माजी सरपंचांनो ..जरा सबुरीनं

27

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.सगळे गावपुढारी तेल लावून आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहेत. जुने जानते मातब्बर मंडळी शड्डू ठोकून रिंगणात यायला उत्सुक आहेत. नवे तरुण पण मोठ्या हौसेने यात उडी मारायला तयार आहेत.

सरकारने सुरवातीला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करून काही लोकांसाठी खुशीची तर काही लोकांसाठी हिरमोड करणारी बातमी दिली होती.निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि राज्य सरकारने पुन्हा गुगली टाकली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, सरपंच पदासाठी जे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले होते ते रद्दबातल करून निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदासाठी नंतर सोडत सुटेल असे जाहीर केले.या निर्णयामुळे जे पुर्वीच्या सोडतीमुळे कोमात गेले होते ते पुन्हा जीवंत झालेत.आणि जे पुर्वीच्या सोडतीमुळे जे हुरळून गेले होते ते आज हिरमुसले आहेत.

दुसरी बाब अशी की सरकारने असे स्पष्ट केले की सरपंच हा सदस्यांतूनच निवडला जाणार आहे.जनतेतून निवडला जाणारा सरपंच हा फडनविस सरकारचा निर्णय रद्दबातल पूर्णतः ठरवला.त्यास कारण असे दिले की जनतेतून सरपंच हा राज्यघटनेच्या चौकटीत बसणारा नाही. जर सरपंच जर जनतेतून निवडायचा असेल तर मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान पर्यंत जनतेतून निवडायला हवेत.जे घटनेला छेद देणारे ठरेल.

आता थोडं सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांकडे येवू. जुणेजानते सरपंच, सदस्य मोठ्या अभिमानाने सांगत आहेत, पुन्हा आमचीच बारी किंवा मी पुन्हा येईन असे मोठ्या अविर्भावात सांगत आहेत.आम्ही सत्तेत आलो तर गावाचा विकास करु, गावाला पाण्याची सोय करू, गावासाठी असे करु,तसे करू, पथदिवे लावू, रस्ता तयार करु,गटारे बनवू.अशा वारेमाप घोषणा देतील. पण त्यांना गत पाच वर्षाचा सोयिस्करपणे विसर पडलेला दिसून येईल. गत पाच वर्षात आपण सत्तेवर असताना ही कामे का करता आली नाहीत हे मात्र त्यांना सांगता येणार नाही. गत पंचवार्षिक निवडणुकीत पण हीच आश्वासणे आपणच दिली होती हे ही विसरतील. पण जनतेनी या घोषणा,यांची आश्वासने न विसरता गेल्या पंचवार्षिकचा हिशोब विचारायला हवा.ग्रामपंचायत मधे आलटून पालटून सत्ता भोगणारे आज मोठ्या सभ्यपणाचा आव आणतील.आणि गावासाठी आम्हीच कसे तारणहार म्हणून ओरडून सांगतील. पण गावाचं भलं करण्यासाठी स्वतःची सत्ता असताना कोणी हात बांधले होते का याचं मात्र उत्तर देणार नाहीत.

नवीन सदस्यांनो आणि भावी सरपंचांनो तुम्हाला गावाचा कळवळा ,तळमळ असेल तर नक्कीच आखाड्यात उतरा.आणि गावचा कारभार गावातील सर्वांना सोबत घेऊन पारदर्शी पणे करून दाखवा.तरच गाव प्रगतीपथावर वाटचाल करेल.१५ जानेवारी ला निवडणुका संपन्न होऊन निकालाची प्रतीक्षा सर्वांना आहे. तोपर्यंत गावाच्या चावडीवर निवडणुकीच्या चर्चांच्या वावड्या मात्र रोजच उडत राहतील.

✒️लेखक:-सतीश यानभुरे(मो:-७०८३१४४८८५)