सोमवार (28 डिसेंबर ) रोजी कचरा संकलन कंत्राटाविरोधात शहर काँग्रेसचे आंदोलन

29

🔺कंत्राट रद्द करण्याची मागणी; आज महानगरपालिकेसमोर आंदोलन

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.27डिसेंबर):- महापालिकेतील स्थायी समितीने १७०० रुपये कमी दराचे कंत्राट रद्द करीत २५५२ रुपये प्रति मेट्रिक टन दराने मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट पुणे या कंत्राटदाराला कंत्राट मंजूर केले आहे. यामुळे महानगरपालिकेला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. यासर्व प्रकारात मोठा गैरव्यवहार झाला असल्याने संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात सोमवारी (ता. २८) दुपारी ११ वाजता महानगरपालिकेसमोर आंदोलन केले जाणार आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील घर ते घर कचरा गोळा करणे, कंपोस्ट डेपोपर्यंत कचरा वाहतूक करणे, नाली सफाईचा कचरा वाहतूक करणे या कामासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराचा १७०० रुपये प्रति मेट्रीक टन हा सर्वात कमी दर होता. त्यामुळे या कंत्राटदाराला दहा वर्षांसाठी कंत्राट मंजूर करण्यात आले. मात्र, नंतर मनपातील सत्ताधा-यांनी प्रशासनास नवीन प्रक्रिया राबविण्यास दबाव आणला. मंजूर कंत्राट रद्द करीत नवीन कंत्राटासाठी निविदा मागविण्यात आल्या.

यात मे. स्वयंभू ट्रान्स्प्रोर्ट या कंत्राटदाराने पुन्हा प्रति मेट्रिक टन २५५२ रुपय दराची निविदा सादर केली. ही निविदा सर्वात कमी दराची असल्याने या कंत्राटदारास स्थायी समितीने कंत्राट मंजूर केले आहे. मात्र, जुन्या आणि नवीन दरात तब्बल साडेआठशे रुपयांची दरवाढ आहे. यामुळे मनपाला तब्बल कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागणार असल्याने यासर्व प्रक्रियेची चौकशी करून कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले जाणार आहे.