वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला नागपूर मेट्रोतून प्रवास

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.१६डिसेंबर):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. प्रत्येक फेरीनंतर होणाऱ्या निर्जंतुकीकरणासोबतच सर्व नियमांचे पालन होत असलेल्या नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून विदर्भातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांनीही मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

नागपूर मेट्रोने अधिकाधिक लोकांनी प्रवास करावा यासाठी महामेट्रोतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नागपुरातील आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी नुकतीच मेट्रोची सफर केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एनएमआरडीएच्या आयुक्त शीतल उगले-तेली, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सारंग आव्हाड यांनी मेट्रोच्या सुरक्षित प्रवासाचा आनंद लुटला. मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले.

🔸राजकीय नेत्यांचीही मेट्रो सफर
नागपुरात येणाऱ्या आणि नागपुरातील राजकीय नेत्यांनीही मेट्रोची सफर केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार मोहन मते, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी सुरक्षित मेट्रोची सफर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले.