भेदभाव विरहीत भारतीय पदक : भारतरत्न

25

[भारतरत्न पुरस्कार आरंभ दिन]

आपल्या नावासह देशाचे नाव साता समुद्रापार चमकविणारी व्यक्ती ‘भारतरत्न’ पुरस्काराची मानकरी ठरते. भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या, भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभे आयुष्य यात घालवलेले असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान, विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स.१९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला.

दि.२ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. पुढील वर्षात कायद्यात काही बदल करून मरणोत्तर ‘भारतरत्‍न’ देण्याचीही सोय करण्यात आली. त्यानंतर बाराहून अधिक जणांना मरणोत्तर भारतरत्‍न देण्यात आले आहे. सन २०१४मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले आहे. इ.स.२०१५पर्यंत एकेचाळीस जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन परदेशी व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत.

दि.२ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. ‘भारतरत्न’ विजेत्यास अशा सुविधा मिळू लागल्या – (१) ‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणीत संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची मुभा. (२) भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथीचा मान. (३) भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट. (४) पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५० टक्के एवढे निवृत्ती वेतन. (५) आवश्यकतेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा व सुरक्षा. (६) माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यानंतर सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.

इ.स.१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आल्याचे कळते. पुरस्काराच्या प्राथमिक वैशिष्ट्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते – • पुरस्कार एका पदकाच्या स्वरूपाचा असेल आणि त्यास ‘भारतरत्न’ संबोधले जाईल. • हे पदक १.३७५ इंच आकाराच्या व्यासाचे असेल आणि दोन्ही बाजूला गोल कडा असतील. • पदकाच्या शीर्ष पटलाच्या मध्ये उगवलेला सूर्य असून त्याची किरणे कडेपर्यंत पसरलेली असतील. • सूर्यबिंबावर ‘भारतरत्न’ देवनागरी लिपीत कोरलेले असेल. • पदकाच्या खालील कडेवर पुष्पमाला कोरलेली असेल. • पदकाच्या मागील बाजूवर मधोमध भारताचे राजचिन्ह कोरले जाईल व त्याच्या खालील बाजूच्या कडेवर ‘सत्यमेव जयते’ हे देवनागरी लिपीमध्ये कोरले जाईल. • हे पदक ०.२५ इंच रुंदीच्या पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून पुरस्कृत व्यक्तीच्या गळ्यात घातले जाईल. • हे पदक राष्ट्रपतींच्या हस्तेच घातले जाईल. • ‘भारतरत्न’ पुरस्काराने अलंकृत व्यक्तीचे नाव भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि राष्ट्रपतींच्या निर्देशाधीन रजिस्टरमध्ये नोंदवले जाईल. • एखाद्या व्यक्तीला दिले गेलेले पदक काढून घेणे व त्या व्यक्तीचे नाव रजिस्टरमधून कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. तसेच एकदा काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला परत करणे आणि त्याच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना राहील. • जात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद या कशाचाही परिणाम या पुरस्कारास पात्र व्यक्ती ठरविताना होणार नाही. • प्रत्येक वेळेला रद्द व पुनर्नोंदणी करण्याची प्रक्रिया भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

नवीन बदल : राष्ट्रपतींनी दि.८ जानेवारी १९५५ रोजी राजपत्रातून पदकासंबंधी काही नवीन बदल अधिसूचित केले होते. त्यातील प्रमुख ठराव असे – राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या मुद्रेसहित पुरस्कार प्रदान केला जाईल, हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल, त्याची लांबी २.३१२ इंच, रुंदी १.८७५ इंच व जाडी ०.१२५ इंचाची राहील, हे पदक काशाचे बनवले जाईल, याच्या दर्शनी बाजूवर ०.६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल, मागील बाजूवर राजचिन्ह कोरले जाईल, सूर्य व घेरा प्लॅटिनमचा असेल आणि अक्षरांवर चांदीचा मुलामा असेल, असे ठरवले गेले. मात्र दि.२६ जानेवारी १९५७च्या अधिसूचनेनुसार हे पदक चमकदार काशामध्ये बदलले गेले.

मेडलची आजची स्थिती : ‘भारतरत्न’ मेडल ५.८ सेंमी लांबीचे, ४.७ सेंमी रूंदीचे आणि ३.१ मिमी जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सेंमी व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपीमध्ये ‘भारतरत्न’ कोरलेले असते. मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह – चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जातात.

आज पुरस्काराचे स्वरूप : सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे, अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारतरत्‍न’ असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी, असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (Motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जाऊन इ.स.२०१५ साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. या ‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह – ‘चौमुखी सिंहाची प्रतिमा’ अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. मात्र त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान मिळते.

हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही. हा पुरस्कार मिळणे बहुमानाचे समजले जाते. सदर पुरस्काराची – भारतीय सर्वोच्च नागरी सन्मानाची अल्पशी तरी माहिती देशातील सर्वसामान्य जनतेला ज्ञात असावी, याच हेतुने केलेला हा लेखप्रपंच! तोही माझ्या प्रिय वाचक बांधवांच्या सेवेत सविनय सादर करीत आहे. सत्यमेव जयते ! वन्दे मातरम !!
!! नियमित न चुकता वाचावे व वाचून घडावे असे वेबन्यूज ‘पुरोगामी संदेश’ !!

✒️लेखक:-श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा.
(मराठी साहित्यिक व दै.रयतेचा वाली-जिल्हा प्रतिनिधी)
मु. पो. ता. जि. गडचिरोली (४४२६०५)
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
इमेल – krishnadas.nirankari@gmail.com