सोलापूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत निवडणूक होवू शकतात रद्द

30

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.18डिसेंबर):-हे’ आहे कारण : उपसचिवांनी दिले निवडणूक आयोगाला पत्र एप्रिल-मे २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधी मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर २०२० रोजी जाहीर केला आहे. यानुसार या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींपैकी राज्यातील १६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद अथवा नगरपंचायती मध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी असे राज्य शासनाकडून निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे.

माळशिरस तालुक्यातील अकलूज, महाळुंग व नातेपुते या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगर पंचायती मध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या जाहीर करण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुका घेऊ नयेत असे महाराष्ट्र शासनाने निवडणूक आयोगाला कळवले आहे. राज्य शासनाचे उपसचिव एस. जे. मोघे यांनी १६ डिसेंबरला निवडणूक आयोगाला यासंदर्भात लेखी कळवले आहे.

निवडणुका पुढे ढकलण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, महाळुंग -श्रीपुर, नातेपुते आणि वैराग या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा १९ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आले असून अक्षेप मागवण्यात आले होते. हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे.

त्याशिवाय महाळुंग-श्रीपुर व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा १९ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आली असून यासंदर्भातही अक्षेप मागवण्यात आले होते. याचे प्रकरणही अंतिम टप्प्यात आहे .वैराग ग्रामपंचायतीच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाला असून नगरपंचायतीचे निकष पूर्ण करत असल्याने रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा काढण्याची कारवाई सुरू असल्याचे राज्य शासनाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.