गणराज्यदिनाच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान प्रदान करा – राजेंद्र मोहितकर

32

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.30डिसेंबर):-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न येत्या दि.२६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाचे ऒचित्यावर प्रदान करावा अशी मागणी राज्यस्तरिय राष्ट्रसंत विचारकृती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मोहितकर गुरूजी चिमूर यांनी केलेली आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान मिळावा अशी मागणी सर्वप्रथम सन २००३ साली मा.पंतप्रधान भारत सरकार नवी दिल्ली यांना लेखी निवेदन पाठवून केली.

तेव्हापासून आजपर्यंत गेली १७ वर्षे सातत्याने या मागणीच्या अनुषंगाने पञव्यवहार व पाठपुरावा राजेंद्र मोहितकर यांनी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी गावागावातून केला.विदर्भ व महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांना तसेच महाराष्ट्र व भारत सरकारला हजारो निवेदने, पञे,ठराव,साहित्य संमेलनाचे ठराव,सामाजिक संस्था, संघटनांनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठविले व अजूनही गावागावातून पाठविणे सुरू आहे.

या मागणीचे अनुषंगाने लोकसभेत दि.१५ मार्च २००५ ला प्रश्नोत्तराच्या काळात प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यानंतर तीनवेळा या मागणीवर लोकसभेत प्रश्न उपस्थित करून चर्चा झालेली आहे. दोनवेळा विदर्भातील खासदारांचे शिष्टमंडळ भारत देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना भेटले. यापूर्वी अनेकदा लोकप्रतिनिधींनी मा. राष्ट्रपती व मा.पंतप्रधान यांना पञेही पाठविली आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत अशासकिय ठराव व विविध संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न उपस्थित करण्यात येऊन सविस्तर चर्चा झालेली आहे .महाराष्ट्र शासनाने दि.८ जून २००६ रोजी एक शिफारसपञ केंद्राच्या गृहविभागाला पाठविले आहे.गृहविभागाने दि.२७ एप्रिल २०१२ ला मा.पंतप्रधान कार्यालयाला शिफारस प्रस्ताव पाठविलेला आहे.परंतु सदर मागणीवर गेल्या १७ वर्षांच्या कालखंडात निर्णय होवू शकला नाही हे फार मोठे दुर्दैव आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महान क्रांतिकारी संत होते.त्यांनी सन १९४२ ला अापल्या क्रांतिकारी भजनाच्या माध्यमातून विदर्भातील चिमूर, आष्टी,यावली व बेनोडा या गावी एक ऎतिहासिक क्रांती इंग्रज सत्तेच्या विरूद्ध घडवून आणली भारत देशाच्या स्वातंञ्यासाठी नागपूर व रायपूर येथे त्यांनी तुरूंगवास भोगला.भारत चीन व भारत पाकिस्तान युद्धाचेप्रसंगी सॆन्यांना प्रेरणा देणारी जोशपूर्ण भजने सीमेवर म्हणून त्यांचे मनोबल वाढविले.युद्धाच्याप्रसंगी सॆनिकांना स्वतःचे रक्त दिले.भुदान यज्ञामध्ये गोरगरिबांना व भुमीहिन लोकांना जमीन दान देण्यासाठी केवळ ११ दिवसात ११ हजार एकर जमीन मिळवून दिली.वाचनालये,वर्तमानपत्रे, काढण्यासाठी अनेकांना प्रेरणा दिली.

समाजातील अनिष्ट प्रथा,परंपरा, रूढींचे संपूर्ण उच्चाटन होण्यासाठी प्रबोधन केले.आदर्श गावे केली,सामुदायिक ध्यान- प्रार्थना, ग्रामसफाई, रामधुन इ.सुरू करून जनतेला जागृत करण्याचे कार्य केले.अफाट साहित्य लिहून नव्या पिढीसाठी समाज व राष्ट्राच्या कार्यासाठी चेतविले.त्यांचा ग्रामगीता ग्रंथ गावाच्या विकासाची गुरूकिल्ली आहे. त्यांचे कार्य प्रचंड व प्रभावी आहे.त्यांचे विचार गावागावात भजने,सामुदायिक ध्यान प्रार्थनेच्या माध्यमातून अजूनही ऎकू येतात.सन १९५५ साली ते विश्वशांती व विश्वधर्म परिषदेला भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून जपान देशात गेले होते.

त्यावेळी जगातील १८ राष्ट्रांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आहे.ग्रामस्वच्छता,सामुदायिक विवाह सोवळे,सामुदायिक सण- उत्सव साजरे करणे ह्या संकल्पना त्यांच्या साहित्य व विचारातील आहे.ते देशासाठी जगले.स्वतःच्या नावाने अशी त्यांची कोणतीही संपत्ती नाही.आजीवन ब्रम्हचर्य पाळून समाज व राष्ट्रहितासाठीच त्यांनी कार्य केले.समाजात सदॆव समन्वय साधण्याचे त्यांनी कार्य केले म्हणून आजही त्यांची पुण्यतिथी, जयंती एकोप्याने समाजातील सर्व लोक एकञ येऊन साजरी करतात, अशा थोर क्रांतिकारी महामानवास भारत सरकारने येत्या दि.२६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाचे ऒचित्य साधून भारतरत्न प्रदान करावा अशी मागणी करण्यात आली आहे.