच्या.
    पृ क्र ९७

    अत्यंत क्रांतीदर्शी ही रचना आशयाच्या नव्या सृजनोत्सवाची मशाल आहे.या देशामध्ये धर्मांध शक्तीने असत्य मृगजळाचे बांधकाम करायला सुरूवात केली असून मूलतत्ववादाच्या गणवेषातून उदात्तीकरणाच्या शोषणातून चंगळवादातून विकृतीतून स्वतःची असहिष्णूता पेरण्याचे काम करत आहेत.आपण बाबासाहेब या एकाच विचारांने त्यांना पराभूत करू शकतो.कारण कवीची कविता बाबासाहेब झाली आहे.अथांगाशी बोलता बोलता ज्वालांचे ढग बनून सूर्याचे पंख बनली आहे. बाबासाहेब ,ही कणभर कृतार्थताही माझ्यासाठी अंतराळाएवढी झाली आहे.बाबसाहेब तुमच्या सामाजिक,आर्थिक,राजकिय,शैक्षणिक , संविधानीक क्रांतीने सारी दुनिया अचबीत झाली आहे.तुम्ही आम्हाला सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ला सोडून गेलात पण नवा प्रबोधन प्रकल्प देऊन आमच्या जीवनाचा विश्वसूर्य होऊन .पण तुमचा मृत्यू मला मान्य नाही . तुम्ही शरीराने गेले असले तरी तुमच्या क्रांतीशब्दाने आम्हाला नवे रक्त दिले आहे.म्हणून कवी म्हणतो की
    ,
    सहा डिसेंबरला दुनियेनं प्रथमच
    कोट्यावधी सूर्यानी पिसारलेलं क्षितिज पाहिलं,
    पाहिला सहा डिसेंबरच्या माथ्यावर उमललेला
    क्रांतीच्या जन्मदिवसाच्या अजिंठा,
    पाहिला तुमच्या मृत्यूचा मृत्यूदिवस
    आणि साऱ्या दुनियेनंही आता
    तुमचा मृत्यू अमान्यच केला आहे.
    पृ क्र १११

    बाबासाहेब..!या कवितासंग्रहातील भीम,अजिंक्य संगर , नव्या युगाचे युध्दगीत,तू दिसतेस मला, माता रमाई,तू अखंड जळती वात या कविता उत्कृष्ट धाटणीच्या आहेत . करूणेची कविता यामध्ये कवी लिहितात की,

    सूर्यासोबत संसार तुझा चांदणे झालीस आगीतही
    सुगंधाचे तारांगण तुझ्या मारून गेले मरणासही..
    पृ क्र ११७

    ही कविता रमाईच्या कार्यकर्तृत्वाचा आयाम मांडते.तर भीम ही कविता नव्या मानवी जिद्दीची प्रेरणा देते.यामध्ये कवी म्हणतो की,

    भीम युध्द जाहला समान न्यायासाठी
    तो श्वास क्रांतीचे विमुक्त-भटक्यांसाठी
    तो सर्वांसाठी तारांगण समतेचे
    स्त्रीसन्मानाची स्वप्नसंहिता भीम…
    पृ क्र ११२
    कवी यशवंत मनोहरांच्या काव्यशैलीची अभिव्यक्ती उच्चतम असून नव्या शब्दांचे निर्मितीशास्त्र त्यांनी लिलियाने पेललेले आहे.हा कवितासंग्रह प्रतिमायुक्ताने आेतपोत भरला आहे.उरातला ज्वालामुखी,क्रांतीवृक्षाची विद्युतफुले,भ्रमाच्या अंतराळात,शब्दांच्या तारांगणातून,ज्ञानरचनेचे ऑलिम्पिक,अश्रुचे महासागर,संग्रामराग,सिसिफस,एलिनेशन मुक्ततेला,मेंदूची संग्रामसंहिता , प्रमाणशास्त्राच्या ज्वाला,युध्दशब्द,डँबिस दैववाद,प्रबोधन प्रकल्प अशा अनेक प्रतिमाने हा कवितासंग्रह साकार झाला आहे.मराठी साहित्याच्या प्रांतात उच्च व आशयसंपन्न असा कवितासंग्रह मानवीय समाजाला नवे तत्वज्ञान देते.बाबासाहेबांच्या जीवनाचा संघर्ष रेखांखित करतो.हा कवितासंग्रह अत्तदीप माणसाच्या विजयाचे संविधान आहे.हा कवितासंग्रह मानवी काळजावर उजेडाची लेणी खोदणारी महाकविता असून क्रांतीविधान निर्माण करणाऱ्या प्रमाणशास्त्राची महाकविता आहे.ही कविता ऐलिनेशन मुक्तीची असून साऱ्या भारतीय समाजाला न्याय प्रमाणशास्त्राची जाणीव करून देणारी आहे.करीता कवीला पुढील युध्द शब्द काव्यांक आविष्कारासाठी मंगलकामना चिंतितो..!