✒️शिवानंद पांचाळ(विशेष प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२

लातूर(दि.28डिसेंबर):-२०२१ या नव्या वर्षाचं नवं कॅलेंडर कदाचित तुम्ही घेतलं असेल आणि घेतलं नसेल तर लवकरच तुम्ही कॅलेंडर घरी आणालच. पण त्याआधी ही बातमी पाहा. लातूरच्या कॅलेंडरवाल्या आजोबांची, त्यांच्या धडपडीची.सडपातळ बांधा, डोळ्यावर काळा चष्मा, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्याला शबनम झोळी आणि झोळीत गुंडाळलेली कॅलेंडरं, हे आहेत चंद्रकांत देविदास नाईक, मूळचे औसा येथील असलेले हे 75 वर्षांचे आजोबा औसा शहरात कॅलेंडर विकत फिरतात. चंद्रकांत नाईक हे वयाच्या ७५ व्या वर्षातही कॅलेंडर विक्री करीत आहेत.

आपल्या नातवाच्या शिक्षणासाठी हे आजोबा रस्त्यावर फिरून कॅलेंडर विक्री करतात. पत्नीच्या मृत्यूने धक्क्यात असलेला मुलगा आपलं घर सावरू शकत नाही. त्यामुळेच उतारवयात ७५ व्या वर्षात आजोबा नातवाच्या शिक्षणासाठी परिस्थितीशी झगडत आहेत. चंद्रकांत नाईक आजोबा औसा शहर वासियांसाठी नवीन नाहीत. गेल्या ३१ वर्षांपासून नववर्षाच्या एक महिना अगोदर पासून ते औसा शहरातील मुख्य ठिकाणी कॅलेंडर विक्री करताना सहजपणे आढळतात. घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असताना तीन मुलींचे लग्न लावून दिल्यानंतर एकुलत्या एक मुलाचेही त्यांनी लग्न केलं.

मात्र, सुनेच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या मुलाला धक्का बसला. त्यामुळे ४४ वर्षीय मुलगा असूनही तो काम करीत नाही. त्यामुळे घरप्रपंच भागत नसल्यामुळे त्यांना उतारवयातही कॅलेंडर विक्रीचा व्यवसाय फिरून करावा लागत आहे. एक कॅलेंडर विकलं तर ०५, ०६, ०७ रुपये येतात. ०२ हजार कॅलेंडर विकले तर महिन्याकाठी १० हजार रुपये मिळतात. इकडून तिकडून हात पसरवण्यापेक्षा हे बरं आहे. टक्केवारीने पैसे घेण्याची पाळी येत नाही. स्वयंपाक मुलगा करतो. माझी मंडळी गेल्यावर्षी वारली. मुलगा काम करत नसल्याच्या त्रासाला कंटाळून मुलगा घर विकायचं म्हणतो, पैसे बँकेत टाकून व्याजावर जगायचं म्हणतो. प्रत्येक अवयवाला काम पाहिजे.

कॅलेंडर विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं कुणापुढं हात पसरण्याची वेळ येत नाही, असं नाईकबाबा सांगतात. नातवानं शिकून मोठं व्हावं, एवढंच त्यांचं स्वप्न आहे. त्यांचा नातू आदित्य हा यावर्षी दहावीला असल्यामुळे त्याला शिकवून मोठं करण्याची नाईक आजोबांचा निश्चय आहे.नाईक ‘बाबां’च्या या जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी औसा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक जण आवर्जून त्यांच्याकडून कॅलेंडर विकत घेतात. नातवासाठी धडपडणाऱ्या या आजोबांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. असे आजोबा असतील तर प्रत्येक नातू अजिंक्य ठरल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED