काव्य भीमायन : नव्या जगाच्या मानवनिर्मितेचे विश्वविद्यापीठ

    28

    ✒️संदीप गायकवाड(मो:-९६३७३५७४००)

    कवी यशवंत मनोहर हे आंबेडकरवादी कवितेच्या सौंदर्य कुलातील जगमान्य कवी आहेत.उत्थानगुंफा,मुर्तिभंजन नंतर त्यांचा डॉ.आंबेडकर : एक चिंतन काव्य हा कवितासंग्रह १९८२ ला प्रकाशित झाला होता . तेव्हा डॉ.बाबासाहेबााच्या महापरिनिर्वानाला पंचवीस वर्ष झाली होती.२००६ हे वर्ष धम्मक्रांतीचे सुवर्ण वर्ष या निमित्याने त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकवितेला जोडून नव्या संदर्भाचा आधार घेत नवीन नावाने “काव्य भीमायन” हा कवितासंग्रह १४ एप्रिल २००७ ला प्रकाशित केला.महाक्रांतीची महाकविता लिहण्याचं त्यांच धाडस अतूलनिय असून प्रगल्भ चिंतनाचे अनेक कंगोऱ्यांचा आशय स्पष्ट करणारा आहे.आंबेडकरांसोबत भावनिक निर्माण झालेल्सा नात्याचे कधी क्रांतीकारी पंखात रूपांतर झाले हे कवीला कळलेच नाही.विषमतेच्या अवकाशात क्रांतिसूर्याच्या ऊर्जास्वलाने नवा माणूसप्रिय भारत घडविण्याचा संकल्प अभिनंदनीय आहे.कवी आपल्या मनोगतात म्हणतात की,” जिथे सूर्य पोहण्याचेही टाळले जाते तिथे सूर्य हातात घेऊन पाहण्याचे धाडस मला अपार ऊर्जा देणारे आणि जिंदगी शिकविणारे आहे असे मला नम्रपणे वाटते.

    “अतिशय शांत व गंभीर शब्दात आपल्या मनाचे भावचित्र वाचकापुढे अधोरेखित करतात. नागनाथ कोत्तापल्ले आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की,”काव्य भीमायन या प्रदीर्घ चिंतनशील काव्याची पूर्वतयारीच होती.या कवितामधूनी त्यांची प्रखर मूल्यात्मक जाणीव ,समाजाचे सूक्ष्म अवलोकन आणि भोवतीच्या समाजाचे वास्तवदर्शन याचा प्रत्यय येतो.तरीही वैचारिक उंची चिंतनाचे विविध पदर आणि चिंतनाला सावरून धरणाऱ्या भाववेगाच्या विविध फिरती यामुळे काव्य भीमायन हे एक अजोड आणि अपूर्व असे काव्य झाले आहे यात शंका नाही.” हे निर्विवादपणे कबूल केले आहे.कवी मनोहराचा भावगर्भ डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या प्रस्वतेने ऊर्जायन झाला आहे.बाबासाहेबांचे सारे जीवनच त्यांनी अभ्यातातून मेंदूत साठवले आहे.ते म्हणतात की,”मी डॉ.बाबासाहेबांना पाहू शकलो नाही तरी त्याच्या ज्ञानक्रांतीने , सूर्यातेजाने मी प्रकाशमान झालो आहे.”सौंदर्यवादी बुध्दिवाद ,क्रांतीकारी संघर्ष,सामान्याचा कनवाळू बुध्दाचा अथांग सागर ,मानव मुक्तीचा विचार ,पेटणारे महाड पाणी,विद्रोहाची महाज्वाला,अंधारावर उजेडाचा महावर्षाव अशा अनेक अंगाने कवीचे जीवन सौंदर्यवान झाले आहे.आंबेडकरी विचाराची अग्नीज्वाला त्यांनी आत्मसाद केली आहे.

    कवी हे कविता करत बसत नाही .कविता कवीला स्वस्थ बसू देत नाही तर कविता त्याच्या समोर चालत येते , हृदयाच्या स्पंदनातून तीचे प्रगटीकरण होते हीच खरी क्रांतीकारी कविता आहे.कवी आपल्या अनुभव निष्ठेतून नव्या आयामाचे क्रांती शिल्प कोरून घेतात.म्हणून म .यु.पाटील हे आपल्या निरिक्षणात म्हणतात की,”मनोहराची कविता ही कविता झाली आहे ती त्यांच्या अपरंपार ,अशांत,धगधगत्या व विद्रोही व्यक्तीमत्वामुळे त्यांच्या शब्दातून एक पेटलेले आगच झालेले ज्वालाग्राही मन सतत वावरतांना दिसते . मनोहरांच्या काव्यातील प्रतिमांच्या घटकात एक प्रकारचा एेलिमेंटल फोर्स असतो .तसेच हा कवी नेहमी समूहासमाेर उभा राहून जणू बोलत असतो त्याच्या वेदना समूहाच्या वेदना असतात.”(पा.न.३१,वेध : एका युगसाक्षी प्रतिभेचा )

    काव्य भीमायन हे एक दिर्घ महा काव्य असून या प्रकारची आंबेडकरी कविता अजूनपर्यत लिहण्यात आली नाही.आंबेडकरांच्या समग्र कार्यकर्तृत्वाचा पट हा कवितासंग्रह प्रज्वलीत करते . कवी हा मानवीय भावबंधातून सूर्यकुलाच्या प्रतिभेशी स्वतःचे नाते सांगतो .कवी हा नव्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीचा वसा घेतो .सर्जी एसनिनसारखा प्रतिभावंत रशीयनकवी, म्हणतो की,”कवी असणे म्हणजे आपली स्वतःची नाजूक त्वचा सोलून स्वतःच्या रक्ताने दुसऱ्यांची हृदये माखत त्याचे दुःखशमन करणे.” हे दुःख मांडताना कवीला अनेक वेळा अस्ताव्यस्थ होतो .व्याकुळ होतो , क्रांतीकारी होतो , ज्वालाग्राही होतो.त्यातून आपल्या नव्या शब्दांची सृजनत्व घडवून आणतो .डॉ.अक्रम पठाण काव्य भीमायन या कवितासंग्रहाविषयी म्हणतात की,”काव्य भीमायन या कवितासंग्रहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे इहवादी तत्वज्ञान आणि कवी यशवंत मनोहर यांचे बुध्दिवादी तत्वज्ञान समांतर प्रवास करतांना दिसत आहेत.

    या दोन्ही तत्वज्ञानाचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे माणसाची सर्वकष प्रगती.”असे मत व्यक्त केले ते रास्तच आहे.
    काव्य भीमायन ह्या कवितासंग्रहात भीमगाथा नावाची अतिशय चिंतनगर्भ कविता असून त्यामधून कवीने मानवीय मनातील अंतरंगाचे तरंगमय तत्वनिष्ठ मूल्यमापन मांडले आहे.डॉ.आंबेडकरांच्या गुणवैशिष्ट्यांचे भावस्पर्शी ,हृदयद्रावक , नवसृजनत्व याची उत्तम मांडणी केली आहे.ते या कवितेत म्हणतात की,

    तू मनुला कापणारा,स्मृती त्याची जाळणारा
    तूच संविधान अमुचे,दीपस्तंभा !
    ……………………….
    क्रांतीचा निर्धार तू,शांतीचे महावाक्य तू
    तूच पाऊससुगंधाचा,सूर्याधिसूर्या !
    ……………….
    यापुढे साऱ्या पिढ्यांच्या ,दीप होशील हाती तू
    ज्वालामुखीचा उद्रेक तू ,महाविद्रोहा !

    नाविण्यपुर्ण शब्दाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेेब आंबेडकरांच्या महासंग्रामाची ज्वालाग्राही शब्द पेरणी करुन नवा आकाश निर्माण करणाराबोधिवृक्ष ,अग्नीकविताचा सौंदर्य युध्दा , बुध्दिवादाचा प्रभंजन ,महासूर्यवंशी तू ,प्रज्ञाविहारा या प्रभावी शब्द वाक्यातून आंबेडकरांचे भावविश्व उलगडून दाखविले आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही दिर्घ कविता असून कवीने आंबेडकरी क्रांती चळवळीचा समाज उध्दाराचा नवा आकृतीबंध रेखाटला आहे.१९८२ ला जेव्हा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वानाला पंचवीस वर्ष झाली त्या अनुषंगाने चिंतनकाव्य लिहले आहे हे चिंतनकाव्य मराठी साहित्यातील नव शब्दाच्या निर्मितीची कार्यशाळा आहे.या कवितेच्या माध्यमातून महाऊर्जेची ज्वाला धगधगत आहे असे वाटते.ही कविता आंबेडकरी विचारप्रबोधनाची महाक्रांतीकविता आहे .यामधून देशातील सनातनी विषमतेने बरबटलेल्या मनुव्यवस्थेवर आक्रमकपणे तुटून पडतात .पन्नास वर्षाच्या कालंखडात आंबेडकरी क्रांतीने केलेल्या महासंग्रामाची समीक्षा करतात.अंधारा चिरत उजेडाचे भव्य स्वप्न साकार करणारी ही कविता आहे.ते म्हणतात की,

    क्रांतीमंता तू प्रखरून मावळलास काळोखदर्यात
    आणि ही उघडी पडली बेसुमार
    आणि नाव जोडतात तुझ्या रक्ताशी.
    पृ. क्र.१९

    अतिशय मर्मभेदी विचारगर्भशीलकेची कविता बाबासाहेबांच्या रक्ताशी नाती सांगत आहे.तूने तर साऱ्या शतकानुशतके अन्यायाच्या गढीलाच उद्धवस्त केलास ,वाळवंटाला तू कुस केलेस आणि इतिहासाच्या जळत्या खडकावर मुळ्या रोवून तू उभा राहलिस आणि निर्वातात खळबळ .
    तूने तर साऱ्या अमानवीयतेच्या अंधारवाटांना प्रकाशमान करुन समतेची सुंदर लेणी तयार केलास .तूझे आयुष्य म्हणजे संग्राम . इतिहासाला तू आपल्यासमोर वाकवून टाकलास त्यावर भाष्य करताना कवी म्हणतो,

    निद्रिस्त जंगलांना प्रकाशाची आग लावीत सूर्यासारखा
    फडकत आहेत त्याच्या आक्रमणाच्या पताका
    उठतो आहे मुसके बांधलेला इतिहास खळवळून चवताळून.
    पृ. क्र.२५

    बाबासाहेबांचे महापरिनिर्वान झाले तेव्हा कवीच्या अंधारातच कोसळली युगान्तक वीज .अंधार अधिकच गर्द झाला.तरी त्यांनी विद्रोहाची मशाल सोडला नाही.पण तुझ्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक संघटनाने स्वतःचे स्वरूप बदलवून टाकले .एकेका छद्मी अडथळ्याशी भांडत भावाचे रक्त सांडवत विरोधकाच्या पायावर लोळन घातले.ही भूमिका कवीला बेचैन करते.कारण राजकारणाच्या नशेत व समरसतेच्या नशेत स्वतःला आंबेडकरी नेते व प्रतिभावंत म्हणणारे अंधाऱ्या वाटेनं जात आहेत.मी साऱ्याशी भांडून एक प्रदीर्घ कविता , महाकविता करणार आहे . आज जयभीमचा नारा क्रांतीचा आहे .पण याचा वापर कोणी ,कुठेही ,कसाही करतो याला अर्थ नाही म्हणून कवी म्हणतो,

    जयभीम हे नाव झाले आहे क्रांतीचे
    नव्या संस्कृतीच्या उद्घाटनाचे .
    पाशवी संस्कृतीच्या दफनविधिचे
    वर्णन झाले आहे ते !
    पृ.क्र.३१

    असा मूल्यवाचक आशय प्रकट करतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नव नव्या क्रांतीयुगाचा पिता आहे यावर चिंतन मांडताना कवी म्हणतो की.

    आंबेडकर हे नाव कोणत्याही भविष्याचे.
    आंबेडकर हे नाव उपेक्षितांच्या महायुध्द्चे
    …………
    आंबेडकर हे नाव आहे क्रांतीच्या विद्यापीठाचे
    आंबेडकर हे नाव समतेच्या महास्वप्नाचे ..
    ……………….
    मनामनात मेलेल्या तुरुंगाच्या नीतीत माती गेली होती मरून
    त्या क्रॉनिक तुरूंगावर कोसळलेल्या अस्त्राचे नाव आंबेडकर.
    पृ.क्र.३६
    अतिशय भारदस्त ही कविता आंबेडकरांच्या ज्ञानसू्र्याची विश्वसनीयतेला स्वीकारून नव्या मूल्यगर्भ सामाजिक परिर्वतनाची मशाल प्रखर तेजस्वी करत आहे.
    महाडची क्रांती ही मानवमुक्तीचा संग्राम आहे.मनुस्मृतीच्या थडग्यावर उभारलास तू नव्या मानवी भारताचा विजयस्तंभ आहे.अशी भूमिका कवीची आहे. बाबासाहेबच्या शब्द क्रांतीने नवे विश्व उभे हाेत आहे.तुझ्या बोटाच्या साहाय्याने आमच्या जीवनाचा अध्याय पूर्ण होत नाही म्हणून कवी म्हणतात की,

    माझे बोट धरून तू समजून सांगतोस स्वप्नाचे बीजगणित
    सांगतोस काट्यांवर अंथलेल्या भविष्याच्या सलग संरक्षणाची विद्या
    आणि डोळ्यांना दिसत राहतोस
    तू वादळलेल्या पराक्रमासारखा.
    पृ.क्र.४९

    बाबासाहेबांच्या महापरिनिर्वानाला झालेल्या पंचवीस वर्षानिमित्य कवी गदगदून गेला आहे.भावविभोर झाला आहे.त्याच्या डोळ्यात पंचवीस पावसाळ्याचा हाहाकार आहे.तरी दीक्षाभूमी कवीला क्रांतीऊर्जेचे नवे उन्नयन देते.बाबासाहेब तूच साऱ्या जगाचा बाप झाला आहेस असे कोणीही आजपर्यत जगात झाले नाही.कवी हा आशावादी असून , समाजासमोर दुःखाचा डोंगर उभा असतांना भारतीय संविधानातील समानसुत्रांनी व बुध्द तत्वज्ञानाने दुःखावर मात करणार आहे. ते कोणापुढे हात जोडत नाही ,पाया पडत नाही कारण त्यांचे क्रांतीप्रवण विज्ञानरूपी ज्ञानसागरातून प्रज्वलीत झाले आहे.

    २००६ च्या धम्मक्रांतीच्या पन्नास वर्षात बौध्द बांधवानी केलेल्या कार्याच्या प्रगतीचा आलेख मांडतात तसेच ती का मागे यांचे स्वरूप स्पष्ट करतात कवीला पन्नास वर्षातला एकही क्षण तुझ्या आठवणी शिवाय सरकला नाही आमच्या आयुष्यतून ..अशी आठवण करतात.पन्नास वर्षामध्ये अनेक रंगाचे सोबती मिळाले पण काही रंग काळोखाचे साम्राज्य घेऊनच राहीले .त्याचे शरीरही व मनही काळोखाचे आहेत यांची जाणीव झाली.तुच आमच्या जीवनाचा शिल्पकार आहेस त्यासाठी कवी क्रांतीनायक यामधून आपल्या मनातील सत्य जाणीव रेखांखित करताना म्हणतात की,

    ओठातून सूर्याची आग वाटायला,
    संस्कृतीवर फुल्या मारायला ,
    लाचारीचे मढे पेटवायला आणि
    अन्यायाची आग जाळायला शिकलो
    क्रांतीनायक …!
    पृ. क्र.६४

    तू आमचा जीवनाला नवे आत्मभान दिलेस . गुलामीच्या साऱ्या बेड्या तोडून मानवीय स्वातंत्र्य दिलेस आणि आमच्यातील मानवाला जागा केलास एका महावादळासारखा म्हणून कवीने आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू विशद केले आहेत .ते म्हणतात की,

    महाक्रांतीनायका..!
    आम्हाला जोडलेस तू बध्दिवादाशी धगधगत्या
    आम्हाला जोडलेस तू नास्तिक्याशी धारदार
    आम्हाला जोडलेस तू जडवादाशी भांडखोर
    तू जोडलेस आम्हाला इहवादाच्या गतीशी.
    पृ.क्र.६७

    मानवीय मनाची गतिशीलता प्रतिबिंबित करून १९५६ ला फुलवलासअग्नीपिसारा , फुलविलीस निखाऱ्यांची फुले..दीक्षाभूमीच्या मनामनात -आकाशाला गर्व वाटावे असे तुझे निळ्या क्रांतीतेजाने दिपवलास मानव धरा . यासाठी कवी म्हणतो की,

    आता सूर्यही निळी होत चालला आहे.
    युगाच्या क्षितिजातून उगवणाऱ्या पिढ्यांच्या
    भावना कवटाळीत आहेत निळ्या रंगाला
    विचारप्रक्रिया आनंदाने होत आहे निळी.
    पृ. क्र.६८

    ही कविता निळ्या क्रांतीच्या उत्कटतेची महत्ता प्रस्फोटीत करते. आंबेडकर नावाचा अर्थ विशद करताना कवी म्हणतो की,

    आंबेडकर या शब्दाचा अर्थ
    आणि सर्वच माणसे आणि शब्दकोश आता सांगत आहेत
    आंबेडकर म्हणजे क्रांती !
    आंबेडकर म्हणजे परिवर्तन !
    आंबेडकर म्हणजे बुध्दिवादाचे आणि समतेचे प्रज्ञेचे आणि करुणेचे
    माणुसकीचे आणि जडवादाचे अपूर्व स्वयंवर .
    सांगताहेत शब्दकोश आता आंबेडकर या शब्दाचा अर्थ.
    आंबेडकर हे नव्हे आडनाव केवळ एखाद्या आगीचे
    आंबेडकर हे वर्णन नव्हे केवळ ज्वालामुखीचे
    आंबेडकर म्हणजे जिद्द
    आंबेडकर म्हणजे युध्द,महायुध्द
    आंबेडकर म्हणजे बुध्द्,महाबुध्द !
    आंबेडकर या शब्दाला येत आहेत आता अर्थांची नवनवी फुले.
    पृ.क्र.७०

    हि कविता आंबेडकरांच्या नव्या सर्जनाचे सुक्ष्मनिरीक्षणाचा उत्कट आविष्कार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोणत्याच शब्दात न मावणारे महाक्रांतिदर्शक सृजनत्व आहे.जगाचा परिवेश परिवर्तित होतांना मनोहरांची कविता भविष्याचा अचूक वेध घेऊन नवे मूल्यपरिमल गुढरम्य सर्जनशीलतेची नवनिर्मिती करतात . हजारोवर्षापासून हा समाज अंधारात चाचपडत असतांना , माणुसकीच्या सर्व सीमा बंद असणारा मूकनायक शारिरीक शक्तीने मजबूत असला तरी सामाजिक व मानसिक शक्तीने पंगू होता .पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी या मूकनायकाला महासूर्याचे ज्ञानतेज देऊन दैदिप्यमान बनविले . धम्मचक्राच्या विश्वशांती परिर्वतनानी नव्या ऊर्जायानाची अणुशीलता दिली म्हणून कवी म्हणतो की,

    आम्ही पन्नास वर्षात
    दुनियेत दुनियेने थक्क व्हावे
    अशी नवी दुनिया निर्मिली
    आम्ही निर्मिली नवे ज्ञानशास्त्र
    निर्मिले आम्ही आंबेडकर नावाचे नवे प्रमाणशास्त्र
    आम्ही निर्मिले ,
    विषमतेची,अंधश्रध्दांची मरणे नसलेले बुध्दिवादी माणुसकीचे नवे जीवशास्त्र
    क्रांतीनायक…..!
    पृ.क्र.७८

    या कवितेतून समाजाच्या उत्क्रांतीत धनाग्रवृत्तीची भूमिका विशद केली आहे.जगाच्या पाठीवर १९५६ ची क्रांती नव्या मूल्यजाणिवांचा नवोन्मेषण आहे.जागतिकीकरणामध्ये शोषिकता निर्माण झाली असून बाबासाहेबांच्या समाजवादाची न्यायाच्या संविधानाला विकृत करण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. भांडवलदार वर्ग गरीबांशी अथेन्ससारखीच वागू लागली आहेत.त्यासाठी सर्व समाज घटकांने आंबेडकरवादाचा
    बूलंद टेकू घेऊन सासंस्कृतिक समाजवादाने सर्व सरळ करा असा मूल्य संदेश दिला आहे.आज जीवनात आमूलाग्र बदल घडून येत असून नव्या शिक्षणाच्या परिवर्तनाने जुने जाऊ द्या मरणा लागूनी ..
    अशी व्यवस्था झाली आहे.ग्लोबल जगाच्या वर्तुळावर गरीब समाज बाहेर फेकल्या जाणार याची चिंता कवीला आहे.म्हणून नव्या विज्ञानाच्या अभ्यासासाठी आंबेडकर हे आजचे सर्वांच्या विश्वासाचे विश्वविद्यापीठ आहे.तोच नव्या जगाचा खरा शिल्पकार वाटतो.

    या कवितासंग्रहात २००६ ला काही कवितांची भर घालण्यात आली असून “भीमराव रामजी आंबेडकर” ही कविता आंबेडकरांच्या शौर्याचे क्रांतीस्वरूप रेखांखित करते .
    मनुस्मृतीच्या विषमतेला अग्नीज्वाला देऊन समान मानवाचे संविधान देऊन नवा भारत (इंडिया) निर्माण केला.ते या कवितेत म्हणतात की,

    अरे या मनुच्या मुलांनाही माणूस होणे भागच पडेल
    अशी तुझी जलाल घटना तू कुठे ठेवलीस ?
    पृ.क्र.९३

    आजच्या परिप्रेश्यात मनुव्यवस्थेची अमाणसे घटनेला नेस्तनाभूत करीतआहेत.त्यासाठी सर्व भारतीयांनी महा आंदोलन करावे असे कवीलावाटते.”त्याच्या आठवणीशी डोळे भिडवतांना” ही कविता रचना बंधानी अपूर्व अशी आहे.आंबेडकरीचळवळीची,राजकारणाची दिशा कशी चूकत आहे यावर भाष्य करणारी आहे.ते म्हणतात की,

    त्याच्या दिग्दर्शक आठवणींना सोडचिठ्ठया दिल्या आपण
    त्या आपल्या कनवाळू बापाने दिलेली उजेडाची इस्टेट
    राजकारणाच्या जुगारात हरलो आपण.
    ………………
    या दिवाळखोर गर्दीतून चालताना
    आता हातच गळल्यासारखे वाटते..
    त्याच्या आठवणीशी डोळे भिडवतांनाही आता अपराध्यासारखे वाटते…
    पृ. क्र.९५

    बाबासाहेबाने सर्व समाजाला नव्या माणुसकीची संजीवनी दिली आहे म्हणून कवी ” युध्दशाळा “या कवितेत म्हणतात की,

    तूझे शब्द आता अम्हा युध्दशाळा
    तुझी याद भीमा तमातील ज्वाळा
    अम्ही धावतो सूर्य घेऊन हाती
    अम्हा मृत्युची नाही पर्वा न भीती.

    धम्माचा दीप देऊन आम्हाला नवा जन्म दिला ,नवे पंख दिले,नवे निळे आकाश दिले,नवा संविधान सूर्य दिला.ही सर्व किमया दीक्षाभूमीची आहे.दीक्षाभूमीच्या परिवर्तनाधिष्ठीत क्रांतीने कवी उत्सर्जित झाला असून नवे भव्योदीप्त स्वप्न त्यांच्या उरात सामावलेले आहे .त्या स्वप्नंनाना मोकळी वाट करुन देतांना म्हणतात की,

    स्वप्न तू आंबेडकराचे !स्वप्न स्वप्नाच्या जगाचे
    युध्द मारून टाकणारे ;युध तू महायुध्द् तू…..
    पृ. क्र. १०८

    जयजयकार ही कविता आशयाच्या अंगाने व रसग्रहनाच्या उंच पातळीवर पोहचली असून बाबासाहेबांचा जन्म म्हणजे नव्या ज्ञानसू्र्याची निर्मिती .या कवितेत म्हणतात की,

    चौदा एप्रिलच्या गर्भातून झेपावलेल्या
    विद्रोही श्वासांची.बेडर पंखाची .
    या शिखरसंभवाला अभिवादन !
    एका अफाटाचा जन्म पेलू शकलेल्या चौदा एप्रिलच्या युगारंभक सामर्थ्याला अभिवादन..
    त्या महामातेच्या कुशीच्या महानतेचा जयजयकार
    या विद्रोहाचा जयजयकार.
    पृ. क्र. ९२

    काव्य भीमायन या कवितासंग्रहातील कविता ह्या आंबेडकरी जीवनाचे अग्नीफुले वेचित वेचित नव्या मूल्यजाणिवांचा नवा भारत घडविणाऱ्या आहेत .शब्दातील अभिदा शक्तीने विस्तृत झाली असून बाबासाहेबांच्या विविध पैलूचे सामर्थ्य मोठ्या शिताफतीने लिलया पेललेले आहे.मागे पुढे रक्ताची झड , ज्वालामुखीही मागे पुढे .तुमचाच शब्द अंथरतो वाट तुमच्याच उजेड वाटेपुढे . बाबासाहेबांच्या ज्ञानसू्र्य प्रतिभेतून नवी क्रांतीची बीजे पेरली असून भारतातील सर्व समाजाला आंबेडकरांच्या प्रज्ञाविचाराशिवाय तरणोपाय नाही.त्यांनी पेरलेल्या ऊर्जेच्या चांदण्यात क्रांतीचा नवा नायक निर्माण होत आहे तो नायक म्हणतो,

    तू पेरूण गेलास उजेड अंधारात
    उगवलो आम्ही अन मरून गेली रात
    तू दिला भडाग्नी जहरांच्या सरणाला
    तू आला आणि मनू चितेवर चढला…
    पृ. क्र.१०४

    काव्य भीमायन या कवितासंग्रहात नव्या शब्दांचे सृजनत्व असून महा विस्फोटक शब्दातून अवडंबराचे सारे बनावट चेहऱ्याची पोलखोल केली आहे.अमाणुषतेच्या धर्मावरती कवी तुटून पडला आहे.मानवाला नव्या परिवर्तनाच्या वाटा दाखवित आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातील तत्वनिष्ठता वेगळ्या शैलीने वाचकासमोर प्रस्तुत केला आहे.वेदना,विद्रोह,नकार,असत्य,विषमता,अंधारयुग ,सृजन,अशा अनेक छंदबंधाने ही कविता आगीचे बॉम्बगोळे शब्दांच्या माध्यमातून असमानतेवर फेकत असून त्यामधून नवा भारत घडावा ही त्याची इच्छा आहे.आजच्या काळातही ही कविता भारतीय समाजाला नवा आचार विचार देणारा महापथ आहे.संविधानात्मक माणसाच्या निर्मितीचा इहवादी मूल्यप्रकल्प आहे.अमाणुसतेच्या साऱ्या वाटेवर सुरूंगाची पेरणी करून प्रगतीच्या नव्या वाटा प्रकाशमान करत आहे.म्हणून काव्य भीमायन हा कवितासंग्रह नव्या जगाच्या मानवनिर्मितेचे विश्वविद्यापीठ असून स्वातंत्र,समता,व बधुंभावाचं नवं जग निर्माण करणारी विश्वऊर्जामय कविता आहे.
    त्यासाठी कवीला पुढील काव्यांक आविष्कारासाठी मंगलकामना चिंतितो..