शहीद वीर जवान अमित पाटील अनंतात विलीन

37

🔸शासकीय इतिमामात मूळ गावी वाकडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

चाळीसगांव(दि.19डिसेंबर):-तालुक्यातील वाकडी येथील 183 बटालियन मधील जवान अमित साहेबराव पाटील हे दोन दिवसांपूर्वी जम्मु काश्मीर येथे देशासाठी सेवा बजावत असतांना शहीद झाले होते. त्यांच्यावर आज दि. 18 रोजी दुपारी 12 वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी वाकडी येथे शासकीय इतिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विर जवान अमित पाटील यांचे पार्थिव शरीर विशेष विमानाने जम्मू-काश्मीर येथून दिल्ली येथे व तिथून इंदोर येथे आणण्यात आले व इंदूर येथून सैन्यदलाच्या तुकडीने विशेष वाहनाने हे पार्थिव शरीर चाळीसगाव येथे आणले सकाळी नऊ वाजता अमित यांचे पार्थिव शरीर त्यांच्या घरी आणण्यात आले, कुटुंबी व नातेवाईकांनी त्यांचे दर्शन घेतले, त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात गावातून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली, जवळपास दोन तासांच्या अंतिम यात्रे नंतर, भारतीय सैन्यदल व पोलीस दलातील सैनिकांनी त्यांना मानवंदना देत बंदुकीच्या 3 फेऱ्या हवेत झाडुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर त्यांच्या चार वर्षाच्या मुलगा भूपेश याने त्यांना अग्निडाग दिला. यावेळी संपूर्ण परिवारावर अश्रू अनावर झाले होते, भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे, अमर रहे, अमित पाटील अमर रहे आशा देश भक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमले होते. गावात ठिक ठिकाणी रांगोळी काढण्यात आले होते. जागोजागी शहिद वीर जवान अमित पाटील यांचे फलक लावुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी राज्याचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजू मामा भोळे, नगरसेवक, प.स. सदस्य, जि. प. सदस्य तसेच चाळीसगांवचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी वाय. एन. वाळेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी वाकडे साहेब, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह पंचक्रोशी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.BSF च्या अधिकारी यांनी भारताचा तिरंगा जेंव्हा शहीद जवान अमित पाटील यांच्या पत्नी कडे सोपविला तेंव्हा त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाली.