राज्यातील अनेक वसतिगृहांना अद्यापही जादा वीजदराने आकारणी सुरु

27

🔹संबंधित संस्था, संघटना व वसतिगृह चालकांनी त्वरित हरकती नोंदवाव्यात – प्रताप होगाडे

✒️इचलकरंजी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

इचलकरंजी(दि.17डिसेंबर):-राज्यातील अनेक खाजगी व सार्वजनिक वसतिगृहांना १ एप्रिल नंतर अद्यापही “सार्वजनिक सेवा” या सवलतीच्या वीजदराऐवजी जुन्या “लघुदाब घरगुती” या जादा वीजदराने आकारणी होत आहे, असे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. या वर्गवारीमध्ये शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेली सर्व वसतिगृहे, तसेच संलग्न नसलेली अन्य सर्व विद्यार्थी वसतिगृहे, कर्मचारी पुरुष व महिला वसतिगृहे (Working Men/Women’s Hostels), निराधार अनाथ व दिव्यांग वसतिगृहे, मनोरूग्ण व बाल सुधारगृहे, धर्मशाळा, निर्वासित व आपदग्रस्त छावण्या, अनाथाश्रम इ. सर्व प्रकारच्या वसतिगृहांचा समावेश आहे.

अशा लघुदाब घरगुती या जादा वीजदराने आकारणी सुरु असलेल्या सर्व वसतिगृहांशी संबंधित संस्था, संघटना वा वैयक्तिक वीज ग्राहकांनी त्वरित हरकती नोंद कराव्यात. हरकतीची पोहोच घेतलेली प्रत व संबंधित अंतिम बिलाची प्रत त्वरित संघटनेकडे पाठवावी असे जाहीर आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे…

यासंबंधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने इ. स. २०२० ते २०२५ या कालावधीसाठी दरनिश्चिती आदेश दि. ३० मार्च २०२० रोजी जाहीर केले आहेत. या नवीन आदेशानुसार राज्यातील शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व, तसेच राज्यातील वर नमूद केलेल्या अन्य सर्व प्रकारच्या वसतिगृहांना सार्वजनिक सेवा – शासकीय अथवा सार्वजनिक सेवा – अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी दि. १ एप्रिल पासून सुरु होणे आवश्यक होते. त्यानुसार शासकीय वर्गवारीतील ब-याचशा वसतिगृहांना योग्य आकारणी सुरु झाली आहे. तसेच अन्य लघुदाब वसतिगृहांबाबत स्पष्ट आदेश असल्याने तेथेही योग्य दराने अंमलबजावणी सुरु झालेली असण्याची शक्यता आहे.

तथापि याबाबत बिल तपासून खात्री करणे आवश्यक आहे. तसेच उच्चदाब जोडणी असलेली अन्य सर्व प्रकारच्या वसतिगृहे व खाजगी शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेली विद्यार्थी वसतिगृहे यांच्या बाबतीत आदेशात त्रुटी असल्याने त्यांच्यावर अद्यापही लघुदाब घरगुती या जादा वीज दराने आकारणी सुरु आहे. या त्रुटी दूर करून योग्य वीज दर आकारणी दि. १ एप्रिल पासून लागू करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तथापि या याचिकेसंदर्भात राज्यातील सर्व वसतिगृहांना सार्वजनिक सेवा शासकीय वा सार्वजनिक सेवा अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी सुरु करण्यात आली आहे असा दावा महावितरण कंपनीने आयोगासमोर केला आहे. तथापि हे खरे नसुन अद्यापही अनेक ठिकाणी लघुदाब घरगुती वीजदराने आकारणी होत आहे. अशी माहिती व पुरावे आयोगासमोर दाखल करणे आवश्यक आहे.

त्यासाठी कृपया यासंदर्भात संबंधित सर्व वीज ग्राहकांनी आपली बिले तपासावीत. सार्वजनिक सेवा शासकीय अथवा सार्वजनिक सेवा अन्य असा सवलतीचा दर लागू झालेला नसल्यास त्वरित तक्रार/हरकत नोंद करावी. संबंधित माहिती व वीज बिले त्वरित महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेकडे पाठवावीत असे जाहीर आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात अधिक कोणतीही माहिती वा मदत हवी असल्यास संघटना सचिव श्री जाविद मोमीन यांच्याशी 9226297771 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही जाहीर करण्यात आले आहे…

सदरची माहिती खालील ईमेल आयडी वर अथवा व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावी ही विनंती
prataphogade@yahoo.co.in prataphogade@gmail.com javidmomin38@gmail.com 9823072249 अथवा 9226297771