गुरु-शनीत महायुती : दहा दिवशीय महानाट्य

    47

    ?आकाशातील गंमती-जमती

    दिनांक १६ ते २५ डिसेंबर २०२० हा आहे अवकाशीय महानाट्याचा एक नाही, दोन नाही तर तब्बल दहा दिवसांचा महा कालावधी ! याच महा कालावधीत दोन नटसम्राट गुरु व शनी या ग्रहगोलांची युती-महायुती-युती या क्रमाने बघता येऊन आपल्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहे, हे नक्की ! हे महानाट्य प्रयोग आपण साध्या व सताड उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. कोणतेही निरीक्षणाचे माध्यम, साधन वा साहित्य बाळगण्याची अजिबात गरजच नाही. दि.१६ डिसेंबरपासून तर २१ डिसेंबरपर्यंत दोघातील अंतर कमी कमी होत गेलेले निदर्शनास येईल.

    या महायुतीच्या महानाट्य प्रयोगाचा मध्यांतर दि.२१ डिसेंबर २०२०ला होईल. गुरु व शनी दोन्ही ग्रहगोल एकमेकांच्या एकदम जवळ येणार आहेत. त्या दोघातील अंतर सर्वात कमी म्हणजे ०.१ अंश असणार आहे. ही एक अनोखी खगोलीय घटना निरिक्षण करण्याची अमूल्य संधी खगोलप्रेमी शास्त्रज्ञ, जिज्ञासू, अभ्यासू, विद्यार्थी, शिक्षक आदींकरीता चालून आली आहे. सन १२२६ नंतर तब्बल ८०० वर्षांनी अशी संधी प्राप्त होत आहे. या कालावधी दररोज सूर्यास्तानंतर पश्चिमेला मकर राशीत गुरु व शनी ग्रह एकमेकांच्या जवळ जवळ येतांना दिसतील. या घटनेला खगोलीय मराठी भाषेत ‘महायुती’ तर इंग्रजी भाषेत ‘ग्रेट कन्जेक्शन’ असे म्हणतांत. दि.२२ डिसेंबरनंतर दररोज दोघांतील अंतर वाढत गेल्याचे निरीक्षणातून दिसून येईल.

    गुरुला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करायला ११.८६ वर्ष लागतात. तर शनीच्या एका परिक्रमेला २९.५ वर्ष लागतात. या दरम्यान दर २० वर्षानंतर अशी युती होत असते. या आधी ती सन २००० साली झाली होती. पण त्या वेळेस हे दोन्ही ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने ही खगोलीय घटना बघता येऊ शकली नाही. या वेळेस मात्र ही खगोलीय घटना सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे तास-दीडतास तरी पाहता येईल. दररोज रात्री ८ वा.पूर्वी निरिक्षण करणे आवश्यक राहिल. त्यानंतर हे दोन्ही ग्रहगोल अस्ताला जातील.

    मागील त्या युतीपेक्षा ही अद्भुत असेल. कारण या आधी सन १६२३ मध्येही हे दोन्ही ग्रहगोल अधिक जवळ आले होते, त्याहूनही ते यंदा खुप जवळ आलेले भासतील. म्हणजे सुमारे ४०० वर्षानंतरचीही ही महायुती अर्थात विलोभनीय महानाट्याचे दृश्य आता पहायला मिळणार आहे. या नंतरची दोघांची अशी स्थिती वा युती दि.५ नोव्हेंबर २०४०, १० एप्रिल २०६० व त्यानंतर १५ मार्च २०८० ला दिसेल. परंतु त्या युत्या यंदाच्या या महायुतीच्या तुलनेने कमीच असतील.दि.२१ डिसेंबरला गुरु व शनी इतके जवळ येतील कीं ते सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पौर्णिमेच्या चंद्राचे पाच भाग केले तर जेवढा एकेका भागाचा आकार होईल तेवढ्या जवळ ते आलेले दिसतील. म्हणजे आपल्या हाताची वित असते त्या पेक्षाही कमी अंतरादरम्यान ते दिसणार आहेत.

    या खगोलीय घटनेचा प्राणी वा मानवी जीवनावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. निसर्गाच्या हा नयनरम्य आविष्कार पाहण्याची संधी कोणीही हुकवू नये. आपण सर्वजण ग्रह, उपग्रह, तारे पाहू. त्यांच्याशी गट्टी करु. अशा घटनांच्या आधारावर फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून कासराभर तरी दूरच राहू. चला, तर मग ! या खगोलीय घटनेचा आस्वाद घ्यायचा असेल तर आजपासूनच सूर्यास्तानंतर पश्चिमेला निरिक्षण करायला सुरुवात करुया. म्हणजे २१ डिसेंबरची नयनमनोहर नाट्यछटा साध्या व उघड्या डोळ्यांत सहज साठवून कैद करता येईल. पुढे २५ डिसेंबर २०२०पर्यंत दोघांतील वाढत जाणारे अंतर सूक्ष्म निरीक्षणाने समजून घेणेही सहज सोपे होईल.

    चला तर मग, आजच तयार राहुया त्या आकाशातील चंदेरी दुनियेच्या निरीक्षणाला !

    ✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी
    [ दै.रयतेचा वाली, जिल्हा प्रतिनिधी ]
    मु.पोटेगाव रोड, पॉवर स्टेशनच्या मागे, गडचिरोली.
    ता. जि. गडचिरोली.
    फक्त व्हा.नं. 9423714883.