शेतकऱ्याच्या पोरांनो बापाच्या शेतीला गृहीत धरू नका

28

गावातून असाच फेरफटका मारत असतांना गावाच्या जुन्या आठवणीत मन रमत होतं. ज्या गावाच्या गल्लीबोळातून आपण हिंडलो, खेळलो त्या आठवणी सहज येत होत्या. याच गावानं, या मातीनं आपलयाला घडवलं, जगवलं. जगायला आणि लढायला शिकवलं असे एकएक विषय नजरेसमोरून सरकत होते. हे सर्व होत असतांना गावातील नवयुवक म्हणजे कोवळी विद्यार्थीदशेत मुले बसली होती. हि तीच मुले जी या गावाचा उद्याचं भविष्य आहे. गावची शान, मान, सन्मान आणि झाला तर अपमानही. काय करत होती माहित नाही पण मी नकळत त्यांच्या संवादाचा कानोसा घेतला आणि थोडा अस्वस्थ झालो. तर काय होता त्यांचा संवाद…… 

१- काय लेका काय कराव तर काही समजत नाही मले.
२- काहून का झाला गा बापू ?
१- काही नाही बे, पेपर येईन आता अभ्यास करा लागण अन त्याच्यातही काय होते त….
२- मंग कायले टेन्शन घेत बे तू
१- टेंशन नाही बे पण लेका पास त झालो पाहिजे न…
३- काय लेका होईन त होईन नाही त नाही
१- नाही त नाही म्हणजे
३- आबे नाही झाला तरी काही फरक नाही पडत. आपल्याला कुठं नवकरी भेटणार आहे.
१- तस नाही बे ….
३- तसं नाही त कसं ?
१- पण आपल्या मायबापले वाटते नं, का आपल्या पोरानं शिकावं ….. नवकारीले लागावं …
२. कायले टेन्शन घेतं बे आगाऊचं, सगळ्याच मायबापले तस वाटते …. का माया पोरानं शिकावं … नवकरीले लागावं …..
१. हो ना यार…
३. अबे ! सगळेच नवकरी करण त शेती कोण सांभाळण बे..
२. काय बिनकामाचा टेन्शन घेता राज्या तुम्ही…. हे १० एकर आहे त ते कोण संभाळण ?
३. तिले त सांभाळले कोणीतरी लागण ना….
२. शेतीच जगवते लेका आपल्याले कायले कोणाची कुत्तेखानी कराची….
३. हो न …… रिकामा टेन्शन घेता लेका तू ……
२. मायबाप म्हणतच असतात…. एका कानान आयकायचं अन दुसर्यांना सोडून द्याचं ….
३. दोन कान त्याच्यासाठीचं तर दिले आहे देवानं…. चार दिवस बोलन न देईन सोडून….
२. लक्षात ठेव वावर आहे त पावर आहे.

“वावर आहे तर पवार आहे” हि भावना शेतकऱ्यांच्या तरुण पोरांमध्ये असण्याचा सध्या ट्रेंड आहे. आणि तो असावाही. कारण शेतीच आपल्याला जगवते आणि त्याचा अभिमान शेतकऱ्यांच्या पोरांनी ठेवावा यात काही गैर नाही. कोणताही व्यवसाय कनिष्ठ नसतो, नाही. मात्र शेती आहे म्हणून आपल्याला काहीच करायची गरज नाही हि भावना चुकीची आहे. चुकीची म्हणण्यापेक्षा जीवघेणी आहे. आणि तीच भावना विद्यार्थिदशेतील युवकांमध्ये वाढत आहे जी धोकादायक आणि आपल्या भविष्याला खुंटवणारी आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण आज त्याची अवस्था काय आहे ते समजून घ्या, राष्ट्रसंत म्हणतात , सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे,परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा ….. आणि हे दुःख गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी भोगत आहे. आपला बाप आपल्याला लागेलं तेव्हा पैसे देतो, म्हणेल ते करतो, मोठमोठया कॉलेज ची फी भरतो याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी घबाड शिल्लक आहे असे समजू नका. आपला बाप आपल्यासाठी आडाचं देड करून हे सगळं करीत असतो. का तर आपला मुलगा / मुलगी शिकावी आणि मोठी व्हावी हीच त्याची प्रामाणिक इच्छा असते. कदाचित आपल्याला आपल्या घरी आलेलं पिकाचे मोठमोठे ढीग दिसतात. विकल्यावर त्याचे आलेले पैसे दिसतात त्या पैश्यावर हुरळून जाऊ नका. आपल्या बापाला विचारा त्यापैकी शिल्लक किती असणार आहे आणि मग आपल्या वाटा निवडा.

अरे सगळ्यांनाच वाटतं कि शेती किती फायद्याची आहे ते. कशावरून तर आलेल्या पिकांच्या ढिगावरून. पण त्यामागे तुमच्या मायबापाचे कष्ट किती, त्यासाठी केलेला खर्च किती याचा कधीतरी मागोवा घ्या. बाहेरून बघणार्यांना शेती हि कायम फायद्याची आहे आणि शेतकरी हा नेहमी ओरडत असतो हा त्यांचा समज असतो तो तुमचाही कधी होऊ देऊ नका. कधी कधी तुम्हाला तुमचा बाप अडानीही वाटतो का तर तो पारंपरिक पद्धतीने शेती करतो, नवीन प्रयोग करत नाही म्हणून आणि माझ्या हातात शेती आली तर बघा मी कसे पैसे कमावतो, बापाला शेतीच करता येत नाही असे मनातहि आणू नका. कारण तुमचा बाप जे करतो ते त्याची ऐपत, संसाधने आणि त्यातून होणारे संभाव्य धोके व ते सोसण्याची आपल्या बापाची ऐपत, त्याचे पूर्वानुभव हे सगळे लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घेत असतो.

असं म्हणतात कि पैसे अक्कल शिकवितो त्याप्रमाणेच शेतीच आहे. आपल्या बापाला जसजसे अनुभव येतात त्यातून हे सगळं घडत असतं. म्हणून विद्यार्थिदशेतील शेतकऱ्यांच्या पोरांनो आपल्या बापाच्या कष्टाचा कधीतरी कानोसा घ्या आणि आपल्या भविष्याची दिशा ठरवा. मी कधीही म्हणणार नाही कि तुम्ही नोकरीसाठी शिक्षण घ्या. आपण शिकल्याने आपल्याला नोकरी मिळेलच याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. आपल्याला मिळालेल्या नोकरीने आपण सुखी समाधानी होऊ असेहि काही नाही. नोकरी मिळाली तर पैसे मिळेल, शासकीय असली तर सुरक्षितपना वाटेल पण हा टप्पा खूप मोठा आहे. शेती करण्यासाठी सुद्धा शिक्षण हे आवश्यक आहेच.

भविष्यात कोणतीही वाट निवडा, वाटल्यास शेती करा पण मित्रांनो आजच आपल्या मनात माझ्याकडे १०/२० एकर शेती आहे. आणि ती केली तरी मी जगेल हा गंड मनात वाढू देऊ नका. भविष्यात जे होईल ते होईल, जशी परिस्थिती येईल तसे निर्णय घ्या पण आज आपल्या हाती आहे त्या आजचा उपयोग प्रामाणिकपणे करा. कारण माझ्याकडे शेती आहे व भविष्यात मी ती करू शकतो व मला काही करायची गर नाही आताच्या सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास मी Already Settle आहे हि भावना मनात येऊ देऊ नका. जे होईल ते पुढे होईल पण माझा बाप ज्या आकांक्षेने माझ्यासाठी मरमर करतोय ते सार्थकी लावण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे हि भावना कायम मनात ठेवा आपले भविष्य मग ते कोणत्याही क्षेत्रात असो उज्वलच असेल यात माझ्या मनात शंका नाही.

उज्वल भविष्याकरिता खूप खूप शुभेच्छा !

✒️लेखक:-श्रीकांत धोटे(टाकळी चनाजी)मो:-८०८७३३२५९३