नववर्षाभिनंदन ! आज आमच्या शाळेचा पहिला दिवस !!

30

आज बहुजन समाजातील समस्त जनताजनार्दनाचा चिक्कार आनंदोत्सवाचा दिवस आहे. कारण महाराष्ट्रात सर्वांना शिक्षणाची समानसंधी उपलब्ध करून देणारी शाळा उघडल्या गेली. ज्यात की तोही संपुर्ण विश्वाला ज्ञातअसलेल्या, शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरातील भव्यदिव्य असा श्रीमंत भिडे पाटलांचा वाडा होता तो! तो पहिल्यांदाच चिमुरड्या मुलींच्या मंजुळ ध्वनीने पार गजबजून गेला होता हो. तो दिवस होता आजचाच! इसवीसनाच्या नुतनवर्षाचा तो बहुजनांसाठी “अजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ।।” ही संतोक्ती प्रत्यक्षात उतरल्याचा तो महानुभव दायक मंगलमय दिवस होता.

सर्वधर्मीय लोकांना मोठ्या सणाहूनही श्रेष्ठ सण वाटावा, असा तो दिवस म्हणजेच १ जानेवारी १८४८ हा होता ! याचे संपुर्ण श्रेय्य शिक्षणसम्राट महात्मा फुले दाम्पत्यांना द्यावेच लागते. याच दिवशी त्यांच्या नावाचा, त्यांच्या निर्भीड शिक्षणक्रांतीचा आम्ही ‘उदो उदो’ करणार नाही तर आमच्या उच्च विद्याविभुषीत म्हणून चारचौघात मोठ्या नाकाने मिरविण्यात काय तथ्य? तेव्हा विद्यादात्या फुले दाम्पत्यांना मोठ्या आदराने या दिवशी न चुकता साष्टांग दंडवत प्रणाम घालावयास का नको? सर्वसामान्य जनतेला अन्याय-अत्याचारांविरूद्ध लढण्यास व दंड थोपटण्यास रगारगात ताकद महात्मा फुले दाम्पत्यांनीच भरली. त्यांविषयीची आपली चिड जोतीबांनी अशी कोरूनही ठेवली आहे –

“पवित्र मजला आणिक ठोसा । अन्यायाच्या छातीवरचा ।।
पवित्र मजला आणिक गहिवर । माणुसकीचा माणुसकीचा ।।”

आजच्या दिवशी शाळारुपात रोवलेल्या शिक्षणाच्या मुहूर्तमेढीवर सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आलेला दिसत आहे. या पहिल्यावहिल्या शाळेनंतर त्यांनी सर्व जाती-धर्माच्या मुलां-मुलींसाठी बऱ्याच ठिकाणी शाळा, आश्रमशाळा, अनाथालये उघडली. कामगारांनी संघटीत होऊन हुंकार भरावा, म्हणून त्यांचे नेतृत्व केले. शेतकर्‍यांच्या ज्वलंत समस्या राज्यकर्त्यांच्या समोर प्रदर्शित केल्या. ‘शेतकऱ्याचा असूड’ अशा वेदनादर्शक पुस्तकातून त्या जगासमक्ष मांडल्या. सतीप्रथा व बालविवाह पद्धती या स्त्रियांसाठी अन्यायकारकच आहेत, हे आज शिक्षणामुळे सर्वांना समजून आले आहे.

सामान्य कुटुंबातील व्यक्ती अधिकारी-पदाधिकारी झालेला बघत आहोत. हे काय कमी झाले? हीच त्या शिक्षणसम्राट फुले दाम्पत्यांच्या नेत्रदीपक शिक्षणक्रांतीची करामतच नाही का? त्यांनी आमच्या डोळ्यावरील अज्ञान, अंधश्रद्धा, धर्मांधता, गुलामी व मनुवादी विचारसरणीची घट्ट-निबीड कातडे जबरीनेच काढून फेकले आणि ज्ञानचक्षूचे रोपण केले. आता आम्हाला सारे काही ठसठशीत, स्पष्ट दिसून येत आहे. इंग्रजी जुने वर्ष संपून नविन वर्ष उजाडले आहे, हे शिक्षणामुळेच आम्हाला कळू लागले आहे. म्हणून आम्ही नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात अगदी नाचून-गाऊन करत असतो. परंतु ज्यांच्या प्राणांतक प्रयत्नांमुळे आम्हाला हे शक्य होत आहे, त्यांच्या उपकाराची छदामही आठवण होऊ नये. म्हणजे कित्ती मोठी ही शोकांतिका आहे. नाही का? नविन वर्ष हे शैक्षणिक नवजीवन देणारे आहे, हे आता विसरता कामा नये. प्रत्येक वर्षी हा दिवस महान शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुले दाम्पत्य सन्मानदिन म्हणून आम्ही अत्यादराने आनंदोत्सव साजरा करत का नाही?

त्यावेळी आपलेच समाजधार्जीने लोक “फुले दाम्पत्यांनी धर्म बाटवून बुडविला! मुस्लिम धर्म स्वीकारला!” म्हणत नाना प्रकारांनी दोषारोप केले. छळ केला. विटंबना केली. घराबाहेर हाकलून दिले. एवढेच नव्हे तर जीवानिशी ठार मारण्यासाठी कुभांड, कट-कारस्थान रचले गेले. तरीही धीराचे महामेरू माझे मायबाप-महात्मा फुले दाम्पत्य जरासुद्धा डगमगले नाहीत किंवा सर्वांना शिक्षण देण्याचे महान पुण्यप्रतापी कार्यवाऱ्यावरही सोडले नाही. धन्य धन्य त्यांच्या त्यावेळच्या धाडसाची! पहिल्या मुख्याध्यापिका ठरलेल्या सावित्रीमाई फुले यांनीही जोतीबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या या अलौकिक ज्ञानदानाच्या कार्याला चौफेर पसरविण्यास साथ दिली. खारीचा वाटा का होईना परंतु फातिमामाई शेख यांनीही त्यांच्या कार्याला ‘चार चाँद’ लावले.

त्यांचाही येथे सन्मानाने उल्लेख करण्यात मी माझे अहोभाग्यच समजतो! त्यांनी शिक्षण-शस्त्र सर्वांच्या हाती सोपविले आहे. आता सर्वांनी आत्मनिर्भर, आत्मविश्वास, आत्मज्ञान, आत्मपरीक्षण, आत्मसंयम, आत्मसंरक्षण, आत्मभान आदी गुणवैभवांनी परिपूर्ण झालेच पाहिजे. तरच आत्मक्लेष, आत्मघात, आत्महत्या आदी पळपुट्या कृत्यांना आपोआप तिलांजली मिळेल. सावित्रीमाई फुले आपल्या काव्यशैलीतून हीच प्रेरणा पेरली आहे-

“शिकण्याची गोडी नाही।। ज्ञान घेण्याची गोडी नाही ।।
शहाणे असून चालत नाही ।। तयास मानव म्हणावे का?।।”

मग सांगा, या नववर्षाच्या प्रारंभी आदर-सत्कार, गुणगौरव आणि आठवण करून शिक्षणमहर्षी महात्मा फुले दाम्पत्यांना आपल्या मनमंदिरी बहुमानाचे अढळ स्थान द्यावे किं नको?
!! जय जोती जी !! जय क्रांती जी !!
!! नववर्षातील नवे मिळती निष्कर्ष, नियमित वाचा ‘पुरोगामी संदेश’ !!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे,
मु. पॉवर हाऊसच्या मागे, एकता चौक, रामनगर, गडचिरोली.
तह. जि. गडचिरोली. मो. नं. ९४२३७१४८८३
इ-मेल : nikodekrishnakumar@gmail.com