जीवन संघर्ष

44

(पुस्तक परीक्षण :- सुभाष राघू आढाव)

नवनाथ रणखांबे यांचा ‘जीवन संघर्ष’ हा कवितासंग्रह शारदा प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशित केलेला नवनाथ रणखांबे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह . सतिश खोत यांनी साकारलेले मुखपृष्ठ पाहताच जीवन संघर्ष वाचकांचे लक्ष वेधून घेतो.
कवीचे अंतर्गत व्यथा, वेदना, हुंकार,संघर्ष , समाज व्यवस्था, परिवर्तन ….जे पाहिले, अनुभवले, ऐकले ते अंतरंग जे आहे ते मुक्त छंद रूपात नवनाथ रणखांबे यांचा “जीवन संघर्ष” व्यक्त होत जातो. किंबहुना गावकुसाबाहेर वस्तीचा जीवनशैलीचा धांडोळा आपणांस वाचायला मिळतो. हे ह्या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नवनाथ रणखांबे कविता संग्रहातील पहिल्याच कवितेत आई वडीलांचे ऋण व्यक्त करतात ….
तुम्हीच बुद्धाचे तत्वज्ञान,
पंचशील, अष्टांगमार्ग, प्रज्ञा शिल करूणा,
अत्त दीप भव…. शिकवलं मला
सांग मी फेडू कसे ? ….
न फिटणारे ऋण असे ! ….
आई वडील हेच प्रथम गुरू असतात. तेच मुलाबाळांचा सांभाळ करुन त्यांचं आयुष्य फुलवत असतात. मुलाबाळांनी आई वडीलांची सेवा करायची असते. जीवन जगत असताना “जीवन संघर्ष” वाटचालीत आई वडीलांची आठवण कवीला होते…. त्यांच्या विषयी ऋण व्यक्त करताना ते आई वडीलांविषयी ….
जीवनाला माझ्या आभाळाची माया म्हणतात…. कवीने ‘आभाळाची माया’ …. हे छान प्रतिक वापरले आहे.

आई वडीलांविषयीचे ऋण गाथा ही न संपणारी आहे.
एम.ए(इतिहास), एल.एल.बी., डि.जे.आणि एम.सी.,.. शिक्षण घेतलेले कवी नवनाथ रणखांबे शैक्षणिक अर्हता प्राप्त वकील आहेत. मुले शिकावीत म्हणून आईने केलेल्या कष्टाची जाण कवीला आहे. आईने केलेले कष्ट , संघर्ष शब्दांकन करताना. ते …
‘माय, तुला मी पाहिलय’… ह्या कवितेत नोंदवितात –
संघर्षांनं तुझ्या मला घडवलय
तू अन्यायाला जाळण्यासाठी
मला वकील केलस !

आजही खेड्यापाड्यात राबणाऱ्या हातांना पुरेसे दाम मिळत नाही. गावकुसाबाहेर वस्ती आहे. वस्तीतील माणसांवर जात धर्मांचे स्तोम माजवून अन्याय अत्याचार होणं संपलेले नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक , राजकीय, शैक्षणिक चळवळीमुळेच कवी ज्या समाजात जन्माला आला त्या समाजातील माणूस जागा झाला…. जगण्याचं बळ मिळाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा. हा संदेश दिला. बाबासाहेबांच्या या संदेशाची पेरणी त्यावेळच्या पिढीने केली आहे म्हणून कवी म्हणतात –

बानं शिकवलं शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ते पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ह्या शब्दांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितले आहे. कवी शिक्षण संदर्भातील विचार “बानं शिकवलं ” अधोरेखित केले आहेत.
“बा” माझा ओरडला
लेका आजपासून तुझी
शिक्षण हिच आई
करियर हाच ‘बा’
मुंबई हीच ‘पांढरी’

शिक्षण वाघीनीचं दूध आहे
भिमाच्या चळवळीचा गाभा आहे
लोकांसाठी तुझं ……………
जगणं हेच तुझे जीणं आहे.
भिमाच्या चळवळीचं ……….
नवनाथा शिलेदार तुला बननं आहे!

आई वडील यांच्या ऋणाइतके किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ऋण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक भारतीय नागरिकांवर आहे. असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अशा प्रकारे बा कवीने अधोरेखित केला आहे. बानं शिकवलं… प्रेरणादायी कविता आहे.जीवन संघर्ष’ हा कवी नवनाथ रणखांबे यांनी जीवनातील लेखा जोखा शब्दांकित केलेला शब्द फुलोरा आहे.शासनकर्ती जमात व्हा …. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश देणारी कविता शब्दाला जाळा ही कविता देते आणि दलित पणाला नकार देते.

दलित बोलणे सोडा
या शब्दाचे भांडवल टाळा
दलित्व तुम्ही सोडा
शब्दाला या जाळा

‘जीवन संघर्ष’ हा कवितासंग्रह वाचताना कवी नवनाथ रणखांबे यांच्या कविता परिवर्तनाकरीता उमेद निर्माण करणारी रचना आहे. असे दिसून येते. कवीने विविध विषयांवर सामाजिक प्रेम, वेदना, पर्यावरण ,पाऊस, विरह ,संवेदना यांना स्पर्श केला आहे. कविता वाचताना पानोपानी प्रकर्षाने जाणवते की, कवी मनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत यांच्या विचारांचा प्रभाव आहे. कवी आंबेडकरी साहित्य, कामगार चळवळीत कार्यरत आहे. सदर कवीला अन्याया विरूद्ध चीड आहे. म्हणूनच कवी नवनाथ रणखांबे यांना जे सुचले आहे…..ते शब्दबद्ध करताना म्हणतात –

मी चळवळीचा वसा माझा
शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही
म्हणूनच ह्या कवीचा अनुभव खेड्यातील असो शहरातील असो…. प्रेम, निसर्ग, पाऊस….संबंधी नोंदविलेले काव्यपंक्ती …. दाद देण्याच्या पात्रतेच्या ठरतात.
कविता संग्रहाचे ‘जीवन संघर्ष’ हे नाव सदरहू संग्रहातील कवितांना समर्पक असेच आहे. ह्या संग्रहाचे शीर्षक असलेली ‘जीवन संघर्ष’ ही कविता संघर्षमय जीवन प्रवास म्हणजे काय हे सांगण्याचा कवीने केलेला प्रयत्न आहे.
पाऊस, निसर्ग, पर्यावरण, प्रेम… ह्या विषयावर भाष्य करणा-या कविता वास्तव चित्रण ‘जीवन संघर्ष’ वाटचालीत कवितेतून व्यक्त करण्यात जीवनात अनेक चढ उतार पाहिलेला आंबेडकरी विचारांचा कवी नवनाथ रणखांबे जगण्याचा संदेश देण्यात यशस्वी झाला आहे. किंबहुना अन्याय विरोधात लढा पुकारा आणि आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करा….अनुकरण करा. हा संदेश कवीच्या जीवन संघर्ष मधून नेमकेपणाने कवीने कविता मधून कवीने मांडला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी महती ‘डाॅ. आंबेडकर’ ह्या कवितेत कवी नोंद करतात. –

सर्वात मोठ्या संविधानाने,
रक्तपात न करता ……

लेखणीच्या स्वंतत्र क्रांतीने,
नवा इतिहास घडवलात…..
सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष,
गणराज्य घडवलात ……
स्त्री पुरुष सर्व धर्माला देशात,
न्याय दिलात ……
___युगपुरूष, त्राता बाबा तुम्ही !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना युगपुरुष संबोधून सदरहू कविततून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी महती-कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूसपण बहाल केले आहे. हे माणसाने विसरू नये.
माणसा तू माणसातलं ,
माणूसपण विसरू नको ll
( कविता – माणूस पण विसरला )
अशा प्रकारचा संदेश देणा-या आणि जगण्याची उमेद निर्माण करणा॒-या कवितांचा संग्रह ‘जीवन संघर्ष’ वाचायला हवा. संग्रही असावा.
कवितासंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. प्रा.डाॅ. शहाजी कांबळे यांची प्रस्तावना लाभली आहे. कवी नवनाथ रणखांबे यांच्या जीवन संघर्ष…… विषयी ते प्रस्तावनेत नोंद करतात.-
त्यांच्या कवितेत जीवन संघर्षाची धग पावलोपावली जाणवते.
कवितासंग्रहात वाचकांना नवनाथ रणखांबे यांच्या जीवन संघर्ष वाटचालीसंबंधीचे आशा रणखांबे, संजय थोरात, बौध्द साहित्यिक डी.एल.कांबळे, प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या अभिप्राय सह कवीचे मनोगत आणि कवीचा अल्प परिचय … वाचकांसाठी मेजवानी ठरेल. मलपृष्ठावर प्रा. दामोदर मोरे
यांचा अभिप्राय कवितासंग्रहाची उंची वाढतवितो. ते कवी नवनाथ रणखांबे यांच्या ‘ बानं शिकवलं ‘ ह्या कवितेच्या…..
जा पोरा जा तू ,उद्याचा दिवस तुझा आहे काव्यपंक्ती नमूद करून पाठराखण करताना म्हणतात.-

ही कवितेततील जाणीव प्रेरणादायी आहे. माणसाचा जगण्यासाठीचा जीवन संघर्ष सातत्याने सुरूच असतो. कवींच्या जीवन संघर्ष च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

कवितासंग्रह – जीवन संघर्ष
कवी – नवनाथ रणखांबे
प्रकाशक – शारदा प्रकाशन
नौपाडा , ठाणे
प्रथम आवृत्ती – २६ नोव्हेंबर २०१८
एकूण पाने – ८०
स्वागत मूल्य – रू.८०/-

✒️सुभाष राघू आढाव(गोवंडी,मुंबई)मो:-७४९९४१३०८६